Sunday 29 June 2008

वाट फुटेल तिथे - ६


कोडाईकनाल

०७-१०-२०००:
गाडी साडेआठ वाजता येणार होती. कमालीची थंडी होती. तपमान दहाच्या खाली असावे. कमालीची आर्द्रता होती. या आर्द्रतेमुळे मुन्नारपासून ओले असलेले नार्‍याचे व जाड्याचे कपडे जसेच्या तसे ओलेच राहिले. अजिबात वाळले नाहींत. त्यांना भरपूर चिडवले. लॉंड्री चालवायचे सोडून इथे काय करतां? तीहि चालवायची अक्कल नाही. नाहीतर कपडे ओलेच कसे राहिले? तुमच्या कपडे वाळवण्यातच काहीतरी चूक आहे वगैरे वगैरे. पण ते महापुरूष कांहीच ऐकू न आल्याचा बहाणा करीत होते. शेवटी ते एका इस्त्रीवाल्याकडून रांगेत उभे राहून कपडे वाळवून आले. इथे आल्यानंतर लोकांची अक्कल गायब होते कीं काय? बर्‍याच जणांनी कपडे धुतले होते वगैरे असावेत आणि ते वाळवण्यासाठी इस्त्रीवाल्याकडे आले होते. आम्हा इतर तिघांची लोकोत्तर पुरुष असल्यामुळे गोष्टच वेगळी.

आता आमचे कपडे कां ओले नव्हते हा प्रश्न वाचकांच्या सुपीक डोक्यात येणारच. याची गंमत सांगायलाच पाहिजे. अर्ध्यापॅंटचा एक तोटा म्हणजे गाडीत बसल्यावर ऊन आले तर मांडीपासून खालचे उघडे पाय फार भाजतात. या त्वचेला ऊन खाण्याची सवय नसते. मी ओला टॉवेल वगैरे कपडे पाय भाजू नयेत म्हणून पायावर घेत होतो. उन्हापासून संरक्षण तसेच कपडे पण वाळतात. पाहा किती हुशार मी. माझे पाहून देवाने व मास्तरांनी पण तसेच केले. कोडाई येण्यापूर्वी आमचे तिघांचे कपडे पूर्ण वाळले होते. अर्थात वातानुकूलन बंद असतांना. अख्खी पॅंट घातल्यामुळे जाड्या व नार्‍याला मात्र मात्र तसे करता आले नव्हते. हे दोघे कपडे वाळवून घेत होते तोपर्यंत आम्ही फेरफटका मारून आलो. आम्ही चविष्ट न्याहारी करून आलो म्हणून खोटेच सांगितले. पण ती थाप पचली नाही.

न्याहारीसाठी येथे सरवानपेक्षा जास्त चांगले काय असणार? तेथील एस्. टी. स्टॅंडसमोर आहे. तुरळक पाचदहा लोक उपस्थित होते. ऑर्डर दिली. तेवढ्यांत एकदम वीसपंचवीस तरुणांचे टोळके आंत घुसले. उरलेल्या सगळ्या जागा भरून गेल्या. कांही तरूण उभेच होते. उभ्याउभ्याच त्यांनी न्याहारी केली. तमिळमधून मोठमोठ्याने आरडाओरडा करीत होते. वेटर घेऊन येत असलेले सगळे पदार्थ ते मधल्यामधे त्याला अडवून घेत होते. आमच्यासारखे इतर लोक नुसते वाट पाहात स्वस्थ बसून होते. सगळ्यांचे रंग एकसारखे. मी त्यांच्यापुढे गोरा दिसायला लागलो. माझी रंगाची ऐट जिरल्याबद्दल इतर चौघांनी आनंद व्यक्त केला. अर्ध्यापाऊण तासाने ते त्रस्त समंध शांत झाले व बिल देऊन निघून गेले.

हिरवी चटणी, चिंचेची चटणी व टोमॅटो चटणी अशा तीन प्रकारच्या चविष्ट चटण्या व स्वादिष्ट सांबार भरपूर मनसोक्त प्रमाणात. इडल्या, डोसे, चांगले होते. जाड्यासाठी पोंगलहि होताच.फिल्टर कॉफीहि छान. अजून आठहि वाजले नव्हते. तेथून सरळ ज्या एजन्सीत गाडी बुक केली होती तिथे गेलो. म्हटले हा आपल्या हॉटेलवर जाऊन वाट बघणार, त्यापेक्षा आपणच तिथे जावे.

या गाडीचा विशीतला ड्रायव्हर तमिळ मुस्लिम होता. मुस्लिम असल्यामुळे त्याला थोडेफार हिंदी येत होते. पण हिंदी बोलतांना त्याला फार त्रास होत होता. अक्षरश: जिवाच्या आकांताने हिंदी बोलतोय असे वाटत होते. इथे देखील आता प्रचंड गर्दा होता. गर्दी म्हणून कल्पना येणार नाही. म्हणून गर्दा. पण आमचा ड्रायव्हर कम गाईड चलाख होता. स्थानिक ड्रायव्हर असल्याचा फारच मोठा फायदा झाला. येथील वाहातुकीचे नियम वेगळे होते. शिवाय प्रत्येक ड्रायव्हरचे नियम वेगळे होते. दहावेळा तमिळमधून खडखडाट करीत तोंड वाजवले तरच आपल्या वाटेतील एक गाडी बाजूला होणार. अन्यथा नाही. ती बाजूला झाली की दुसरी मधे आहेच. तेल्लीचेरीचे ड्रायव्हर जरूर लाजले असते. मुंबई पुण्याच्या ड्रायव्हरांची फार म्हणजे फारच गोची झाली असती. असो.

येथे एक हनीमून पॉइंट (कदाचित नाव वेगळे असेल) आहे. तेथेच सर्वप्रथम गेलो. येथील दरीच्या कडेने जाणारा वॉक घेतला की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. एखाद्या लोकप्रिय नटीच्या फॅन क्लबची इथे सहल आली तर तिचे काय होईल? असो. अतिशय थंड आणि उत्साहवर्धक हवा, आजूबाजूला आनंदाने आणि उत्साहाने भारलेला जनसमुदाय. दिवाळीत दादरला रानडे रोडवर असते तशी मोदभरी उत्साही गर्दी. पण आश्चर्य म्हणजे इथे लोकांनी चक्क रांग लावली होती. डाव्या बाजूला उंच जाणारा खडकाळ कडा आणि उजव्या बाजूला खोल दरी. तीत गच्च अरण्य. कांही ठिकाणी कठडा केलेला. याला हल्ली मराठीमध्ये ’रेलिंग’ असे म्हणतात. काही ठिकाणी जाळी. म्हणुन अपघात फारसे घडत नसावेत. पण अतिशय निसर्गरम्य ठिकाण. आता साताठ वर्षानंतर आठवत नाही. पण इथे चांगले पंचवीस वा पन्नास रू. दर माणशी असे शुल्क भरले होते. पण पैसा वसूल. वाटेत बारीक चिरून मीठमसाला पेरलेले पानावर दिले जाणारे कच्चे तोतापुरी आंबे, उकडलेले शेंगदाणे, केळी, इ. रानमेवा होताच. वातावरण ढगांनी वेढलेले. मध्येच दाट ढग येऊन चार फुटावरचे देखील दिसेनासे होई. मध्येच भास्करराव दर्शन देत. क्षणाक्षणाला बदलणारी प्रकाशयोजना. असे उत्कट क्षण कसे विसरता येतील. आणखी एक फार महत्त्वाची गोष्ट प्लास्टीकच्या पिशव्या कुठेहि नव्हत्या. हे लक्षात आल्यावर फार बरे वाटले. जवळजवळ पाचसातशे मीटरचा वॉक आहे. रम्य वातावरणात रमतगमत चांगला अर्धापाऊण तास आपण घालवतो. बरेच लोक जथ्यांनी आलेले होते. त्यांचे आपापसात मोठमोठ्याने हास्यविनोद करून खिदळणे चालू होते. पण तमिळमध्ये. त्यामुळे सतत ताशाचा खडखडाट व मधेमधे हास्यपेरणी असे वाटत होते. ओ का ठो कळत नव्हते. वॉक संपल्यावर आपण दुसरीकडेच उगवतो. अगदी दूरवरची वेगळी जागा. पण आपला चतुर सारथी आपल्या स्वागतास उपस्थित असतो. रस्त्याने हे बाहेर पडण्याचे ठिकाण आत शिरण्याच्या ठिकाणापासून अडीच एक कि.मी. दूर आहे असे त्याने सांगितले. पाहा स्थानिक गाडी केल्याचा फायदा किती ते. नाहीतर आम्हाला तासभर वेळ लागला असता मूळ ठिकाणी जाऊन गाडी शोधायला. इथले जसे ड्रायव्हिंग लोकोत्तर आहे तसे पार्किंगदेखील. कोणत्याहि गाडीसमोर कशीहि आडवीतिडवी गाडी उभी करतात. तुमची गाडी कशी बाहेर निघेल ते बघायला परमेश्वर समर्थ आहेच. गाडी पार्किंगमधून बाहेर काढतांना त्याने किमान आठदहा जणांशी तमिळमधून सुखसंवाद केला. आपण तर संध्याकाळपर्यंत तेथेच अडकून पडू. पण या पठ्ठ्याने पंधरावीस मिनिटात गाडी बाहेर काढली.

लिरील साबणाची दूरदर्शनवर एक जाहिरात आली होती. लाऽऽ लारालारालाऽऽ ची लकेर असे साथीला. ते चित्रीकरण इथेच झाले होते. या धबधब्याला लिरील धबधबा असे म्हणतात. खरेच नितांतसुंदर ठिकाण आहे. इथे आपण छायाचित्रे काढतोच. ट्विन रॉक्स म्हणून एक ठिकाण (पॉईंट) आहे. दरीपाशी उभे राहून समोर दरीपलीकडे एकमेकींना बिलगून उभ्या असलेल्या दोन प्रचंड शिळा दिसतात. तेच ट्विन रॉक्स. दाट धुक्यामुळे समोर दरी आहे की डोंगर आहे तेच कळत नव्हते. दरीपलीकडचे दिसण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे छायाचित्रे विकणार्‍यांना फारच चेव आला होता. मोडतोड विंग्रजी बोलत पोस्टकार्ड आकाराची छायाचित्रे घ्या म्हणून मागे लागतात. त्यांच्याकडील तॊ छायाचित्रे पाहूनच कळले की ते ट्विन सॉक्स कसे दिसतात. आम्ही खरोखरच ट्विन रॉक्सपाशींच होतो की नाही कोण जाणे. सगळीकडे ढग, ढग आणि ढग. गिरगांवात ‘भाऊ मोरोबा ढगे’ म्हणून एक दुकान होते. बहुधा कापडाचे. अजून आहे की नाही ठाऊक नाही. म्हणून ढगांचे आम्ही ‘भाऊ मोरोबा’ असे पूर्वीच्या एका माथेरान सहलीत बारसे केले होते. ढग आला की ‘भाऊ मोरोबा’ आले रे आले असे ओरडत होतो. ते चालू ठेवले. आमचे शब्द कानावर पडणार्‍या एखाद्या तमिळ माणसाला थोडेफार मराठी कळत असते तर त्याने ढगाला भाऊ मोरोबाच म्हटले असते. अशाच अनेक गंमती जंमती. खरेच प्रत्येकात एक आठदहा वर्षांचा व्रात्य मुलगा दडून असतो. सहलीवर तो जागॄत होतो. हेच जिवंतपणाचे लक्षण आहे.

दिवसभर मनमुराद भटकलो. संध्याकाळ झाली तसे हॉटेलवर पोंचलो. नांदेडकर मॅसांनी मराठीतून नमस्कार असे अभिवादन केले. हे होते तसे मनमिळाऊ आणि व्यवसायिक. पण त्यांच्या चेहर्‍यावर एक तुसडेपणची झांक होती. म्हणूनच हॉटेल रिकामे असावे कां? की गांवाच्या कडेला असल्यामुळे? असो.

रात्री पायी फिरायला गेलो. दोनएक कि.मी. त्या हवेत हे फारसे मोठे अंतर नाही. वरूणराजांनी अजिबात त्रास दिला नाही. मास्तरांनी मुलीसाठी जीन्सची खरेदी केली. घासाघीसमहर्षि मदतीला होतेच. आता गुढगे टेकणे. मास्तर व देवाचे गुढगे टेकून झाल्यावर शेटजींनी नंबर लावला. गुढगे टेकून परत आला आणि पाहातो तर काय? त्याचा चेहरा पूर्ण विस्कटला होता.

फोन त्याच्या नववीत असलेल्या मुलीने घेतला होता. ती प्रथम कांही बोलूच शकली नाही. फक्त रडली. आजी (शेटजींच्या सासूबाई) अत्यवस्थ. आईला ताप आलाय. काय करूं? छोटा भाऊ जेमतेम चौथीतला. तो काय तिला आधार देणार? नार्‍याला त्वरित घरी जाणे आवश्यक होते. त्वरित जायलाच पाहिजे असे स्पष्ट दिसत होते. पण कसे? तीन विमानतळ जवळ होते. कोईंबतूर, चेन्नई आणि कोचीन. एकहि ठिकाण आत्ता रात्री जाण्यासारखे नाही. विमनस्क मनस्थिती म्हणजे काय! याचा अनुभव आम्हांला मिळत होता. बरीच चर्चा झाली. काथ्याकूट झाला. त्याला कोणत्यातरी विमानळावर आम्ही सोडायचे हे नक्की झाले.

आता विमानाची वेळ. पर्यटनाचे ठिकाण असल्यामुळे येथे ट्रॅव्हलिंग कंपन्या अनेक आहेत. एवढ्या रात्री शेवटी एक उघडे मिळाले. सुदैवाने त्याला थोडेफार इंग्रजी येत होते. फिरंग्याने हे एक काम फार चांगले केले. फिरंग्याच्या भाषेमुळे आपल्याला दाक्षिणात्यांशी संपर्क साधता येतो. विमानफेरीच्या वेळा पाहिल्या. चेन्नईपासून बरीच होती. पण चेन्नईला पोचायला एक दिवस जास्त लागणार. मी म्हटले अरे उद्यापर्यंत परिस्थितीत बरीच सुधारणा होईल. दिवस तसेच थोडेच राहाणार?
म्हणजे काय होईल?

दोघींच्याहि प्रकृतीत सुधारणा. आणि व्यावहारिक दृष्टीने विचार कर. मास्तर म्हणाले तुझ्या उपस्थितीने काय फरक पडणार? जे काय करायचे आहे ते डॉक्टरच करणार. तू फक्त विशिष्ट वळणावरचे निर्णय घेणार. ते तू इथे राहून पण घेऊं शकतो. फक्त तुझ्या उपस्थितीने तुझ्या मुलीला व दोन्ही रुग्णांना मानसिक बळ मिळेल. तू पुन्हा तिला फोन लाव. तसे तिला समजावून सांग. पाहिजे तर आम्ही पण तिच्याशी बोलतो. तत्पूर्वी तिला ज्या दोन सख्ख्या मावशा आहेत त्यांना पण सतर्क राहायला सांग. त्या मुलीला मानसिक आधार मिळणे महत्त्वाचे आहे. जरूर पडल्यास तू केव्हाहि निघू शकतोस व दोन तासात पोहोचू शकतोस असे सांग. इतर दोघांचेहि असेच म्हणणे पडले.
क्रमश:

No comments: