Sunday 29 June 2008

वाट फुटेल तिथे - ३

मडिकेरी : दोन सेनापतींचे सुंदर गांव

३ ऑक्टोबर २०००.
सुरेख हवेमुळे पोटातील कावळे जागे झाले. त्यामुळे जेवण पूर्ण स्किप न करता पोटात हलके पदार्थ स्किप करुन सोडावेत असे ठरवले. वाटेत एक छोटेसे गांव लागले. खाण्याची टपरी कुठे दिसते काय हे पाहू लागलो. चौकशी करु लागलो. हिंदी इंग्रजी कुणाला कळेना. जेवण्याची खूण करुन इडली डोसा हे शब्द उच्चारु लागलो. एक चौकात पार्किंगला चांगली जागा दिसली. जवळील दुकानदाराला गाडीवर लक्ष ठेवायला विनंति केली. अर्थात खुणेने. उतरुन आरोग्य भवनाचा शोध घेतला. अखेर एक किशोरवयीन मुलाने एका छोट्याशा गल्लीत नेले. एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीत एक छोटेसे शंकर विलास छाप हॉटेल दाखवले. बसलो. साठीच्या आसपास दिसणारी एक महिला आतून बाहेर आली. तिनें कन्नडमध्ये काहीतरी विचारले. माझ्या डोक्यात कांहीच शिरले नाही. मीं हिंदीत बोललो. तिथे अंधारच. मी कोकणीतून विचारले 'खावच्याक कित मॅळतले' म्हणून. (गोव्यातील कोकणीत खावपाक म्हणतात) पुन्हा अंधारच. माझ्या कोकणी भाषेच्या अज्ञानाची व कोकणी बोलण्याच्या क्षमतेच्या यथेच्छ चिंध्या. हा (मी) गाढव आहे की नाही? जाड्याने विचारले. तिला बोध झाला नाही परंतु तिची करमणूक झाली. जाड्या म्हणतो ते बरोबर की नाही असे त्या देवाने तिला विचारले. अर्थातच अर्थ न कळता त्या धोरणी महिलेने ताबडतोब मान हलवून होय म्हटले. भरपूर हशा पिकला. पण असे घडले हे माझ्यासारखा सूज्ञ अजूनहि कबूल करीत नाही. मग इडली डोसा शब्द उच्चारले. तिने होय म्हटले. युरेका युरेका. जवळ जवळ अर्धा तास वाट पहावी लागली. चांगला ब्रेक मिळाल्यामुळे कृष्णराज व शल्यराज खूष होते. आतून मसाल्याचे वास येऊ लागले. आत कावळ्यांना नाकाची कुमक मिळाली. रगड्यावर चटणी वाटल्याचा आवाज आला. शेवटी चुर्रचुर्र आवाज येऊ लागला व क्लायमॅक्स़ जवळ आल्याची जाणीव झाली. अखेर ते सेट डोसा नावाचे गरमागरम पूर्णब्रह्म समोर आले. असा सुरेख सेट डोसा आजतागायत आम्ही खाल्ला नाही. चटणी सांबार हवे तेवढे. ती चव ते जंगलातील गावातले सुरेख हवेतील भारलेले वातावरण (माहोल) आमच्या सर्वांच्या मनांवर कायमचे कोरले आहे. उर्दू वाचन त्याहून सुरेख. सव्वाएक तासाने तृप्त होऊन त्या अन्नपूर्णेला दुवा देऊन निघालो.

सुब्रमण्यम चा फाटा गेला. चहाचे मळे दिसायला लागले. तोपर्यंत ते मी फ़क्त भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील चित्रांत व फ़ोटोतच आणि अर्थातच हिंदी सिनेमात पाहिले होते. माझी उडी माथेरान, महाबळेश्वर, मालवण, गोवा, अहमदाबाद, कारवार, शिरसी व अजिंठा याच्यापुढे गेली नव्हती. पाचच्या सुमारास डोंगराच्या कुशीतील स्वप्नातील दृश्यासारखे मनोरम दिसणारे गाव दिसू लागले व सर्वजण हरखून गेलो. आधीच हिल स्टेशन. त्यातून डिस्ट्रिक्ट फ्लेस. त्यामुळे उर्दू वाचन फ़ार होते. डबल ऑक्युपन्सीला १२०० पासून २५०० पर्यंत . त्या मानाने सुविधा नाहीत. आम्ही कोठून आलो याची चौकशी आधी करीत. आम्ही मुंबईचे पाहून चढे दर सांगत. गाडीचा नंबर काही लपत नाही. एकदोन ठीक होती पण पार्किंग चांगले नव्हते. कर्नाटक टुरिझम अर्थात के टी डी सी मध्ये गेलो. छापील दर. रुम्स यथातथाच होत्या. पण पार्किंगची जागा प्रशस्त आणि सुरेख. मागील बाजूने दरीला लागून असलेले अत्यंत रमणीय ठिकाण. भरपूर रिकाम्या रूम्स. साहाजिकच निवडीला जास्त पर्याय उपलब्ध. एक आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला. के टी डी सी चे मॅनेजरसाहेब छान मराठी बोलत होते. कालपर्यंत पाऊस अक्षरशः वेड्यासाखा कोसळत होता. सतत चार महिने मुसळधार पावसाने वेड लागायची पाळी आली होती. तुमच्यासारखी खुल्या दिलाने बोलणारी माणसे पाहून फ़ार आनंद झाला असे म्हणाले. त्यांनी दोन दिवस खरेच खाजगी कंपन्यांनी लाजावे आशी उत्तम सौजन्यपूर्ण सेवा पुरवली. अर्थातच याचे थोडेसे श्रेय जाड्याकडे व माझ्याकडे जाते. जाड्या हा एक चांगला मार्केटिंग मॅनेजर व मी चांगला पी आर ओ (जरी प्रशासकीय खात्याचा असलो तरी) आहे. साहजिकच आमच्या जिभेवर मधाची कोठारे आहेत. कृपया मधमाशांना आमचा पत्ता देऊ नका. पंचाईत होईल. आमच्या तीन वर्षानंतरच्या पुढील दोन सहलीत याचा चांगला अनुभव आला. जेवण आमच्याच कॅंटीनमध्ये करा. येथील जेवण उत्तम असते. असे जेवण येथे दुसरीकडे मिळणार नाही. येथील स्थानिक लोक बाहेर जेवायला म्हणून निघाले की येथेच येतात. मॅसा नी सांगितले. आम्ही त्यांच्या कर्तव्यतत्परतेची ताबडतोब वाखाणणी केली व तसेच करण्याचे ठरवले. मराठी बोलणार्‍या व्यक्तीने त्यातून सरकारी - एवढे सौजन्य व अगत्य दाखवावे हे आश्चर्यच.

या रम्य ठिकाणी दोन रात्र राहायचे असे अगोदरच ठरले होते. मास्तर व देवा यांचे हे प्लानिंग अफ़लातून असते. डोळे झाकून मम म्हणावे. ऐसपैस प्रशस्त खोल्या. मागील दरीच्या बाजूस बाल्कन्या. सुरेख. रुम्स आतून एम टी डी सी च्या रुम्सप्रमाणे कळकट. त्यामुळे शोभा अजून कमी होण्याचा प्रश्न नव्हता. ताबडतोब दोर्‍या लावल्या व कपडे धुण्याचे जाहीर केले. दोघेजण कपडे धुवून आंघोळी आटपेपर्यंत तिघांनी मस्त झोप काढली. कपडे धुवून आंघोळी करुन ताजेतवाने होऊन पायी फ़िरायला बाहेर पडलो. मॅसा नी येथील जेवण सर्वोत्कृष्ट आहे म्हणून सांगितले होते. त्यामुळे जेवण्यास येथेच यायचे होते. मडिकेरी ही कुर्ग जिल्ह्याची राजधानी आहे. या जिल्ह्याने भारताला दोन सेनापती दिलेले आहेत. ज. करिअप्पा आणि ज. बेवूर देवाने जाहीर केले.

मॅसा च्या ओळखीने दुसर्‍या दिवशी आजूबाजूची चांगली ठिकाणे पाहण्यासाठी खाजगी गाडी ठरवली. आमच्या चक्रधारींना तेवढाच एक दिवसाचा ब्रेक. मॅसा नी केटीडीसी चे माहितीपत्रक दिले होतेच. कोणकोणती ठिकाणे पाहावीत हे नंतर ठरवू. पदयात्रेला निघालो.

आपले विश्रामधाम (इंद्रजाल कॉमिक्समधील उर्फ़ वेताळाच्या कॉमिक्समधील वाम्बा विश्रामधाम आठवले का?) मडिकेरी शहराच्या सर्वांत उंचावरच्या ठिकाणी आहे. आवारातून बाहेर पडतांनाच चांगलाच उतार आहे. बाजूलाच उजवीकडे फ़र्लांगभर अंतरावर किंग्स पॉईंट की सुलतान पॉईंट की जनरल पॉईंट आहे. आता बरोबर आठवत नाही. पण तो राजा, जनरल की सुलतान येथे येऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत असे. त्यामुळे हे नाव पडले. काहीहि असो. अशा रम्य ठिकाणी येऊन बसणार हा मनुष्य नक्कीच रसिक होता म्हणायचा. इथून लगेच रस्ता डावीकडे वळतो. जरासे पुढे उतारावरील कोपर्‍यावर एक सिनेमा थिएटर आहे. रस्त्याने चालतांना आजुबाजूंनी सजून फ़िरायला जाणार्‍या कुटुंबांचे आनंदी व उत्साही घोळके दिसत होते. कांही लोक खरेच केटीडीसीच्याच कॆंटीनच्या दिशेने सहकुटुंब (बहुधा जेवायला) जात होते. किंग्स पार्कनंतर केटीडीसीखेरीज दुसरे काही नाही. डेड एंड. त्यामुळे ते तेथेच जात होते. असो. सिनेमाथिएटरच्या दरवाजांत थोडी गर्दी दिसली. साउंड सिस्टीमवरील मंद कर्नाटक शास्त्रीय संगीताने वातावरण धुंद केले होते. आत शास्त्रीय संगीताच्या मैफ़िलीचे वातावरण दिसत होते. अशी पर्वणी पाहून मी मोहरून गेलो. वर जाऊन चौकशी केली. स्वागतासाठी कही सद्गृहस्थ दरवाजाबाहेरच उभे होते. यांनी अगत्याने माहिती दिली. तो एका शास्त्रीय नृत्यसंस्थेचा सोहळा होता. दरवर्षी येथे शास्त्रीय नृत्याच्या स्पर्धा नवरात्राच्या पहिल्या दिवशी सुरु होतात व दसर्‍याच्या दिवशी निकाल व ब़क्षीस समारंभ होतो. प्रवेश विनामूल्य असतो. त्यांनी आग्रहाचे निमंत्र्ण दिले. आता अशी गोष्ट सांगतो की दाक्षिणात्यांच्या कलाप्रेमाला त्रिवार प्रणाम कराल. माझी हॅट ऑफ़. थिएटरमालक स्पर्धेसाठी थिएटर विनामूल्य देतात. मी रस्त्यावर परत आलो. सगळे दूर पुढे गेले होते. मी अति उत्साहात न सांगता गायब झाल्यामुळे मला शोधत होते. त्यांना सांगितले. सर्वांनी याचे कौतुक केले. परंतु अर्धापाऊण तास फ़िरून मग येण्याचे ठरले. नाक्यानाक्यावर थिएटर्स होती व सगळीकडे तसाच नृत्यस्पर्धेचा सोहळा होता. नाक्यानाक्यावर थिएटर्स होती व सगळीकडे तसाच नृत्यस्पर्धेचा सोहळा होता. प्रवेश विनामूल्य. तेव्हापासून माझी हॅट कायम ऑफ़ आहे. मुंबईत भर उन्हाळ्यात सुद्धा वातानुकूलन यंत्राचे विजेचे बिल कमी यावे म्हणून पैशाला हपापलेले थिएटरमालक सिनेमा चालू असतांना वातनुकूलन यंत्र मधेच बंद करतात. रसिक उकडून मेले काय किंवा बाहेर गेले काय! तिकिटाचे पैसे मिळाल्यावर त्यांना सोयरसुतक नसते. मी किमान पाचसहा वेळा वेगवेगळ्या थिएटरमधून सिनेमा सोडून गेलो आहे. अपवाद द़क्षिण (पुन्हा दक्षिणच बरे का) मुंबईतील इंग्रजी चित्रपट दाखविणार्‍या थिएटर्सचा. गेल्या वीसएक वर्षानंतर मी थिएटरमध्ये सिनेमा पाहिला तो होम अलोन. एक्सेलसिअरमध्ये. मुलाला दाखविण्यासाठी. सुदैवाने तेव्हा मात्र तसे काही झाले नाही. ते द़क्षिण मुम्बईत आहे. असो. हवा अप्रतिम होती सुमारे १५ ते १८ अंश सें. सापेक्ष आर्द्रता २५ तो ३५ च्या दरम्यान. ही सगळी अनुमाने. उपकरण आपली त्वचा. पण हवा उत्तम म्हणजे कशी हे कळावे म्हणून सांगितले. सगळीकडे घरोघरी, दुकानोदुकानी फ़ुलांची व दिव्यांची तोरणे लावलेली. दाक्षिणात्य शास्त्रीय संगीताचे मंजुळ ध्वनि, नवे पोषाख परिधान करुन येणारे जाणारे लोक, हलकेच उतरणारे धुके, भूलोकीचा स्वर्गच हा. स्वप्न याहून काय वेगळे असते?.

थोडे फ़िरल्यावर भुकेची जाणीव झाली व मागे फ़िरलो. मासे नसल्यामुळे शाकाहारीच जेवण करण्याचे ठरले. थंडी वाढून तापमान बहुधा पंधराखाली घसरले असावे. चविष्ट जेवण, प्रसन्न मनस्थिति व छान हवा त्यामुळे दुप्पट जेवलो. येथील डायनिंग हॉल प्रचंड आहे. त्यामुळे गर्दी जाणवली नाही. विश्रामधाम तसे रिकामेच होते. बाहेरील स्थानिक लोकच जास्त होते. मॅसा खरेच बोलले होते. शेटजींनी ऋचिपालट म्हणून एक डिश चिकनची मागवली. ती फारच चविष्ट असल्याचा अभिप्राय जाड्याने दिला. मास्तरांनी परीक्षण करुन हा अहवाल सत्य असल्याची साक्ष दिली. मी व देवा तसे शाकाहारप्रेमी. आम्ही आमच्या पदार्थाना चांगला न्याय दिला. कितीहि चांगले जेवण असो. नार्‍या नाक मुरडतोच. तो देखील (जेवणात नसलेले) मूग गिळून होता. हेच मोठे प्रशस्तिपत्र होय. उर्दूवाचन माफ़क व योग्य होते. पैसा वसूल. मॅसांचे आपुलकीच्या सल्ल्याबद्दल आभार मानले. कडक थंडी व धुक्याचा आस्वाद घेण्यासाठी पुन्हा फ़िरायला बाहेर पडलो. मास्तर व देवा यांच्या श्रमांना आलेले फ़ळ फ़ारच रसाळ होते. आज सात वर्षानंतर सुद्धा या आठवणीनी मला हे टंकतांना पुनरानुभव येत आहे व रोमांच उभे राहताहेत. पीसीओवरुन घरी फ़ोन केले. तेव्हा मोबाईल कॉलचे दर फ़ार होते. बहुधा रात्री ४ रू. व पीक अवर्समध्ये १६ रू. मिनिट. रेंज पण ठराविक ठिकाणींच मिळत असे. फ़ोनवर बायकोशी बोलतांना विवाहितांनी (जाड्याच्या म्हणण्याप्रमाणे) नेहमीच्या सवयीमुळे गुढगे टेकल्यामुळे या सोहळ्याचे जाड्याने गुढगे टेकणे असे नामकरण केले. हा वाक्प्रचार आम्ही अद्याप वापरतो. अकराच्या सुमाराला एका स्वप्नातून दुस-या स्वप्नात जाण्यासाठी सज्ज झालो.

४ ऑक्टोबर २०००.
नेहमीप्रमाणे पाचला उठलो. मस्त थंडी होती. बहुधा दहाबारा अंशांच्या आसपास असावी. व्यायाम वगैरे आटोपून सहासव्वासहाला बाहेर पडलो. शेटजी नुकतेच उठत होते. दाढी केल्यावर फ़ारच ताजेतवाने वाटले. शेटजीचे आटपेपर्यंत रस्त्यावरून एक पायी छोटीसी रपेट करून आलो. आंघोळ संध्याकाळी करायचे ठरले. ठरल्याप्रमाणे आम्ही पावणेसातला तयार झालो. पाचच मिनिटात आमची गाडी आली. ऍम्बॅसॅडर होती. शेटजी व मी दोघे बारीक लोक पुढे बसलो. मास्तर, जाड्या व देवा मागे. मास्तरांना व देवाला क्वचितच मागे बसायला मिळते. बरोबर सातला ठरल्याप्रमाणे निघालो. दोनतीन ठिकाणे पाहून झर्‍यावर गेलो. वेलचीची, कॉफ़ीची, कोकोची मिरीची आणि जायफ़ळाची झाडे पाहिली. छोटासा धबधबा होता. त्याचे पाणी प्यालो. त्यासमोरच एक छोटासा पूल होता. फ़ोटो काढायला फ़ार सोयीचा होता. फ़ोटो काढले. या ठिकाणची एक गंमत नार्‍याने जाड्याच्या घेतलेल्या फ़िरकीमुळे आमच्या वर्तुळात फ़ारच गाजले. अजूनहि गाजते आहो. इथे एक शीतपेयांची टपरी आहे. एक महिलेने चालविलेली. एक मध्यमवयीन महिला व तिची तरूण मुलगी. आम्ही जिथे झर्‍याचें पाणी प्यालो तिथे जाड्या देखील पाणी प्याला. पण त्याने या टपरीवर बिसलेरीची बाटली घेतली. खरे म्हणजे ती नंतर गाडीत पिण्यासाठी घेतली. पण नार्‍याने आरोप केला की ती टपरीवरच्या तरुणीकडे पाहूनच घेतली. या बाटलीचे चौदा रुपये अजून नार्‍याने जाड्याला दिलेले नाहीत. कारण काय? तर म्हणे मोटिव्ह इज नॉट फेअर. अजूनहि आम्ही जाड्याला या विषयावरून छळतो. निसर्गधाम या अभयारण्याकडे निघालो.

नदीच्या प्रवाहातील एक प्रचंड बेटावर हे आहे. गाडी प्रवेशाजवळ सोडावी लागते. झुलत्या पुलावरुन प्रवेश करावा लागतो. साधारणपणे साडेनऊ दहा वाजले असावेत. गाडीचा नंबर कंडक्टर कम मुनीमजी ऊर्फ़ शेटजीनी लिहून घेतला होताच. आमच्या ड्रायव्हरच्या ओळखीचा गाईड घेतला. तिथे नवरात्राचा स्थानिक उत्सव चालू असल्यामुळे व सीझन अद्याप सुरु न झाल्यामुळे यात्रेकरु जवळ जवळ नव्हते. समुद्रसपाटीपासून फ़ारसे उंच नसल्यामुळे किंचित उकडत होते. गर्द वनराईमुळे तसे आल्हाददायकच वाटत होते व वाढत्या उन्हाचा कडाका जाणवला नाही. आंबा, चिंच, साग, इ. माहितीचे तसेच मीं पूर्वीं न पहिलेले प्रचंड व विविध वृक्ष, मध्येच बांबूची बने, विविध वेली व झुडुपे,विविध प़क्षी होते. प़क्षी जरी सहज दिसत नसले तरी त्यांचे कूजन सतत चालू होते. काळ्या तोंडाची बलदंड माकडे, एखादे मुंगूस, मुंग्यादि कीटक आणि आम्ही वगळता प्राणी फ़ारसे दिसले नाहींत. मध्येंच नदीचे उपप्रवाह होते. ते ओलांडण्यासाठी साकवांची योजना केली होती. विविध रंगांची पोहोणारी व उडणारी बदके व चारपाच प्रकारचे बगळे पाहिले. मल्हाराचा अंमल अद्याप न संपल्यामुळे नदीचे पाणी लाल होते. म्हणून मासे व जलसृष्टी साकवावरून दिसू शकली नाही. ठिकठिकाणी झाडांवर वेगवेगळ्या प्रकारची मचाणे बांधली होती. त्यावर चढून फ़ोटो काढण्याचे पवित्र कार्य उत्स्फ़ूर्तपणे पार पाडलेच. मचाणांवर चढणे तसे सोपे नाही. तंदुरुस्त असल्यावर मात्र कांही वाटत नाहीं. परंतु जास्त उंचावरील मचाणावरुन दिसणारे दृश्य मात्र विहंगम (पॅनोरमिक) दिसते. किती सुंदर याची कल्पना खालून येणार नाही. काही मचाणाचे दोरखंडाच्या शिड्या फ़ारच जुन्या व कोरम झाल्या होत्या. त्यावर फ़क्त मी, शेटजी व देवाच जाऊ शकलो. कमी वजनाचे किती हे फ़ायदे! हो ठिकाण सुंदर व रम्य होते. साडेबाराच्या सुमाराला जड पावलांनी तेथून निघालो. गाईडमुळे बाहेर पडण्याचे ठिकाण शोधायला लागले नाही. ते बहुधा प्रवेशापासून एकदीड फ़र्लांगावर असावे - त्याच रस्त्याला लागून होते. गाडी ड्रायव्हरने बरोबर योग्य ठिकाणी उभी केली होती. गाईड व ड्रायव्हर दोघांनी आमचा तासभर तरी वाचवला होता. आता विरुद्ध बाजूला जावयाचे होते.

विश्रामधाम वाटेवरच होते. पोटभर सुग्रास जेवण जमलेच तर १५ - २० मिनिटंची वामकुक्षी व दुसर्‍या बाजूची स्थळे पहाणे. प्लान जरी एकमेकांच्या मतांनुसार लोकशाही पद्धतीने का होईना परंतु फ़ारच कौशल्याने तयार केला होता. सारथ्यांचा यात सिंहाचा खरे म्हणजे १०० टक्के वाट होता. कारण सारथ्थ्याच्या सोईनुसार स्थानिक नकाशा पाहून आखला होता. मूळ कल्पना त्यांचीच होती. आमचे सोडाच जाड्यासारख्या दिशाभ्रमिष्टाचेहि मत घेण्याचा मोठेपणा त्यांनी दाखविला. आम्ही फ़क्त ती योजना न बुडविण्याचे पुण्य(कृत्य) केले होते. क्रिकेटमधील फ़लंदाज जोडीदारावर जसा विश्वास ठेऊन धाव घेतो तसे. या विश्वासाचे त्यांनी सोने केले. पुढील सर्व दीर्घ पल्ल्याच्या सहलीत तोच साचा कायम ठेवला. ते तिघे देखील हॉटेलच्या बाबतीत मी व जाड्या या जोडीवर असाच विश्वास ठेवीत आले.

पुन्हा घाटमाथ्यावर आल्यामुळे ऊन जाणवत नव्ह्ते. तपमान पंचवीसच्या आसपास असावे. विधा वर आल्यावर पटापट थंड पाण्याने आंघोळी केल्या. अर्थातच चोवीस तासांत दुसर्‍यांदा आंघोळ केल्यामुळे हिंदु धर्म बुडेल काय असे आम्ही मास्तरांना म्हणजे विचारले. मास्तरांनी हरकत नसल्याचा निर्वाळा दिला. एका सच्छील ब्राह्मणाचीच आज्ञा ती. त्यामुळे अजून काही आम्ही धर्मभ्रष्ट झालो नाहीं. आपला धर्म अजून शाबूत आहे बरे का. जेवलो. खरोख्रच १५ मिनिटांची वामकुक्षी घेतली. त्या हवेत या छोट्या विश्रांतीचा केवढा परिणाम जाणवला. पुन्हा तंदुरुस्त होवून उत्साहाने ओसंडून गेलो. जणु कांही सोळा सतरा वर्षाचेच होतो. मन तरूण हवे हेच खरे. अडीचच्या दरम्यान निघालो. एकदोन पॉईंट्स पाहून ऍजेंड्यावरील ठळक ठिकाण असलेल्या धरणावर गेलो. कडक ऊन. तरीहि तपमान फ़क्त सुमारे तीसएक अंश असावे. नदीवरून गार वार येत होता. देवातील घिसाडी म्हणजे अभियंता जागा झाला. कर्म-धर्म-संयोगाने त्याला धरणावरील एक अभियंता भेटला. पाणी कसे सोडतात, टर्बाईन्स कशी फ़िरतात, जनित्रे कशी फ़िरतात याचा त्याने तासभर अभ्यास केला. त्याची टवाळी करायला आम्हाला आणखी वाव मिळाला. संध्याकाळपर्यंत परतलो. पुन्हा एकदा मास्तरांच्या परवानगीने आंघोळ केली. परंतु गरम पाण्याची. गर्व से कहो हम ... असो. विधा वर गरम पाणी फ़क्त सकाळी मिळते. पण मॅसा नी खास सोय केली.

लवकर जेवून पुन्हा नऊसाडेनऊला ते धुक्यातील स्वप्नमय वातावरण अनुभवण्यास बाहेर पडलो. तशीच हवा, तशीच धुक्याची दुलई, थिएटरबाहेरचे तेच वातावरण, तेच संगीत. काळ तिथेच थबकला तर काय बहार होईल? आणि तेच गुढगे टेकणे. मी व जाड्याने घरी फ़ोन केले व रस्त्यावर मास्तरीण काय म्हणत असेल, शेटजीणबाई व सौ देवा काय बोलत असतील व आपल्या मित्रांना कसे फ़ैलावर घेत असतील व आपल्या मित्रांना असे वारंवार गुढगे टेकल्यामुळे कशी लौकरच गुढगेदुखी होईल अशा आचरट कल्पना करीत खिदळत उभे होतो. विधावर परतलो.

येथून केरळात तेल्लीचेरीला कोठून जायचे त्याचे मॅसाकडून मार्गदर्शन घेतले. त्यांनी आजची सफ़र कशी झाली याची आस्थेने चौकशी केली. व पुढील मार्गदर्शन मोठ्या उत्साहने केले आणि पुढील प्रवासाला शुभेछा दिल्या. दुसर्‍या दिवशी सकाळीच बिल तयार ठेवायला सांगितले. दोरी सोडवली. पॅकिंग केले. दुसर्‍या दिवशी मॅसांनी खरोखरच साडेसहाला बिल दिले. चहाची पण व्यवस्था केली. कोण कोठले मॅसा - एक सरकारी अधिकारी. कोठे त्यांची तत्पर व हसतमुख सेवा, मैत्रीपूर्ण, सौहार्दाचे नम्र वागणे आणि कोठे रत्नागिरीची खाजगी सेवेतील आळशी ढिलाई.

क्रमशः

पूर्वप्रसिद्धी:http://www.misalpav.com/node/910

No comments: