Sunday 29 June 2008

वाट फुटेल तिथे - ४

PRAVAASSUDHIRSANGE
Thursday, May 8, 2008

वाट फुटेल तिथे ४
दिव्य केरळी उच्चार आणि ती रहदारी
४ ऑक्टोबर २०००.मडिकेरीच्या रम्य आठवणी घेऊन निघालो. मॅसांचे आभार मानले. त्यांनी सकाळी वेळेवर बिल दिले. तेल्लीचेरीला जाणार रस्ता कोठून जातो त्याचे अगत्याने मार्गदर्शन केले. सारथ्यांनी व्यवस्थित समजून घेतले. त्यांचे आम्ही सर्वांनी पुन्हा आभार मानले. खरेच मन उमदे असेल तर आपले व्यक्तिमत्त्व कोणत्याहि कामांत उतरते व त्या पदावर आपला ठसा उमटतो. मॅसा मुळे त्या सरकारी पदाची शोभा वाढली हे निस्संशय. सातसाडेसातला निघालो.

आता आम्ही वेगळ्या दिशेने जात होतो. रस्त्याला लागून डेरेदार वृक्ष. त्यापलीकडे दुतर्फा चहाचे मळे. आल्हाददायक दृश्य. मी लहान मुलासारखा सीटवर गुढगे टेकून मागे तोंड करुन निसर्ग डोळ्यात साठवत होतो. बाजूच्या दोघापेक्षा मी नशीबवान होतो. मला संपूर्ण दृश्य दिसत होते.मास्तरांनी विशिष्ट पद्धतीने साडी नेसलेल्या स्त्रिया दाखविल्या. चहाच्या मळ्यावरील कामकरी स्त्रिया. ‘कूर्ग जिल्ह्यातील चहाच्या मळ्यातील काम करणारी स्त्री’ अशा मथळ्याचे चित्र शाळेत असतांना भूगोलाच्या पुस्तकात होते ते मास्तराला त्वरित आठवले आम्हा इतरांना नंतर आठवले, फेटेधारी नसतांना देखील. परंतु त्याला त्वरित आठवले.


घाट चढतांना अप्रतिम सेट डोसा मिळाला. उतरतांना कां मिळू नये! वाटेत एक टुमदार गांव लागले. आठवड्याचा बाजार भरला होता. सुरेख हवेमुळे पोटातील कावळ्यांना कंठ फुटला. क्षुधा शांति भवन शोधूं लागलो. एके ठिकाणी पार्किंग मिळाले. हॉटेल काही दिसेना. करपल्लवीचा आधार घेतला. एकाने हॉटेल दाखविले. बेत काही खास नव्हता. काय खाल्ले आता आठवत नाही. निघालो. घाट उतरणे पुढे सुरु.

गाडीच्या चाकांची रस्त्याशी तीव्र उतारावर जी झटापट चालू होती त्या गडबडीत माझी बॅग माझ्या मानेवर यायला लागली. माझ्या मानेवर एक जूं आले असून ते अगदी योग्य आहे, किंबहुना ते येण्यास फार उशीर झाला आहे, नव्हे ते जन्मत:च असायला हवे होते यावर इतर चौघांचे एकमत झले. अर्थात ऑल ग्रेट मेन थिंक अलाईक.

मी पुन्हा मागे तोंड करून गुढगे सीटवर ठेवून माझी बॅग त्याखालील बॅगवर दोरीने बांधायला लागलो. गाडीच्या मागच्या काचेतून नजर टाकली. विश्वास बसेना एवढे सुंदर दृश्य. घनदाट अरण्य म्हणजे काय? फक्त ब्रिज इन रिव्हर क्वाय सारख्या सिनेमात पाहिले होते. परंतु प्रत्यक्ष दर्शन मात्र कल्पनातीत सुन्दर. मी शब्दप्रभू नाही याचे दु:ख होते. ते वर्णन करण्यासाठी कवीलाच तेथे उतरावे लागेल. ते अरण्याचे दृश्य मनावर कोरलेले आहे.
केरळ्च्या सीमेत प्रवेश केल्यावर एक फरक जाणवला. सीमेवरच्या गावातील बाजारालगतच रस्ता जातो. माणसांची प्रचंड गर्दी. आणि गावाला लागून गावे. निर्मनुष्य प्रदेशच नाही. पुढील ठिकाण होते मुन्नार. त्या रस्त्यावर आमच्या नकाशात केरळ्मधील थल्लीसेरी हे गाव दिसत होते. इंग्रजी स्पेलिंगप्रमाणे. डावीकडे पुढे देवा व मागे जाड्या होते. साहाजिकच रस्ता विचारण्याची जबाबदारी त्या दोघांची. थल्लीसेरी कोठे आहे कोणालाच माहिती दिसेना. तुमचे मुखचंद्र पाहून लोकांना पत्ता सांगावासा वाटत नाही किंवा ते तो विसरत तरी असावेत. आमची मल्लिनाथी. पण टिंगल आणि आचरट विनोद हा पर्याय नव्हे. वेग २० - २५ वर आला. "अरे तेच तेल्लीचेरी असणार." मास्तरांना साक्षात्कार झाला. आणि कपडे घालून युरेका. त्वरित प्रतिसाद मिळाला. (टंकतांना चुकून प्रीतिसाद टाईप केले होते. नवीन शब्द मिळाला. शिंप्याची चूक हीच फॅशन होय, या थाटात.)

पावसाची रिपरिप चालू झाली. इथे मान्सून अद्याप कार्यरत होता. हवा मुंबईपेक्षा गरम. आता आगेकूच सुरु झाली. केरळमधील कुशल सारथी चांगलेच हात दाखवू लागले. मोठ्ठ्या बसेस (अनेकवचन बशी करावे का?) आपल्या गाडीच्या मागे चिकटून जोराजोरात पांचजन्य करून बाजूला होण्यास सांगतात (साईड मागतात). डावीकडे जाऊन रस्ता दिला की अति जवळून अति वेगात पुढे जातात. सहाइंचाचे अंतर जरी ठेवले तरी शिक्षा असावी. रॅश हा शब्द लाजेल असे ड्रायव्हिंग. आणि जरा पुढे जाऊन एकदोन किलोमीटरवर थांबतात. कारण त्यांचा थांबा असतो. पुन्हा आपण पुढे जायचे. सुटलो म्हणून श्वास घ्यावा तो पुन्हा मागून पांचजन्य. अशा लडिवाळ रहदारीतून अखेर तेल्लीचेरी आले. तेल्लीचेरी शहरातील रहदारी कशी? तर मुंबईत दुपारी दवाबाजारात असते तशी. चिंचोळ्या गल्ल्या आणि मोठ्या वाहनांची बेशिस्त अशी प्रचंड गर्दी. नियम पाळल्यास मृत्युदंड असावा. ही केरळ स्पेशल रहदारी बरे का. मुंबई पुण्यात राहून याची कल्पना येणार नाही. तेल्लीचेरीला लागूनच ‘माहे’ हा केंद्रशासित प्रदेश (युनिअन टेरिटरी) आहे. तेल्लीचेरी कोठे संपते व माहे कोठे सुरू होते हे दुकानावरूनच कळते. तसा वाटेत एक छोट्या गावातील जकातनाक्यासारखा जकात नाका आहे. पण त्याने आम्हाला थांबविले नाही. एका शहराचेच दोन भाग. दुसरे काय! "युनिअन टेरिटरी ऑफ़ माहे ऍंड पॉण्डिचेरी" माहे कुठे पॉण्डिचेरी कुठे. सरकारी विनोद. आणखी काय! गंमत म्हणजे पॉण्डिचेरीचे स्पेलिंग तेल्लीचेरी सारखे नाही. समाजवादाचा अभाव बरे. एवढा पंक्तिप्रपंच बरा नव्हे. कोण म्हणतो केरळमध्ये साम्यवाद्यांचा जोर आहे? आणखी एक गंमत. मुंबईच्या दवा बाजारात जेवढी औषधाची दुकाने नसतील त्यापेक्षा जास्त येथे दारूची आहेत. थोडक्यात म्हणजे मद्यप्रेमीचे तीर्थक्षेत्र. खरे म्हणजे एका सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय धर्मपीठाचेच नाव जिभेवर आलेले आहो. कोणते ते चतुर आणि चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच. कुतूहल म्हणून उतरून दर पाहिले. ७५० मि ली रम रू १२८, ७५० मि ली बकार्डी रू ४५० रेव्हिएरा वाईन रू ६५० त्या वेळी यांचा मुंबईतील किंमती अनुक्रमे रू. २००, ८५० व १२०० होत्या. हे राज्य सगळीकडून केरळने वेढले आहे. पश्चिमेला समुद्रकिनारा असावा. मग वेगळ्या राज्याचे प्रयोजन काय. सरकारच जाणे. मद्यप्रेमींची चांगलीच सोय. केरळमधून ५० कि मी पर्यंत पासूनचे लोक येतात मद्यप्राशनाचा आनंद लुटतात व घरी (किंवा गटारात) जातात. जवळजवळ सर्व दुकानात पिण्यासाठी कक्ष देखील केलेले आहेत. श्रेष्ठ तळीरामांना राज्य सरकार तर्फ़े पुरस्कार दिले जातात की काय ठाऊक नाही. असल्यास माझा सलाम. नसल्यास कठोर निषेध. अथातो मद्यजिज्ञासा.या जिज्ञासेत अर्धा तास खर्च केला. निघालो.

नकाशातल्या मार्गावरील पुढील ठिकाण होतेकालिकत. ’वॉस्को द गामा १४९८ साली कालिकत येथे आला’ हे वाक्य आपण सर्वांनी शाळेत असतांना इतिहासात वाचले असेलच. या ठिकाणाबाबत एक गंमत आहे. मी जेथे काम करतो (दुर्दैवाने पोटासाठी करावे लागते) तेथील डिस्पॅच खाते एकदा एकाच्या गैरहजेरीत मी सांभाळले होते. परचेस ऑर्डर पाहून माल कालिकतला पाठविला. बिलांच्या मूळ प्रती बॅंकेत पाठवायच्या वेळी त्यांच्या कार्यालयाचा व कारखान्याचा पत्ता वाचतो तर काय, कोझीकोडे. मी टरकलो. माझे थोबाड पाहून सुमति नामक स्टेनो पण टरकली. वॉट्ट हॅप्पण्ड? तिने विचारले. मी म्हटले ऑर्डर ऑफ़ रामेश्वर, गुड्स सेंट टू सोमेश्वर. कंप्लीट डिसऑर्डर ऑफ़ पर्चेस ऑर्डर. कालिकत का माल कोझीकोडे भेजा. ती बया हसायला लागली. ती केरळीच होती. बोथ्थ आर दी सेम. टू नेम्स ऑफ्फ वन्न प्लेस. माझा जीव कालिकतच्या भांड्यात. असो.

एका मैलाच्या दगडावर चक्क हिंदी पाटी दिसली. ’कोषिकोडे ---- किमी’ अशी. मिसळपाव डॉट कॉमचे सभासद आणि लेखक वाचक श्री. अनिकेत यांनी कोळिकोडे असे या शहराचे तिसरे नाव कळविले आहे. धन्य ते केरळी उच्चार. हे लोक जर आमच्या शाळेत शिकले असते तर झेब्र्यासारखे दिसले असते. शिक्षकांच्या छड्या खाऊन. पुढील विचित्र नावे मात्र इंग्रजी दगडावर बरोबर लिहिली होती. पोन्नान्नी, गुरुवायूर, इरिंजळकुड्डा. तरी चवक्कल कांही ठिकाणी चव्वक्कड केले होते. पण फारशी गफलत नव्हती.

मुन्नारला संध्याकाळपर्यंत पोचणे शक्य नव्हते. अंतर फार. वाटेत कोठेतरी मुक्काम करावाच लागणार. तर जरासा वळसा घेऊन कालडी का पाहू नये. आद्य शंकराचार्यांचे जन्मस्थान. आम्ही जरी धार्मिक नसलो तरी एका लोकोत्तर पुरुषाच्या जन्मस्थानी जायला काय हरकत आहे? हजार अकराशे वर्षापूर्वी दळणवळणाची साधने काय होती असावीत? घोडा, बैलगाडी आणि घोडागाडी. आणि अर्थात गांधीविनोबांची अकरा नंबरची बस. या महापुरुषाने त्या काळी जवळजवळ संपूर्ण हिंदुस्थानचा दौरा करून वादविवादात इतर धर्मांच्या तत्कालीन पंडितांना खासकरून बौद्ध धर्मीय; जिंकून हिंदु धर्माचे पुनरुज्जीवन केले. अफाट विद्वत्ता आणि जीवनाचे एवढे प्रचंड ध्येय समोर ठेऊन ते चिकाटीने पूर्ण करणे हे अलौकिकच होय. अशा विद्वान आणि थोर व्यक्तीला वंदन करून आमचा स्वाभिमान काय कोसळणार की बुडणार होता? कालडीवरून जायचे एकमताने ठरले.

धार्मिक असलेले शेटजी खूष झाले. गुरूवायूर मात्र टाळले. तेथील मंदिर फार सुंदर आहे असे आम्हाला वाटेत कोणीतरी पत्ता सांगणाऱ्याने सांगितले. त्रिचूर (वा त्रिशूर) मार्गे कालडी. येथे थांबलो.सुबक प्रवेशद्वार. आत कॅमेरा नेता येत नाही. तो प्रवेशाशी जमा करावा लागतो. पावती न घेता. प्रकाशचित्रे येथून निघतांना प्रवेशापाशी काढली. हे केंद्र आतून पाहतांना मला वरळीच्या नेहरू सेंटरची आठवण झाली. गोल इमारत. बाहेरील भिंतीला लागून आतील बाजूने जिना. दोनतीन फ़ूट लांबीच्या पायर्‍या. दर पांचसहा पायर्‍यानंतर मजले किंवा कोनाडे केले आहेत. आद्य शंकराचार्यांच्या जीवनातील प्रसंगावरील व दंतकथांवरील देखावे आहेत. त्याबद्दल मी कांही लिहीत नाहीं. ते तेथेच जाऊन पाहावे.

संध्याकाळपर्यंत कोचीनपर्यंत पोहोचू असे वाटले होते. पण वाटेतच संध्याकाळ होऊ लागली. पावणेसहाच्यासुमारास इडप्पल नावाच्या छोट्या शहरसदृश गावात आलो. इडप्पल गावामधूनच रा.म.मा. १७ जातो. चांगले सोडाच, बरेसे देखील हॉटेल दिसेना. अखेर एका शॉपिंग सेंटरमध्ये हॉटेल बॉम्बे ची पाटी दिसली. जाऊन पाहिले. तीन खोल्यांचा बर्‍यापैकी सूईट होता. प्रशस्त लिव्हिंग रूम, प्रशस्त बेडरूम व अलीशान वेटिंग. भाडे रु. ३५०.०० फक्त. आश्चर्य वाटले. टॉवेल, साबण कांही नाही. गरम पाण्याची सोय नाही. हवा तर मुंबईपेक्षा जास्त उकाड्याची. चला, टेकायला स्वच्छ आणि चांगली जागा तर मिळाली. ती देखील स्वस्तात. आंघोळी करून फेरफटका मारायला बाहेर पडलो. हे जे हॉटेल होते ते हॉटेल नव्हतेच. ते एक सभागृह वजा लग्नाचा हॉल होता. हॉल अगदी थेट पुण्यामुंबईच्या सिनेमा हॉलसारखा. लग्न गृह असल्यामुळे हॉलला लागून दोन सुईट होते. एक वरपक्षासाठी व दुसरा वधूपक्षासाठी. जेव्हा लग्न नसे तेव्हा हे सुईट ते  ’बॉंबे हॉटेल’ होत असत. छोटे गांव म्हणून स्वस्त. काय कल्पकता आहे. मुख्य म्हणजे गाड्या ठेवायला प्रशस्त तळघर होते. सुरक्षा असलेले.

मग फिरतांना जेऊनच हॉटेलात परतण्याचे ठरले. येथे पाहण्यासारखे काहीच नव्हते. जेवण्यासाठी हॉटेल शोधून ठेवत होतोच. ख्रिस्ती बंधूंची काही हॉटेले होती. दर मुंबईपेक्षा किंचित कमी. म्हणजे तसे महागच. चिकन मटन मसाला रू. ७५.०० प्लेट च्या आसपास. बीफ़ रू. २५.०० फक्त. ईडली, डोसा कोठेच नव्हते. मल्याळमखेरीज दुसरी भाषा कोणाला येत नाही. दुकानांच्या पाट्यावर सगळ्या जिलेबी काढलेली. क्वचित एखादी फ़िरंगी पाटी. शेवटी एका हॉटेलातील वेटरने इडली, डोसा, चपाती, रोटी कोठे मिळेल ते मल्याळीमध्ये खाणा खुणा करून सांगितले. खाणाखूणा मात्र कळल्या. समोरच्या पदपथावर थोडे पुढे ते हॉटेल आहे असे त्याने खाणाखुणा करून सांगितले. एक गोल गरगरीत पण अतिशय आनंदी चेहर्‍याचा मालक गल्ल्यावर बसला होता. फक्त गुडुगुडू. काय बोलतो कळेना. आम्ही बोलतो ते त्याला गुडुगुडु. त्याने एकाला हाक मारली. एक वेटर आला. त्याला मोडतोड हिंदी बोलता येत होते. शाकाहारी जेवायचे म्हटल्यावर आत एक वातानुकूलित कक्ष होता तेथे नेले. थंड चिवट चपाती आणि सपक अळणी भाजी मिळाली. खोबरेलात बनवलेली भाजी. कसेबसे ढकलले. इडली डोसे फक्त सकाळी. इतर लोक थंड उकडा भात व थंड रस्सा खातांना दिसले. पण त्याचे रंगरूप पाहून ते न खाण्याचे ठरविले. पदार्थ चवदार नाही तर निदान गरम तरी बरा लागतो हेहि या थोर लोकांना ठाऊक नसावे. चवीचे तर वावडेच असावे. प्यायला उकळते गरम पाणी. चहाच्या काढ्याच्या रंगाचे. त्यात कसलीशी पाने असतात. ते मात्र पिऊन पाहिले. बहुधा सर्वात चवदार पदार्थ हाच असावा. हे बहुधा त्या हवामानाला उपकारक असावे. गरम असून याने तहान भागते हे खरेच. थंड फराळ (थंडा नव्हे) व गरम पाणी हा संगम अनोखाच. दुसरे दिवशी सकाळी गरमागरम इडली व डोसा मिळणार. साडेआठला हॉटेल उघडल्यावर. चला, हेहि नसे थोडके. आता रात्री अर्धपोटी असल्यामुळे सकाळी येथेच न्याहारी करून निघण्याचे ठरले.

खास काही घडले नाही, सामान्य गोष्टीच आम्हाला वेगळ्या अनुभवामुळे व उत्तेजित प्रसन्न मनस्थितीमुळे खास वाटल्या.
क्रमश:
पूर्वप्रसिद्धी(Published earlier): misalpav।com 09 Mar। 2008

No comments: