Monday 30 June 2008

वाट फुटेल तिथे - ७

टेकडी आणि बॅकवॉटर्स

०८-१०-२०००.
कोडाईकनाल
अपेक्षेप्रमाणे नवी पहाट नवी आशा, नवी चेतना घेऊन आली. आता नवा सूर्य नवी झळाळी घेऊन येणारच. काल आमच्या हॉटेलांत बरेच प्रवासी आले होते. मॅ. सा ना बिल तयार करायला सांगितले. पण नव्या प्रवाशांच्या गर्दीमुळे हॉटेलच्या सेवकावर फार ताण पडला. तरी आमची गाडी त्यानें स्वच्छ धुवून दिली. धुक्याच्या दुलईत लपेटलेल्या स्वप्नमय वातावरणात प्रभातफेरी झाली. भाऊ मोरोबा साथीला होतेच. सुदैवाने वीजपुरवठा सुरळीत असल्यानें गीझर व्यवस्थित चालू. मस्त गरम पाणी. स्नान करायला मजा आली. नार्‍याच्या घरीं त्याची मेहुणी तिच्या आईची सेवा करायला अपरात्रीं हजर झाली होती. त्यामुळें सौ नारकर व मुलांना चांगलें मानसिक बळ मिळाले. सौ. नारकर आणि त्यांच्या मातोश्री दोघींच्याहि प्रकृतीत सुधारणा. आता नार्‍याला दौरा अर्धवट सोडायचे कारण नव्हते.

सरवानला उदार आश्रय देऊन भरपूर सांबार आणि तीन प्रकारच्या चटण्या आणि न्याहारीनें तृप्त होऊन पुन्हा नव्या उमेदीने निघालो. पुढचा मुक्काम होता टेकडी. एके ठिकाणी टेकडी अशी इंग्रजी अक्षरे दिसली. अरे तीनच अक्षरे आहेत. मल्याळी आणि तमिळ पण टेकडी कसे लिहितात पाहा. आम्ही खरेच दोन्ही लिप्यातले टेकडी वाचायला शिकलो. तमिळ टेकडीला आपली नक्षी आणि मल्याळी टेकडीला आपली जिलबी असे सार्थ नामकरण झाले. टेकडी लिहिलेलें नसेल तर जिलबी वा नक्षी आपली नाही असे साधे सोपे सरळ समीकरण. काही दगडावर अन्य गांवांची नावे होती. आपली नक्षी वा आपली जिलबी दिसली की फारच गंमत येई. चालक सोडून इतर चौघेजण एका सुरात ओरडत होतो आपली नक्षी वा आपली जिलबी.

निसर्गाची एक गंमतच आहे. पूर्व किनारा किमान ५० कि.मी. दूर. पण अगदी कोंकणात किनार्‍यालगत असते तेवढी भरपूर वाळू दिसे. ताड माड दिसत. जणु पाच मिनिटे चालल्यावर समुद्रच दिसेल. रस्त्यावर वा गावात कुठे गावाचे नाव वगैरे लिहिलेले नसेल तर हा चकवाच म्हणायचा. अधूनमधून शहाळी, ताडगोळे, तोतापुरी कैर्‍या, तोतापुरी आंबे, उकडलेले शेंगदाणे, रस्त्याकडेला विकायला ठेवलेले दिसत. एके ठिकाणी मस्त लुसलुशीत रसदार ताडगोळे खाल्ले आणि शहाळ्याचे गोड पाणी पिऊन तृषा भागवली. बहुधा दहा रुपयांना बारा ताडगोळे होते. आणि दहा रुपयांना एक शहाळे होते. आता नक्की आठवत नाहीं. तेणीला उजवें वळण घेतले आणि टेकडीचा रस्ता धरला. तेणीवरून मदुराई ४८ कि.मी. आहे म्हणजे समुद्र किती दूर आहे पाहा. झाडोरा वाढायला लागला, चढ लागला आणि हवेंत गारवा आला.

नार्‍याच्या घरची आघाडी ठीक होती.

माध्यान्हीच्या सुमाराला टेकडी आले. अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाण. सगळे जण निसर्गसौंदर्यानें हरखून गेलों. तहानभूक विसरलों. वनखात्याच्या चौकीवर नोंद करून आंत गेलों. प्रथम बोट क्लबवर गेलों. साडेअकराची सहल नुकतीच गेली होती. पुढची दोनला होती. समोरच एका सुरेख ठिकाणीं खानपानसेवा होती. पण पदार्थ बर्गर, समोसा, पॅटीस वगैरे. बनवून ठेवलेले, थंडगार, शहरी आणि यथातथाच दिसले. उर्दूवाचन भरमसाट. दर पाहूनच होती नव्हती ती भूक मेली. बहुधा ही पाश्चात्यांची सोय असावी. केरळ नाहींतरी खाण्याच्या दृष्टीनें कुचकामीच. राहाण्याचें हॉटेल शोधायला लागलों. जवळजवळ सगळीं हनिमून हॉटेल्स. छतात आरसा बसवलेली. दर प्रचंड महागडे. सुंदर निसर्ग पाहून दोन रात्रींचा मुक्काम करायचा विचार करीत होतो. अर्धा तास फिरूनहि योग्य तसे आखूड शिंगी बहुदुधी हॉटेल गवसेना. आम्हीं चैन करायला नक्कीच निघालो नव्हतो. निसर्ग सुंदर पण खाण्यापिण्याची बोंबच. पैसेहि फार लागणार. सोळाशे रुपयाखालीं बरेसे आणि पार्किंग चांगले असलेले हॉटेल तेव्हा गावलेच नाही. आता बरीच झाली आहेत. टेकडीपासून चार किमीवरच्या कुमिली गावात. तेव्हा काही नव्हते. चालक अर्ध्या तासाच्या विश्रांतीने ताजेतवाने झाले होते. दहावीस कि.मी. वर चांगले आणि वाजवी दरांतले हॉटेल मिळाले तरच मुकाम करायचा नाहींतर मुक्कामच रहित.

मुक्काम रहितच करावा लागला. दर ठीक तिथे पार्किंग नाही, पार्किंग होते तिथे दर चढे. काय करणार? जसजसे घाट उतरलो तसतशी थंड हवा मांजराच्या पावलाने कधी पळाली पत्ता लागला नाही. मात्र झाडोरा तसा कमी झाला नाही. फक्त झाडे बदललीं. आता माड, केळी वगैरे जास्त दिसायला लागले. वातानुकूलनावर जास्त भर दिला. चढउतार फारसे नव्हतेच. तापलेल्या हवेमुळे भूक तशी मेलीच. पण त्याचा फायदा असा झाला की अंतर पटापट कापले गेले. जेवायला कुठे थांबलोच नाही. आता बॅकवॉटर्स पाहायचे होते. कोट्टायमहून. तीनसाडेतीनला कोट्टायम ५० च्या आसपास कि.मी. ची पाटी दिसली. म्हणजे तासाभरात कोट्टायम. तिथे मुक्काम करून दुसर्‍या दिवशी बॅकवॉटर्स असे काहीसे ठरवत होतो. चारलाच कोट्टायम आले. इथून १४ कि.मी. बॅकवॉटर्स आहे. अचानक साक्षात्कार झाल्यासारखा चक्रधारी मास्तर बोलला, अरे बॅकवॉटर्स बघायला दोनेक तास लागतात. आताच गेलो तर. समजा व्यवस्थित पाहून झालें तर कोट्टायमहून उद्या सकाळीच निघू शकतो. पुन्हा एकदा ऑल ग्रेट मेन थिंक अलाईक. थेट बॅकवॉटर्सला पोहोचलो. फारशी गर्दी नव्हती. तुरळक चुकार लोक होते. सहज चौकशी केली. शेवटची फेरी नुकतीच गेली होती. पाचजणांसाठी खास फेरी मिळेल का, असेल तर किती पैसे हे चाचपायला लागलो. एक दिवस वाचला तरी एक दिवसाच्या मुक्कामाचे किमान हजारेक रुपये, किंबहुना जास्तच वाचणार होते. ते पैसे दुसरे ठिकाण पाहायला सत्कारणी लावता येणार होते. दोन तास चांगला उजेड असेल तोपर्यंत फिरवायला त्याने बाराशे मागितले. तरीहि उजेड राहिला तर ताशी सहाशेच्या दराने देऊ म्हणून सांगितले. इतर कोणीहि उतारू न घ्यायच्या बोलीवर. जाड्याने अर्धे इंग्रजी अर्धे मोडतोड हिंदी बोलत मस्त सौदा पटवला. हिंदीची मोडतोड त्या माणसाने केली बरे. पण आम्ही ते पाप जाड्याच्याच पदरात टाकले. या मुंजाचे एखाद्या भय्यिणीशी लग्न लावले तरच त्याचे हिंदी सुधारेल असे इतर चौघांचेहि मत झाले. त्या मताशी बोटीचा कप्तान, त्याचा किलींडर आणि गाईडहि सामील झाले. काय ते त्या महाभागांना कळलें कीं नाहीं कोण जाणें. असो. त्यालाहि आता गिर्‍हाईक मिळण्याची शक्यता नव्हती, आम्हालाहि इतर उतारूंचा उपद्रव नव्हता. गाईडचे पैसे वेगळे. केवळ सव्वाशे.

उतरत्या लालसोनेरी उन्हात बॅकवॉटर्सचे रंग आणखी गहिरे झाले. सुरुवातीचा फोटो काढायचा उत्साह सोडला तर त्या गहिर्‍या रंगानी आम्हाला अंतर्मुख केले. निसर्गसुंदर बॅकवॉटर्सने आम्हाला मंत्रमुग्धच केले. एकच गालबोट. यांत्रिक होडीच्या इंजिनाचा प्रचंड आवाज शांततेच्या ठिकर्‍या उडवतो. मला राहवले नाही. मी त्या कप्तानाला अधूनमधून इंजिन बंद करायला सुचवले. इंजिन बंद केल्यावर जी शांतता अनुभवायला मिळते कीं ज्याचें नाव ते. किनार्‍यावरून झाडांवरच्या पक्ष्यांची किलबिल, विविध आकारांच्या स्टीलच्या बांगड्या जमिनीवर पडल्यासारखा आवाज करणारे तिथल्या लोकांचे बोलणे अस्पष्टसे ऐकू येत होते, झाडांतून ऐकू येणारी वार्‍याची सळसळ, पार्श्वभूमीला पाण्यातून येणारे चुळुक् चुळुक् चुळुक् आवाज स्वर्ग तो काय अजून वेगळा असतो? उगीच नाहीं केरळला देवभूमि म्हणत! गाईडने पण मधून इंजिन बंद करायच्या कल्पनेला मनापासून दाद दिली. खरेंच, इतकी संशोधने होताहेत. आतां नवीन मोटारीचे इंजिन चालू आहे की बंद हे चालकाच्या जागेवरूनहि कळत नाही. आवाजहि नही करता ही फ्रीजची जाहिरात आठवली. पण होड्यांचीच इंजिनें अशी का? कपिल देवला सांगायलाच पाहिजे. पाम ऑलिव्हदा सारखा यालाहि जबाब नाही. पण वेगळ्या अर्थाने. गाईडला तीनशे रुपये दिले. पण लालसोनेरी संधिप्रकाशांतल्या गहिर्‍या रंगांचे ते दिव्यत्वाचा स्पर्श असलेले अनुभव? त्याची किंमत आपण पैशांत करू शकतो का?

भरजरी लालसोनेरी निसर्गांत हळूहळू काजळमाया मिसळूं लागली. पाण्याच्या गर्द निळाईंत आता विश्वकर्मा श्यामरंग भरायला लागला होता. त्या गर्द पार्श्वभूमीवर झाडांचे शेंडे वेगळेच दिसत होते. संध्याछाया मारवा सोहनी आणि पूरियाचे अनोखे रूप दाखवत होत्या. एक अपूर्व अनुभव मनांत साठवत तरंगतच कोट्टायमकडे परतलो. रा.म.मा. १७ ला लागूनच एक चकाचक हॉटेल मिळाले. सुरेख पार्किंग, स्वच्छ नीटनेटके स्वागतकक्ष, तत्पर सेवकवर्ग, प्रशस्त आणि आकर्षक डायनिंग हॉल. रु. साडेतीनशें नॉन ए.सी. डबल ऑक्युपन्सी. तरीहि घासाघीस केलीच. मुंबईकरांचा भाव मारलाच. मुंबईकरांकडे सगळीकडे अतिशय आदराने पाहिले जाते बरे का. पुणेकरांना पार्श्वाग्नि होईल कदाचित, पण हे खरेंच आहे. पुणेकर मास्तरांना आम्हीं याची जाणीव करून द्यायला विसरलों नाहीं. पण ‘मुळांतला मी मुंबईकरच आहे. हल्लीच तर पुण्यात आलो.’ अशी मखलाशी त्याने केली. मुंबईकरांचा विजय असो. १० टक्के सवलतीचा दर मिळाला. हवा मुंबईपेक्षा किंचित जास्तच गरम. पण प्रदूषणमुक्त. स्वच्छ, प्रशस्त, आकर्षक रंगसंगतीच्या, सुरेख पडदे लावलेल्या खोल्या, मोठ्ठ्या खिडक्या आणि चांगले वायुवीजन. नॉन ए.सी. च खोल्या घेतल्या.

नार्‍याच्या घरची आघाडी ठीक होती.

No comments: