Tuesday 17 November 2009

वाट फुटेल तिथें - १०

१२-१०-२०००

बैकमपाडीला मुंबईसारखीच हवा. पण प्रदूषण नसल्यामुळे पहाटे किंचित गारवा. आंघोळी आटपून साडेसहाच्या सुमारास खाली उतरलो आणि आश्चर्याचा गोड धक्का. त्याच मालकाचे तळमजल्यावरचे कार्यालयाच्या बाजूचें उपाहारगृह पूर्ण भरात चालू होते. मुंबईतले एखादे उडप्याचे हॉटेल असते तस्से. उपमा, शिरा, इडली, मेदू वडा, सांबार वगैरे सर्व पदार्थ उपलब्ध. ताजे आणि गरमागरम. अशा अन्नाचा अवमान करणे म्हणजे महापापच. सेवाहि त्वरित. न मागतां टेबलवर पाण्याचे पेले हजर होतात. भरलेले पेले त्वरित रिकाम्या पेल्यांची जागा घेतात. अगदी मुंबईप्रमाणे. हॉटेलचे राहाण्याचे बिलहि त्वरित उपलब्ध. नार्‍या बिल चुकवेपर्यंत तिघांचे खाणे आटोपले. नार्‍याचे खाणे आटपेपर्यंत गाडी पेट्रोल भरून, हवा तपासून तय्यार. सव्वासातच्या सुमाराला निघालो.

कर्नाटकात आल्यामुळे आता घरांची गर्दी विरली होती. राममा १७ च्या दुतर्फा मस्त झाडी. बैंदूर, भटकळ, होनावर इ. गावांच्या मधून महामार्ग जातो. पाण्याच्या बाटल्या इ. गरजेच्या वस्तू रस्त्यालगतच मिळतात. वस्ती कमी झाडे जास्त त्यामुळे बरे वाटते. होनावरच्या आसपास एके ठिकाणीं नदी समुद्राला मिळते. समुद्रावरून मस्त वारा वाहात असलेला. काही अंतरावर वार्‍यामुळे दिमाखात झावळ्या डोलवणारे माड गर्दीने उभे. त्या माडांच्या गर्दीतून नदीचें प्रशस्त पात्र डौलदार वळणावळणानें रुबाबात वाट काढून आलेले. थोडे मुंबईच्या दिशेने पुढे गेले की दोन्ही बाजूंना लडिवाळ लाटा खेळवणारे निळेभोर पाणी आणि मधून काळाभोर डांबरी रस्ता. वर आल्हाददायक तश्शाच निळ्याभोर सॅटीनचें चकचकीत आकाश. चकचकीत सोनेरी ऊबदार ऊन. एरवी गाडी थांबवायला कुरकुरणारा देवा चक्क गाडी थांबवून तो निसर्ग डोळ्यांत साठवायला खाली उतरला देखील. बाजूला एका टपरीवर शहाळी, चहा, शीत पेये, पाण्याच्या बाटल्या इ. होते. पंधरा मिनिटे थांबूनदेखील कुणाचाच पाय निघत नव्हता. रूपगर्विता धरतीचे विभ्रम मनात साठवतच निघालो.

मुर्डेश्वरला शंकरमूर्ती दिसलीच. पण डावी कडे न वळतां सरळ मुंबईच्या दिशेने मार्गक्रमणा चालू ठेवली. कारवार दिसल्यावर पुन्हा एकदा हर हायनेस प्रिन्सेस ऑफ नन्दनगद्दा वगैरे झालें. गोव्यात पोहोचलो तरी मडगाव, पणजी, इ. ठिकाणीं न थांबता सरळ म्हापसा गाठलें. वाईन शौकिनांनीं वाईनची खरेदी केली. वाईनच्या वाहातुकीला परवाना लागत नाहीं. जीटीडीसी मध्यें उतरलों. उदास पिवळा रंग, तोहि ठिकठिकाणी उडालेला वा पोपडे आलेला. पण भरपूर खोल्या उपलब्ध. त्यातल्या त्यात कमी वाईट, बाजूबाजूच्या खोल्या घेतल्या. उत्फुल्ल मनस्थितीमुळें त्या कळकट खोल्या पण राजमहालासारख्या वाटल्या. संध्याकाळी गप्पा मारताना यापुढे अश्शाच सफरी नेमाने करायच्या. महिन्यातून किमान एक सहल करायची. आणि वर्षातून एकदा किमान एक पूर्वी कधीहि न पाहिलेल्या नवीन ठिकाणी. वर्षाला, किमान वर्षाआड दीर्घ दौरा. ठरले. आम्ही नुसते ठरवले की ते करतो. कोणालाहि आणाभाका घ्याव्या लागत नाहीत. त्यामुळे नंतर खरेच अशा एक वर्षाआड सफरी झाल्या. आता प्रवासाचा शीणहि अजिबात जाणवत नव्हता. उत्फुल्ल मनस्थितीत काय जेवलो ते आठवत नाही. गुढगे टेकण्याचा समारंभ झाला. सोनेरी क्षण आठवीत गप्पा मारतांना कधी अकरा वाजले कळले पण नाही.

१३-१०-२०००
म्हापशाहून सक्काळी सातला निघालो. वाटेत कुठेतरी खाऊं असे ठरवले. थोड्या वेळाने जाड्याला भूक लागली. त्यामुळें इतर चौघे चेकाळले. एकमेकांकडे न पाहतांहि एकमेकांच्या मनांतले विचार चौघांना समजले. रडवा जाड्याला. होऊं देत भुकेनें कासावीस. बघता बघता हातखंब्यापर्यंत पोहोचलो. एकेठिकाणी मराठी पदार्थ मिळतील अशी पाटी होती. थांबलो. आता जाड्याच्या जिवात जीव आला. हॉटेलातला पोर्‍या बाहेर आला. पोहे संपले, शिरा संपला, फक्त इडली आणि मेदूवडा शिल्लक. ताजा आहे पण गरम नाही. सांबार नाही, चटणी नाही. आमच्या आशेची पार चटणी. जाड्या निराश. इतर चौघांना उकळ्या फुटत होत्या. अरे चल जरा पुढे गेले की सामिष अन्न मिळेल. मग कुठेतरी काहीतरी थंड पदार्थ पोटात ढकलले. आणि निघालो. संध्याकाळी पुण्याला गजालीत उट्टे फेडूं असें आश्वासन जाड्याला दिले.

संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोहोचलो. गेल्या गेल्या सौ. मास्तरीणबाईंनी पुढ्यात वजनकाटा ठेवून मास्तरांचे व आपल्या बंधूंचे वजन केले. त्या दोघांचे व जाड्याचे वजन जेमतेम किलोभराने वाढले होते. सगळ्यांची अगत्यानें चौकशी केली. प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहात चालला होता. एका प्रश्नाला एका वेळी दोघेतिघे उत्तरे देत होते. मास्तरांच्या घरी आंघोळ उरकली. अर्थात धार्मिक परवानगी घेऊन. आणि खरेच गजाली मध्ये गेलो. तिथे चिन्याचा मावसभाऊहि भेटायला येणार होता. त्याचीच शिफारस होती गजालीची. आणि खरेच अतिशय ताजे मासे होते. बांगडे, सुरमई, रावस, अतिशय उत्कृष्ट होते. शिवाय त्याने येतांना जमैकन रम आणली होती. एवढ्या सुंदर सहलीची तितकीच चविष्ट सांगता झाली. दुसरे दिवशीं देवाच्या गाडीत बसून दुपारपर्यंत घरी.

अथातो प्रथम दक्षिणयात्रा संपन्न.

Monday 30 June 2008

वाट फुटेल तिथे - ९

पुट्टू

१०-१०-२००० इडप्पल
मुंबईपेक्षां गरम हवा इ. एवंगुणविशिष्ट इडप्पल गांवाचे वर्णन भाग क्र. ४ मध्ये आलेले आहे त्यामुळे द्विरुक्ती करीत नाही. त्या नीरस गावात पुन्हा काय पाहायचे म्हणून फारशा अपेक्षा न ठेवता संध्याकाळी एक आंघोळ टाकून फेरफटका मारला. तरी वेफर्सचे दुकान दिसल्यावर नार्‍याची भरपूर खेचली. पूर्वी खाल्लेल्या उपाहारगृहातच पोटोबा केला. तो गरगरीत मालक आम्ही पुन्हा आलेले पाहून खूष. सुहास्य वदनाने आमचे स्वागत केले. या वेळी मात्र गरमागरम तिखट सांबार आणि भाताचा समाचार घेतला. सोबत थंड चपात्या आणि अवियल होते.

दुसरे दिवशीं सकाळी सातला शुचिर्भूत झालों आणि गाडीत पेट्रोल, हवा वगैरे भरून तयार झालो. बिल मिळताच निघालो. रस्त्यात कोठेतरी खायचे ठरले. कुठल्या हॉटेलात जायचे ते सांग असे देवाने सांगितले. तासादीडतासाने जाड्याला भूक लागली. देवा चाकावर, गाडी सुसाट. जाड्यानें हॉटेल दाखवले की हा हळूच वेग वाढवी. हॉटेल पट्कन मागे जाई. तू हॉटेल दिसले की लगेच दाखवत नाहीस, मागे गेल्यावर दाखवतोस असा देवाने आरोप केला. अर्थातच आम्ही इतरांनी त्याला पाठिंबा दिला. त्याचे भुकेनें कासावीस होणे पाहून आमची करमणूक. मग हॉटेल दाखवले की दुसरा कोणीतरी हे नको, फालतू आहे पुढचे पाहूं म्हणे मग हा त्याच्यावर रागवे आणि वाद घाले. इतर आणखी चेकाळत. अर्धाएक तास असे त्याला पिडल्यावर कन्नोरच्या आसपास कुठेतरी वळणामुळे वेग कमी झाल्यावर एका हॉटेलाबाहेर पार्किंगला बर्‍यापैकी जागा दिसली म्हणून थांबलो.

हॉटेल धड स्वच्छ नाहीं तर धड कळकटहि नाही. हॉटेलात फक्त आम्हीच. ताबडतोब पाचसहा वेटर्सनी आम्हांला वेढले. इडली नाही, सांबार नाही, चटणी नाही, अप्पम नाही, इडीअप्पम नाही, फक्त पुट्टू, कसलासा रस्सा आणि ऑम्लेट वगळून इतर मांसाहारी पदार्थ. म्हणजे चिकन रस्सा आणि मटन रस्सा. पुट्टू म्हणजे काय हे खाणाखुणा करून विचारले. उभ्या ग्लासासारखा ग्लासाएवढाच एक पांढरा दंडगोल दाखवला. कणीपेक्षा किंचित बारीक पण रव्यापेक्षां किचित जाड कणांचा बनलेला. एक खाऊन बघू म्हणून एकाने पुट्टू आण म्हणताच प्रत्येका समोर पुट्टू आणून आदळला. देवाने, जाड्याने आणि शेवडेने त्वरित परत पाठवला. दोन पुट्टू पाचजण सहज उडवू, आवडला तर पुन्हा मागवता येईल या अपेक्षेने मी आणि नार्‍याने राहूं दिला. वातड मटणासारखा टणक आणि चिवट, त्यातून थंडगार, कसलीहि चव नाही. संगमरवर भिजवून शिजवून मऊ करून आणले होते बहुधा. बरोबर चटणी वा सांबारासारखे काहीहि नाही. चमत्कारिक चवीचा बिनतिखट रस्सा. तोहि थंडगार. आम्ही दोन घास घाल्ल्यावर तिसरा खाऊ शकलो नाही. देवा शेवडे तर एका घासावर थांबले. जाड्याने चिकन मसाला आणि पाव मागवला. त्याच्या प्लेटमध्ये थंड रश्शात प्रचंड आकाराचा कोंबडीचा पाय होता. गिधाड खातोस म्हणून आम्ही त्याला भरपूर चिडवले. पण त्यानें आमच्याकडे दुर्लक्ष करून नेटाने ते संपवले. नार्‍याने पावाच्या छोट्या तुकड्याबरोबर चव घेऊन पाहिली आणि फालतू घाण काहीतरी मागवतो म्हणून जाड्याच्या बेचाळीस पिढ्यांचा यथेच्छ उद्धार केला. त्याला पाण्याच्या बाटलीचे चौदा रुपये अजिबात देऊ नकोस म्हणून मास्तराने आगीत तेल ओतायचें पवित्र कार्य केलें. जेवणांतून विषबाधा होऊन सोळा वर्षाच्या तरुणाचा मृत्यू अशी ठळक बातमीहि मी प्रदीप भिडेच्या आवाजात काल्पनिक दूरदर्शनवर वाचली. मध्येच मी घूऽऽऽ कुच कुच कुच कुच असा आवाजहि काढला. कसला आवाज म्हणून कोणीतरी विचारले. जाड्याच्या पोटातून गिधाड ओरडले म्हणून मी जाहीर केले. गिधाड कसे ओरडते हे कोणाला ठाऊक होते? पण त्या गंमतीजंमती मुळे फारच मजा आली. अन्यथा न्याहारीचे तीनतेरा वाजलेच होते. अजूनहि आम्ही कधी कधी एकमेकांना पुट्टू खायला घालीन अशी धमकी देतो. रात्रीं बैकमपाडीला ‘हॉटेल बालाजी’ मध्ये थांबून यथेच्छ भोजन करायचे असे ताबडतोब ठरले.

कासारगोडच्या आसपास कुठेंतरी एक टायर पंक्चर झाला. मेस्त्री चला, कामाला लागा म्हटल्यावर मी लगेच कामाला लागलो. हातोडी, पान्हे वगैरे चालवण्यात आमच्यात मी किंचित कमी डावा. उजवा नक्कीच म्हणता येणार नाही. जरी डावखुरा नसलो तरी. दहा मिनिटात टायर बदलून निघालो. वाटेंत पंक्चरदेखील काढले आणि ठरल्याप्रमाणे चारसाडेचारच्या सुमाराला बैकमपाडीला पोहोचलो. दोन दिवसांचे कपडे धुतले आणि मस्त झोप काढली. चित्रवाणीवर आय सी सी नॉक आऊट क्रिकेट मॅच, भारत विरुद्ध पाकिस्तान चालू होती. ती पाहिली. झहीरखानची सुंदर गोलंदाजी पाहिली. कपिल देव, श्रीनाथनंतर भारताला चांगला वेगवान गोलंदाज मिळाला आणि आपण जिंकलो देखील या आनंदात जेवण जास्त स्वादिष्ट लागले. पोटोबा झाल्यावर शतपावली करून झोंपलो. दुसर्‍या दिवशी सातलाच निघायचे होते तरच संध्याकाळपर्यंत गोव्याला पोहोचणार. परवा तसेच सकाळी गोव्याहून निघून संध्याकाळी पुणे गाठायचा विचार होता.



वाट फुटेल तिथे - ८

कोट्टायम आणि एर्नाकुलम

कोट्टायम ०८-१०-२०००.
नार्‍याच्या घरची आघाडी ठीक होती.

मस्त थंड पाण्याचा शॉवर घेऊन फिरायला बाहेर पडलो. कोट्टायम शहर स्वच्छ आहे. कोठेहि पानाचे ठेले नाहीत, प्रशस्त नसले तरी साधारण रूंदीचे डांबरी गुळगुळीत रस्ते, चांगले चारपाच कि.मी. पायी फिरलो. कोठे खणलेले नाही, कचरा कोठे दिसला नाही, दुकाने सुबक, स्वच्छ आणि आकर्षक. मालाने खचाखच भरलेली व समृद्ध. खाण्याची हॉटेले पण शेट्टी लोकांच्या हॉटेलासारखी स्वच्छ. इथेहि इडप्पलसारखेच थंड खाणे इतर टेबलावर लोकांच्या पुढ्यात दिसत होते. तशीच दोन प्रकारची हॉटेले. शाकाहारी व मांसाहारी. तसेच दर. मांसाहारी हॉटेलांत - बहुधा ख्रिस्ती बंधूंची असावीत - स्वस्त दरातले बीफ उपलब्ध. मग इतर ठिकाणी खाण्यापेक्षा डायनिंग हॉलमध्ये खायचे ठरवले. निदान त्या शेफला तरी चवीतले थोडेफार कळत असेल. दालफ्राय, तंदुरी रोटी, छोले, जिरा राईस झकास. मुख्य म्हणजे गरमागरम. उर्दूवाचनहि स्वस्त नाही तरी बरे होते. पाच जणांनी पोटभर खाऊन पाचशेसाडेपाचशे रु. झाले. जेवल्यावर शतपावलीखातर थोडे फिरून परत आलो. साडेसहाला चहा आणि बिल मिळेल म्हणाले. आम्हांला तरी यापेक्षां जास्त काय हवे होते?

कोट्टायम दि. ०९-१०-२०००

आता परतीचे वेध लागले होते. मोरपीस अलगद पुस्तकाच्या पानांत ठेवावे तशा मधुर आठवणी आठवणीच्या कप्प्यात ठेवत होतो. खेळण्याच्या दुकानात लहान मूल जावे आणि हे घेऊ कीं ते घेऊ असा त्याला प्रश्न पडावा असे आम्हाला सगळ्यांना झाले होते. मडिकेरी जास्त छान की कोडाई? प्रत्येक ठिकाण वेगळे आणि अतुलनीय. प्रत्येक ठिकाणचा स्मृतिगंध वेगळा आणि हवाहवासा वाटणारा. मनस्थिति इतकी उत्कट होती की न्याहारी केली की नाही हे देखील आता आठवत नाही.

आता परतीच्या वाटेवरले कोचीन/एर्नाकुलम तेवढे पाहायचे होते. हायवेने रस्ता कापीत होतो. तीच ऊष्ण व दमट हवा. तीच केरळ स्पेशल रहदारी. तेच मागून वाजणारे बसचे कर्कश भोंगे, आपल्या पुढे जाऊन त्या अवजड बसेस तश्शाच करकचून ब्रेक दाबून थांबत होत्या. पण त्या उत्फुल्ल मनस्थितीत काहीच खुपेनासे झाले. प्रसन्न आठवणी मनांत रुंजी घालत होत्या. मागचे तिघेहि अंतर्मुख. बोलणे जवळजवळ नाहीच. ड्रायव्हर किलींडरच काय ते बोलत होते. म्हणजे ड्रायव्हर विचारत होता व किलींडर उत्तर देत होता. त्रिचूर किती कि.मी.? कोचीन किती? वगैरे वगैरे.

माध्यान्हीच्या सुमाराला कोचीन आले. किती वाजले होते आता लक्षात नाही. पण कडक ऊन आणि प्रचंड गरम हवा ४० अंश सेल्शिअस अंदाजे. तपमापक अर्थातच आपली त्वचा आणि तिला जोडलेला मेंदू. चायनीज फिशिंग नेट्स पाहिली. तिथे आपल्यासमोर मासे पकडून किनार्‍यावर ठेवलेल्या कोळशाच्या शेगडीवर आपल्यासमोरच भाजून (सपाट तव्यावर तेलात भाजणे = शॅलो फ्राय) देतात. जाड्याच्या मत्स्यप्रेमाला पान्हा फुटला नसता तरच नवल. छान आहे म्हणून खाल्ला. मास्तरांनीं फक्त चव पाहिली. नार्‍याने तेहि धैर्य केले नाही. मनासारखा प्रवास घडल्यानें सगळे तृप्त होतों. हवाहि गरम होती. इतर कोणी खायच्या मूडमध्यें नव्हतेच. आता तिथले प्राचीन सिनेगॉग पाहायचे होते.

सिनेगॉगमध्यें पाऊल टाकले आणि एकदम स्थळकाळाच्या सीमा ओलांडल्या. कुठेतरी मध्यपूर्वेत अरबस्तानांत सीरीया, ईजिप्त वगैरे देश चित्रवाणीवर पाहिले होते तिथे पोहोचलो. शेदोनशे वर्षापूर्वींच्या काळात गेलो. एका रखरखीत बोळात वसलेले ते सिनेगॉग. आजूबाजूला एकहि झाड नाहीं. वर तळपते ऊन. रस्याकडेला उघडे नाले. रस्त्याकडेच्या खांबावर उघड्या तारा. टेलिफोनच्या आणि विजेच्या पण. जुन्या वाड्यात असते तसे दगडी फरशी बसवलेले आवार. आवाराला तिन्ही बाजूंना भिंत. मागची बाजू पाहिली नाही. भिंतीतच बसवलेला लाकडी दरवाजा. बोळ जसा किरकोळ तशी वाडासदृश इमारतहि किरकोळ, फाटकहि किरकोळच. भव्यतेचा मागमूस नाही. पनवेल, पुणे, वाई, इथले वाडे होते तशी इमारत. फाटकापसून अदमासे दहापंधरा फुटांवर मुख्य इमारत. आवारात झाडेझुडुपे होती की नाही आता आठवत नाही. फोटो काढावेसे वाटले नाहीतच. धर्मासंबंधी असल्यामुळें असेल. स्थापना इ.स. १५६८ - कोरलेलें होते. आम्हाला वाटले होते शेदोनशे वर्षे मागे गेलो. हे तर चांगले चारशे साडेचारशे वर्षे जुने होते.

आत गेल्यावर माहीमच्या ‘श्री’ सिनेमात वा गिरगावजवळच्या ऑपेरा हाऊसमध्यें गेल्यासारखे वाटले. (टंकता टंकता आठवण झाली, या ऑपेरा हाऊसमध्ये चित्रपटांच्या तिकिटचे दर उलट होते. म्हणजे पुढचे तिकीट महाग आणि दूरचे व बाल्कनीचे स्वस्त. नाटकाच्या थिएटरची परंपरा म्हणून.) परंतु स्थापत्य पूर्णपणे वेगळे आणि अपरिचित. आपल्याला हेमाडपंती मंदिरे, दाक्षिणात्य स्थापत्याची देवालये, रोमन आणि गॉथिक शैलीतील इमारती, चर्चेस पाहायची सवय आहे. ही स्थापत्यशैली पूर्णपणें अपरिचित. आकर्षक नाहीच. स्थापत्याच्या ज्ञानाची तशी माझ्याकडे बोंबच. सिनेगॉग मी तरी पहिल्यांदाच पाहात होतो. वाईटहि नाही. खाली साधारण फरशी, नीट आठवत नाही पण बहुधा बुद्धिबळाच्यापटाप्रमाणे मांडून बसवलेल्या काळ्या व पांढर्‍या लाद्या असाव्यात. छतावर झुंबरे, एका बाजूला एक लाकडी सज्जा ऊर्फ बाल्कनी. विविध प्रकारचे दिवे, हंड्या. काही पितळेच्या चकचकीत वस्तू. आता फारसे काही आठवत नाही. मला स्वारस्य नसल्याचा परिणाम असावा. माझा नेहमी हवेत रहाणारा रथहि जमिनीवर येऊन बहुधा चाकहि रुतले होते. वाचकहो क्षमस्व. पाहायला आलेले प्रवासी तुरळकच. आमच्याव्यतिरिक्त जेमतेम दहापंधरा असतील. बाहेर पडतांना टेबलावर माहितीपुस्तके विकायला ठेवली होती. ज्यू धर्माचे काहीच ठाऊक नाही म्हणून एक पुस्तिका घेतली. त्यांच्या देवाला येहोवा म्हणतात असे नंतर कधीतरी ऐकले. आत्ता इतक्या वर्षांनी ती पुस्तिका शोधून काढली. व्यवस्थित जपून ठेवल्यामुळे पट्कन सापडली. लिहायसाठी त्यात काही माहिती मिळते का पाहायला. कोणा एकाने पी एच डी करतांना प्रबंधासाठी माहिती जमवली. त्यातलीच थोडी छापली आहे. आकर्षक असे त्या पुस्तिकेत काही नाही. वास्तविक शाळेतल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात विजयनगर, फत्तेपूर सिक्री, पेशवाईतले पुणे इ. वर्णनें फार मनोरंजक रीतीने लिहिली आहेत. या पुस्तिकेतील वर्णन मात्र इतके नीरस आहे - निदान मला तरी वाटले - की बोलून सोय नाही किंवा सोलून बोय नाही. पाऊणेक तासात बाहेर पडलो. पण आयुष्यात एखादे तरी सिनेगॉग पाहायचेच होते. चर्चेस मशिदी पाहिल्या आहेत. मग सिनेगॉग का नको? स्तूप, विहारहि कधीतरी पाहाणार आहे.

निघालो एकदांचे. हुश्श केले. गाडी चालायला लागली की बरे वाटते. पुढे येणारे गाव कसे असेल याचे कुतूहल पुढच्या क्षणाची अनिवार ओढ घेऊन येतें. आयुष्य कसे छान प्रवाही वाटते. मागील मधुर क्षणांच्या हळुवार स्मृतींच्या धुक्यातून पुढें येणार्‍या नव्या क्षणाचे अज्ञात रंग मस्त गहिरे होतात. मन पुढे येणार्‍या ताज्या क्षणाच्या स्वागतासाठी एकदम टवटवीत होऊन जाते.

आता संध्याकाळ होइस्तोवर पुढे जायचे आणि चारनंतर बरेसे हॉटेल पाहून मुक्काम ठोकायचा असा विचार होता. रा. म. मा. १७ नेंच पुढें जात राहिलो. चवक्कड गेल्यानंतर अचानक काम चालू रस्ता बंद चे एक डायव्हर्शन आले. पुढचे मार्गदर्शक गाव होते पोन्नान्नी. आश्चर्य म्हणजे हा रस्ता चांगल्या अवस्थेत आणि कमी रहदारीचा होता. मार्गदर्शक दगड मात्र नव्हते. दिवस किंचित कलला होता म्हणून सूर्य डावीकडे ठेवून उत्तरेच्या दिशेने जात होतो. मास्तरांनी नकाशा काढला. त्यात हा रस्ता दिसत होता. पण हाय रे दुर्दैवा. मास्तरांचा चष्मा बॅगेत राहिला. दिशादर्शकाचे काम माझ्याकडे. एक नाका आला. रस्त्याला चार फाटे फुटत होते. एक समोर किंचित उजवीकडे बाकीचे तीन तीन कोनांतून डावीकडे. नकाशांत तीनच फाटे. सर्वात डावीकडचा फाटा किंचित मागच्या बाजूला जाणारा. हा बहुधा समुद्रकिनारी जात असावा. डावीकडून दुसरा फाटा रा. म. मा. १७ ला मिळायला हरकत नसावी. तो फाटा पकडला. १० किमी. गेले, वीस गेले, रा. म. मा काही दिसेना. रस्त्याला दगड दिसेना. मधूनच गाववजा शहर लागे. सगळ्या पाट्यांवर जिलेबी. कुणाला विचारावे तर कुणालाहि इंग्रजी वा हिंदी येत नाहीं. एकदोनदा कोझोकोडे व्हेअर असे विचारले. पण फोल. एकानें एक दिशा दाखवली. लगेच पूल लागला. दोन रुपये टोल भरला. पलीकडे गेलो. पुन्हा एकाला विचारले. त्याला इंग्रजी येत होते. त्यानें पुन्हां पूल ओलांडून परत जाऊन फर्स्ट लेफ्ट सांगितलें. पुन्हा २ रू. टोल भरून पहिल्या रस्त्याला लागलों. एन एच सेव्हन्टीन पण कोणाला कळत नव्हते. संध्याकाळ होऊ लागली. पुढच्या नाक्यानंतर अचानक रस्ता व परिसर ओळखीचा दिसायला लागला. आणि पाचहि जणानी सुस्कारा सोडला. हे जाताना लागलेले इडप्पल होते. पुन्हा हॉटेल बॉम्बे. लग्नाच्या सभागृहाला लागून असलेले. सुदैवाने लग्नकार्य नव्हते व सभागृह रिकामेच होते त्यामुळे हॉटेल मिळाले.


वाट फुटेल तिथे - ७

टेकडी आणि बॅकवॉटर्स

०८-१०-२०००.
कोडाईकनाल
अपेक्षेप्रमाणे नवी पहाट नवी आशा, नवी चेतना घेऊन आली. आता नवा सूर्य नवी झळाळी घेऊन येणारच. काल आमच्या हॉटेलांत बरेच प्रवासी आले होते. मॅ. सा ना बिल तयार करायला सांगितले. पण नव्या प्रवाशांच्या गर्दीमुळे हॉटेलच्या सेवकावर फार ताण पडला. तरी आमची गाडी त्यानें स्वच्छ धुवून दिली. धुक्याच्या दुलईत लपेटलेल्या स्वप्नमय वातावरणात प्रभातफेरी झाली. भाऊ मोरोबा साथीला होतेच. सुदैवाने वीजपुरवठा सुरळीत असल्यानें गीझर व्यवस्थित चालू. मस्त गरम पाणी. स्नान करायला मजा आली. नार्‍याच्या घरीं त्याची मेहुणी तिच्या आईची सेवा करायला अपरात्रीं हजर झाली होती. त्यामुळें सौ नारकर व मुलांना चांगलें मानसिक बळ मिळाले. सौ. नारकर आणि त्यांच्या मातोश्री दोघींच्याहि प्रकृतीत सुधारणा. आता नार्‍याला दौरा अर्धवट सोडायचे कारण नव्हते.

सरवानला उदार आश्रय देऊन भरपूर सांबार आणि तीन प्रकारच्या चटण्या आणि न्याहारीनें तृप्त होऊन पुन्हा नव्या उमेदीने निघालो. पुढचा मुक्काम होता टेकडी. एके ठिकाणी टेकडी अशी इंग्रजी अक्षरे दिसली. अरे तीनच अक्षरे आहेत. मल्याळी आणि तमिळ पण टेकडी कसे लिहितात पाहा. आम्ही खरेच दोन्ही लिप्यातले टेकडी वाचायला शिकलो. तमिळ टेकडीला आपली नक्षी आणि मल्याळी टेकडीला आपली जिलबी असे सार्थ नामकरण झाले. टेकडी लिहिलेलें नसेल तर जिलबी वा नक्षी आपली नाही असे साधे सोपे सरळ समीकरण. काही दगडावर अन्य गांवांची नावे होती. आपली नक्षी वा आपली जिलबी दिसली की फारच गंमत येई. चालक सोडून इतर चौघेजण एका सुरात ओरडत होतो आपली नक्षी वा आपली जिलबी.

निसर्गाची एक गंमतच आहे. पूर्व किनारा किमान ५० कि.मी. दूर. पण अगदी कोंकणात किनार्‍यालगत असते तेवढी भरपूर वाळू दिसे. ताड माड दिसत. जणु पाच मिनिटे चालल्यावर समुद्रच दिसेल. रस्त्यावर वा गावात कुठे गावाचे नाव वगैरे लिहिलेले नसेल तर हा चकवाच म्हणायचा. अधूनमधून शहाळी, ताडगोळे, तोतापुरी कैर्‍या, तोतापुरी आंबे, उकडलेले शेंगदाणे, रस्त्याकडेला विकायला ठेवलेले दिसत. एके ठिकाणी मस्त लुसलुशीत रसदार ताडगोळे खाल्ले आणि शहाळ्याचे गोड पाणी पिऊन तृषा भागवली. बहुधा दहा रुपयांना बारा ताडगोळे होते. आणि दहा रुपयांना एक शहाळे होते. आता नक्की आठवत नाहीं. तेणीला उजवें वळण घेतले आणि टेकडीचा रस्ता धरला. तेणीवरून मदुराई ४८ कि.मी. आहे म्हणजे समुद्र किती दूर आहे पाहा. झाडोरा वाढायला लागला, चढ लागला आणि हवेंत गारवा आला.

नार्‍याच्या घरची आघाडी ठीक होती.

माध्यान्हीच्या सुमाराला टेकडी आले. अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाण. सगळे जण निसर्गसौंदर्यानें हरखून गेलों. तहानभूक विसरलों. वनखात्याच्या चौकीवर नोंद करून आंत गेलों. प्रथम बोट क्लबवर गेलों. साडेअकराची सहल नुकतीच गेली होती. पुढची दोनला होती. समोरच एका सुरेख ठिकाणीं खानपानसेवा होती. पण पदार्थ बर्गर, समोसा, पॅटीस वगैरे. बनवून ठेवलेले, थंडगार, शहरी आणि यथातथाच दिसले. उर्दूवाचन भरमसाट. दर पाहूनच होती नव्हती ती भूक मेली. बहुधा ही पाश्चात्यांची सोय असावी. केरळ नाहींतरी खाण्याच्या दृष्टीनें कुचकामीच. राहाण्याचें हॉटेल शोधायला लागलों. जवळजवळ सगळीं हनिमून हॉटेल्स. छतात आरसा बसवलेली. दर प्रचंड महागडे. सुंदर निसर्ग पाहून दोन रात्रींचा मुक्काम करायचा विचार करीत होतो. अर्धा तास फिरूनहि योग्य तसे आखूड शिंगी बहुदुधी हॉटेल गवसेना. आम्हीं चैन करायला नक्कीच निघालो नव्हतो. निसर्ग सुंदर पण खाण्यापिण्याची बोंबच. पैसेहि फार लागणार. सोळाशे रुपयाखालीं बरेसे आणि पार्किंग चांगले असलेले हॉटेल तेव्हा गावलेच नाही. आता बरीच झाली आहेत. टेकडीपासून चार किमीवरच्या कुमिली गावात. तेव्हा काही नव्हते. चालक अर्ध्या तासाच्या विश्रांतीने ताजेतवाने झाले होते. दहावीस कि.मी. वर चांगले आणि वाजवी दरांतले हॉटेल मिळाले तरच मुकाम करायचा नाहींतर मुक्कामच रहित.

मुक्काम रहितच करावा लागला. दर ठीक तिथे पार्किंग नाही, पार्किंग होते तिथे दर चढे. काय करणार? जसजसे घाट उतरलो तसतशी थंड हवा मांजराच्या पावलाने कधी पळाली पत्ता लागला नाही. मात्र झाडोरा तसा कमी झाला नाही. फक्त झाडे बदललीं. आता माड, केळी वगैरे जास्त दिसायला लागले. वातानुकूलनावर जास्त भर दिला. चढउतार फारसे नव्हतेच. तापलेल्या हवेमुळे भूक तशी मेलीच. पण त्याचा फायदा असा झाला की अंतर पटापट कापले गेले. जेवायला कुठे थांबलोच नाही. आता बॅकवॉटर्स पाहायचे होते. कोट्टायमहून. तीनसाडेतीनला कोट्टायम ५० च्या आसपास कि.मी. ची पाटी दिसली. म्हणजे तासाभरात कोट्टायम. तिथे मुक्काम करून दुसर्‍या दिवशी बॅकवॉटर्स असे काहीसे ठरवत होतो. चारलाच कोट्टायम आले. इथून १४ कि.मी. बॅकवॉटर्स आहे. अचानक साक्षात्कार झाल्यासारखा चक्रधारी मास्तर बोलला, अरे बॅकवॉटर्स बघायला दोनेक तास लागतात. आताच गेलो तर. समजा व्यवस्थित पाहून झालें तर कोट्टायमहून उद्या सकाळीच निघू शकतो. पुन्हा एकदा ऑल ग्रेट मेन थिंक अलाईक. थेट बॅकवॉटर्सला पोहोचलो. फारशी गर्दी नव्हती. तुरळक चुकार लोक होते. सहज चौकशी केली. शेवटची फेरी नुकतीच गेली होती. पाचजणांसाठी खास फेरी मिळेल का, असेल तर किती पैसे हे चाचपायला लागलो. एक दिवस वाचला तरी एक दिवसाच्या मुक्कामाचे किमान हजारेक रुपये, किंबहुना जास्तच वाचणार होते. ते पैसे दुसरे ठिकाण पाहायला सत्कारणी लावता येणार होते. दोन तास चांगला उजेड असेल तोपर्यंत फिरवायला त्याने बाराशे मागितले. तरीहि उजेड राहिला तर ताशी सहाशेच्या दराने देऊ म्हणून सांगितले. इतर कोणीहि उतारू न घ्यायच्या बोलीवर. जाड्याने अर्धे इंग्रजी अर्धे मोडतोड हिंदी बोलत मस्त सौदा पटवला. हिंदीची मोडतोड त्या माणसाने केली बरे. पण आम्ही ते पाप जाड्याच्याच पदरात टाकले. या मुंजाचे एखाद्या भय्यिणीशी लग्न लावले तरच त्याचे हिंदी सुधारेल असे इतर चौघांचेहि मत झाले. त्या मताशी बोटीचा कप्तान, त्याचा किलींडर आणि गाईडहि सामील झाले. काय ते त्या महाभागांना कळलें कीं नाहीं कोण जाणें. असो. त्यालाहि आता गिर्‍हाईक मिळण्याची शक्यता नव्हती, आम्हालाहि इतर उतारूंचा उपद्रव नव्हता. गाईडचे पैसे वेगळे. केवळ सव्वाशे.

उतरत्या लालसोनेरी उन्हात बॅकवॉटर्सचे रंग आणखी गहिरे झाले. सुरुवातीचा फोटो काढायचा उत्साह सोडला तर त्या गहिर्‍या रंगानी आम्हाला अंतर्मुख केले. निसर्गसुंदर बॅकवॉटर्सने आम्हाला मंत्रमुग्धच केले. एकच गालबोट. यांत्रिक होडीच्या इंजिनाचा प्रचंड आवाज शांततेच्या ठिकर्‍या उडवतो. मला राहवले नाही. मी त्या कप्तानाला अधूनमधून इंजिन बंद करायला सुचवले. इंजिन बंद केल्यावर जी शांतता अनुभवायला मिळते कीं ज्याचें नाव ते. किनार्‍यावरून झाडांवरच्या पक्ष्यांची किलबिल, विविध आकारांच्या स्टीलच्या बांगड्या जमिनीवर पडल्यासारखा आवाज करणारे तिथल्या लोकांचे बोलणे अस्पष्टसे ऐकू येत होते, झाडांतून ऐकू येणारी वार्‍याची सळसळ, पार्श्वभूमीला पाण्यातून येणारे चुळुक् चुळुक् चुळुक् आवाज स्वर्ग तो काय अजून वेगळा असतो? उगीच नाहीं केरळला देवभूमि म्हणत! गाईडने पण मधून इंजिन बंद करायच्या कल्पनेला मनापासून दाद दिली. खरेंच, इतकी संशोधने होताहेत. आतां नवीन मोटारीचे इंजिन चालू आहे की बंद हे चालकाच्या जागेवरूनहि कळत नाही. आवाजहि नही करता ही फ्रीजची जाहिरात आठवली. पण होड्यांचीच इंजिनें अशी का? कपिल देवला सांगायलाच पाहिजे. पाम ऑलिव्हदा सारखा यालाहि जबाब नाही. पण वेगळ्या अर्थाने. गाईडला तीनशे रुपये दिले. पण लालसोनेरी संधिप्रकाशांतल्या गहिर्‍या रंगांचे ते दिव्यत्वाचा स्पर्श असलेले अनुभव? त्याची किंमत आपण पैशांत करू शकतो का?

भरजरी लालसोनेरी निसर्गांत हळूहळू काजळमाया मिसळूं लागली. पाण्याच्या गर्द निळाईंत आता विश्वकर्मा श्यामरंग भरायला लागला होता. त्या गर्द पार्श्वभूमीवर झाडांचे शेंडे वेगळेच दिसत होते. संध्याछाया मारवा सोहनी आणि पूरियाचे अनोखे रूप दाखवत होत्या. एक अपूर्व अनुभव मनांत साठवत तरंगतच कोट्टायमकडे परतलो. रा.म.मा. १७ ला लागूनच एक चकाचक हॉटेल मिळाले. सुरेख पार्किंग, स्वच्छ नीटनेटके स्वागतकक्ष, तत्पर सेवकवर्ग, प्रशस्त आणि आकर्षक डायनिंग हॉल. रु. साडेतीनशें नॉन ए.सी. डबल ऑक्युपन्सी. तरीहि घासाघीस केलीच. मुंबईकरांचा भाव मारलाच. मुंबईकरांकडे सगळीकडे अतिशय आदराने पाहिले जाते बरे का. पुणेकरांना पार्श्वाग्नि होईल कदाचित, पण हे खरेंच आहे. पुणेकर मास्तरांना आम्हीं याची जाणीव करून द्यायला विसरलों नाहीं. पण ‘मुळांतला मी मुंबईकरच आहे. हल्लीच तर पुण्यात आलो.’ अशी मखलाशी त्याने केली. मुंबईकरांचा विजय असो. १० टक्के सवलतीचा दर मिळाला. हवा मुंबईपेक्षा किंचित जास्तच गरम. पण प्रदूषणमुक्त. स्वच्छ, प्रशस्त, आकर्षक रंगसंगतीच्या, सुरेख पडदे लावलेल्या खोल्या, मोठ्ठ्या खिडक्या आणि चांगले वायुवीजन. नॉन ए.सी. च खोल्या घेतल्या.

नार्‍याच्या घरची आघाडी ठीक होती.

Sunday 29 June 2008

वाट फुटेल तिथे - ६


कोडाईकनाल

०७-१०-२०००:
गाडी साडेआठ वाजता येणार होती. कमालीची थंडी होती. तपमान दहाच्या खाली असावे. कमालीची आर्द्रता होती. या आर्द्रतेमुळे मुन्नारपासून ओले असलेले नार्‍याचे व जाड्याचे कपडे जसेच्या तसे ओलेच राहिले. अजिबात वाळले नाहींत. त्यांना भरपूर चिडवले. लॉंड्री चालवायचे सोडून इथे काय करतां? तीहि चालवायची अक्कल नाही. नाहीतर कपडे ओलेच कसे राहिले? तुमच्या कपडे वाळवण्यातच काहीतरी चूक आहे वगैरे वगैरे. पण ते महापुरूष कांहीच ऐकू न आल्याचा बहाणा करीत होते. शेवटी ते एका इस्त्रीवाल्याकडून रांगेत उभे राहून कपडे वाळवून आले. इथे आल्यानंतर लोकांची अक्कल गायब होते कीं काय? बर्‍याच जणांनी कपडे धुतले होते वगैरे असावेत आणि ते वाळवण्यासाठी इस्त्रीवाल्याकडे आले होते. आम्हा इतर तिघांची लोकोत्तर पुरुष असल्यामुळे गोष्टच वेगळी.

आता आमचे कपडे कां ओले नव्हते हा प्रश्न वाचकांच्या सुपीक डोक्यात येणारच. याची गंमत सांगायलाच पाहिजे. अर्ध्यापॅंटचा एक तोटा म्हणजे गाडीत बसल्यावर ऊन आले तर मांडीपासून खालचे उघडे पाय फार भाजतात. या त्वचेला ऊन खाण्याची सवय नसते. मी ओला टॉवेल वगैरे कपडे पाय भाजू नयेत म्हणून पायावर घेत होतो. उन्हापासून संरक्षण तसेच कपडे पण वाळतात. पाहा किती हुशार मी. माझे पाहून देवाने व मास्तरांनी पण तसेच केले. कोडाई येण्यापूर्वी आमचे तिघांचे कपडे पूर्ण वाळले होते. अर्थात वातानुकूलन बंद असतांना. अख्खी पॅंट घातल्यामुळे जाड्या व नार्‍याला मात्र मात्र तसे करता आले नव्हते. हे दोघे कपडे वाळवून घेत होते तोपर्यंत आम्ही फेरफटका मारून आलो. आम्ही चविष्ट न्याहारी करून आलो म्हणून खोटेच सांगितले. पण ती थाप पचली नाही.

न्याहारीसाठी येथे सरवानपेक्षा जास्त चांगले काय असणार? तेथील एस्. टी. स्टॅंडसमोर आहे. तुरळक पाचदहा लोक उपस्थित होते. ऑर्डर दिली. तेवढ्यांत एकदम वीसपंचवीस तरुणांचे टोळके आंत घुसले. उरलेल्या सगळ्या जागा भरून गेल्या. कांही तरूण उभेच होते. उभ्याउभ्याच त्यांनी न्याहारी केली. तमिळमधून मोठमोठ्याने आरडाओरडा करीत होते. वेटर घेऊन येत असलेले सगळे पदार्थ ते मधल्यामधे त्याला अडवून घेत होते. आमच्यासारखे इतर लोक नुसते वाट पाहात स्वस्थ बसून होते. सगळ्यांचे रंग एकसारखे. मी त्यांच्यापुढे गोरा दिसायला लागलो. माझी रंगाची ऐट जिरल्याबद्दल इतर चौघांनी आनंद व्यक्त केला. अर्ध्यापाऊण तासाने ते त्रस्त समंध शांत झाले व बिल देऊन निघून गेले.

हिरवी चटणी, चिंचेची चटणी व टोमॅटो चटणी अशा तीन प्रकारच्या चविष्ट चटण्या व स्वादिष्ट सांबार भरपूर मनसोक्त प्रमाणात. इडल्या, डोसे, चांगले होते. जाड्यासाठी पोंगलहि होताच.फिल्टर कॉफीहि छान. अजून आठहि वाजले नव्हते. तेथून सरळ ज्या एजन्सीत गाडी बुक केली होती तिथे गेलो. म्हटले हा आपल्या हॉटेलवर जाऊन वाट बघणार, त्यापेक्षा आपणच तिथे जावे.

या गाडीचा विशीतला ड्रायव्हर तमिळ मुस्लिम होता. मुस्लिम असल्यामुळे त्याला थोडेफार हिंदी येत होते. पण हिंदी बोलतांना त्याला फार त्रास होत होता. अक्षरश: जिवाच्या आकांताने हिंदी बोलतोय असे वाटत होते. इथे देखील आता प्रचंड गर्दा होता. गर्दी म्हणून कल्पना येणार नाही. म्हणून गर्दा. पण आमचा ड्रायव्हर कम गाईड चलाख होता. स्थानिक ड्रायव्हर असल्याचा फारच मोठा फायदा झाला. येथील वाहातुकीचे नियम वेगळे होते. शिवाय प्रत्येक ड्रायव्हरचे नियम वेगळे होते. दहावेळा तमिळमधून खडखडाट करीत तोंड वाजवले तरच आपल्या वाटेतील एक गाडी बाजूला होणार. अन्यथा नाही. ती बाजूला झाली की दुसरी मधे आहेच. तेल्लीचेरीचे ड्रायव्हर जरूर लाजले असते. मुंबई पुण्याच्या ड्रायव्हरांची फार म्हणजे फारच गोची झाली असती. असो.

येथे एक हनीमून पॉइंट (कदाचित नाव वेगळे असेल) आहे. तेथेच सर्वप्रथम गेलो. येथील दरीच्या कडेने जाणारा वॉक घेतला की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. एखाद्या लोकप्रिय नटीच्या फॅन क्लबची इथे सहल आली तर तिचे काय होईल? असो. अतिशय थंड आणि उत्साहवर्धक हवा, आजूबाजूला आनंदाने आणि उत्साहाने भारलेला जनसमुदाय. दिवाळीत दादरला रानडे रोडवर असते तशी मोदभरी उत्साही गर्दी. पण आश्चर्य म्हणजे इथे लोकांनी चक्क रांग लावली होती. डाव्या बाजूला उंच जाणारा खडकाळ कडा आणि उजव्या बाजूला खोल दरी. तीत गच्च अरण्य. कांही ठिकाणी कठडा केलेला. याला हल्ली मराठीमध्ये ’रेलिंग’ असे म्हणतात. काही ठिकाणी जाळी. म्हणुन अपघात फारसे घडत नसावेत. पण अतिशय निसर्गरम्य ठिकाण. आता साताठ वर्षानंतर आठवत नाही. पण इथे चांगले पंचवीस वा पन्नास रू. दर माणशी असे शुल्क भरले होते. पण पैसा वसूल. वाटेत बारीक चिरून मीठमसाला पेरलेले पानावर दिले जाणारे कच्चे तोतापुरी आंबे, उकडलेले शेंगदाणे, केळी, इ. रानमेवा होताच. वातावरण ढगांनी वेढलेले. मध्येच दाट ढग येऊन चार फुटावरचे देखील दिसेनासे होई. मध्येच भास्करराव दर्शन देत. क्षणाक्षणाला बदलणारी प्रकाशयोजना. असे उत्कट क्षण कसे विसरता येतील. आणखी एक फार महत्त्वाची गोष्ट प्लास्टीकच्या पिशव्या कुठेहि नव्हत्या. हे लक्षात आल्यावर फार बरे वाटले. जवळजवळ पाचसातशे मीटरचा वॉक आहे. रम्य वातावरणात रमतगमत चांगला अर्धापाऊण तास आपण घालवतो. बरेच लोक जथ्यांनी आलेले होते. त्यांचे आपापसात मोठमोठ्याने हास्यविनोद करून खिदळणे चालू होते. पण तमिळमध्ये. त्यामुळे सतत ताशाचा खडखडाट व मधेमधे हास्यपेरणी असे वाटत होते. ओ का ठो कळत नव्हते. वॉक संपल्यावर आपण दुसरीकडेच उगवतो. अगदी दूरवरची वेगळी जागा. पण आपला चतुर सारथी आपल्या स्वागतास उपस्थित असतो. रस्त्याने हे बाहेर पडण्याचे ठिकाण आत शिरण्याच्या ठिकाणापासून अडीच एक कि.मी. दूर आहे असे त्याने सांगितले. पाहा स्थानिक गाडी केल्याचा फायदा किती ते. नाहीतर आम्हाला तासभर वेळ लागला असता मूळ ठिकाणी जाऊन गाडी शोधायला. इथले जसे ड्रायव्हिंग लोकोत्तर आहे तसे पार्किंगदेखील. कोणत्याहि गाडीसमोर कशीहि आडवीतिडवी गाडी उभी करतात. तुमची गाडी कशी बाहेर निघेल ते बघायला परमेश्वर समर्थ आहेच. गाडी पार्किंगमधून बाहेर काढतांना त्याने किमान आठदहा जणांशी तमिळमधून सुखसंवाद केला. आपण तर संध्याकाळपर्यंत तेथेच अडकून पडू. पण या पठ्ठ्याने पंधरावीस मिनिटात गाडी बाहेर काढली.

लिरील साबणाची दूरदर्शनवर एक जाहिरात आली होती. लाऽऽ लारालारालाऽऽ ची लकेर असे साथीला. ते चित्रीकरण इथेच झाले होते. या धबधब्याला लिरील धबधबा असे म्हणतात. खरेच नितांतसुंदर ठिकाण आहे. इथे आपण छायाचित्रे काढतोच. ट्विन रॉक्स म्हणून एक ठिकाण (पॉईंट) आहे. दरीपाशी उभे राहून समोर दरीपलीकडे एकमेकींना बिलगून उभ्या असलेल्या दोन प्रचंड शिळा दिसतात. तेच ट्विन रॉक्स. दाट धुक्यामुळे समोर दरी आहे की डोंगर आहे तेच कळत नव्हते. दरीपलीकडचे दिसण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे छायाचित्रे विकणार्‍यांना फारच चेव आला होता. मोडतोड विंग्रजी बोलत पोस्टकार्ड आकाराची छायाचित्रे घ्या म्हणून मागे लागतात. त्यांच्याकडील तॊ छायाचित्रे पाहूनच कळले की ते ट्विन सॉक्स कसे दिसतात. आम्ही खरोखरच ट्विन रॉक्सपाशींच होतो की नाही कोण जाणे. सगळीकडे ढग, ढग आणि ढग. गिरगांवात ‘भाऊ मोरोबा ढगे’ म्हणून एक दुकान होते. बहुधा कापडाचे. अजून आहे की नाही ठाऊक नाही. म्हणून ढगांचे आम्ही ‘भाऊ मोरोबा’ असे पूर्वीच्या एका माथेरान सहलीत बारसे केले होते. ढग आला की ‘भाऊ मोरोबा’ आले रे आले असे ओरडत होतो. ते चालू ठेवले. आमचे शब्द कानावर पडणार्‍या एखाद्या तमिळ माणसाला थोडेफार मराठी कळत असते तर त्याने ढगाला भाऊ मोरोबाच म्हटले असते. अशाच अनेक गंमती जंमती. खरेच प्रत्येकात एक आठदहा वर्षांचा व्रात्य मुलगा दडून असतो. सहलीवर तो जागॄत होतो. हेच जिवंतपणाचे लक्षण आहे.

दिवसभर मनमुराद भटकलो. संध्याकाळ झाली तसे हॉटेलवर पोंचलो. नांदेडकर मॅसांनी मराठीतून नमस्कार असे अभिवादन केले. हे होते तसे मनमिळाऊ आणि व्यवसायिक. पण त्यांच्या चेहर्‍यावर एक तुसडेपणची झांक होती. म्हणूनच हॉटेल रिकामे असावे कां? की गांवाच्या कडेला असल्यामुळे? असो.

रात्री पायी फिरायला गेलो. दोनएक कि.मी. त्या हवेत हे फारसे मोठे अंतर नाही. वरूणराजांनी अजिबात त्रास दिला नाही. मास्तरांनी मुलीसाठी जीन्सची खरेदी केली. घासाघीसमहर्षि मदतीला होतेच. आता गुढगे टेकणे. मास्तर व देवाचे गुढगे टेकून झाल्यावर शेटजींनी नंबर लावला. गुढगे टेकून परत आला आणि पाहातो तर काय? त्याचा चेहरा पूर्ण विस्कटला होता.

फोन त्याच्या नववीत असलेल्या मुलीने घेतला होता. ती प्रथम कांही बोलूच शकली नाही. फक्त रडली. आजी (शेटजींच्या सासूबाई) अत्यवस्थ. आईला ताप आलाय. काय करूं? छोटा भाऊ जेमतेम चौथीतला. तो काय तिला आधार देणार? नार्‍याला त्वरित घरी जाणे आवश्यक होते. त्वरित जायलाच पाहिजे असे स्पष्ट दिसत होते. पण कसे? तीन विमानतळ जवळ होते. कोईंबतूर, चेन्नई आणि कोचीन. एकहि ठिकाण आत्ता रात्री जाण्यासारखे नाही. विमनस्क मनस्थिती म्हणजे काय! याचा अनुभव आम्हांला मिळत होता. बरीच चर्चा झाली. काथ्याकूट झाला. त्याला कोणत्यातरी विमानळावर आम्ही सोडायचे हे नक्की झाले.

आता विमानाची वेळ. पर्यटनाचे ठिकाण असल्यामुळे येथे ट्रॅव्हलिंग कंपन्या अनेक आहेत. एवढ्या रात्री शेवटी एक उघडे मिळाले. सुदैवाने त्याला थोडेफार इंग्रजी येत होते. फिरंग्याने हे एक काम फार चांगले केले. फिरंग्याच्या भाषेमुळे आपल्याला दाक्षिणात्यांशी संपर्क साधता येतो. विमानफेरीच्या वेळा पाहिल्या. चेन्नईपासून बरीच होती. पण चेन्नईला पोचायला एक दिवस जास्त लागणार. मी म्हटले अरे उद्यापर्यंत परिस्थितीत बरीच सुधारणा होईल. दिवस तसेच थोडेच राहाणार?
म्हणजे काय होईल?

दोघींच्याहि प्रकृतीत सुधारणा. आणि व्यावहारिक दृष्टीने विचार कर. मास्तर म्हणाले तुझ्या उपस्थितीने काय फरक पडणार? जे काय करायचे आहे ते डॉक्टरच करणार. तू फक्त विशिष्ट वळणावरचे निर्णय घेणार. ते तू इथे राहून पण घेऊं शकतो. फक्त तुझ्या उपस्थितीने तुझ्या मुलीला व दोन्ही रुग्णांना मानसिक बळ मिळेल. तू पुन्हा तिला फोन लाव. तसे तिला समजावून सांग. पाहिजे तर आम्ही पण तिच्याशी बोलतो. तत्पूर्वी तिला ज्या दोन सख्ख्या मावशा आहेत त्यांना पण सतर्क राहायला सांग. त्या मुलीला मानसिक आधार मिळणे महत्त्वाचे आहे. जरूर पडल्यास तू केव्हाहि निघू शकतोस व दोन तासात पोहोचू शकतोस असे सांग. इतर दोघांचेहि असेच म्हणणे पडले.
क्रमश:

वाट फुटेल तिथे - ५

Thursday, May 8, 2008

वाट फुटेल तिथे ५
मुन्नारवर स्वारी: ५ ऑक्टोबर २०००:

ठरल्या प्रमाणे सकाळी साडेआठला न्याहारीसाठी त्याच हॉटेलात थडकलो. ३०-४० मिनिटांची प्रभातफेरी झाली होती. हॉटेलचे बिल मिळाले नव्हते. बिलबाबू नऊ वाजता येणार होता. साडेआठलाच दुपार झाली होती. दिवस उजाडल्याबरोबर दुपार होणे ही कल्पना माझी नाही बरं का. प्र. श्री. नेरूरकर यांची. एका सर्कसबरोबर ते आफ्रिकेच्या दौ-यावर गेले होते. सर्कसबरोबर (माझ्या आठवणीप्रमाणे) ३०-४० दिवस राहिले व प्रवासवर्णन लिहिले. त्यात त्यांनी तसे म्हटले आहे. असो. तर साडेआठच्या टळटळीत दुपारी बाहेर पडलो. उकाड्यामुळे कांही सुचत नव्हते. रंगीत गरम पाणी आजसुद्धा सगळ्यात चविष्ट पदार्थ होता. इडल्या डोसे साधारण होते. सांबार सपक आणि अळणी. गरम असून त्यात रामच काय भरत शत्रुघ्नदेखील देखील नव्हते. दिवसभर खायला मिळणार नाही म्हणून कसेतरी खाऊन घेतले. आमचे खाऊन होता होता तेथे काही स्थानिक लोक खाण्यासाठी आले होते. त्यांच्या पुढ्यात लालभडक सांबार दिसले. त्या हिंदी जाणणार्‍या एकमेव वेटरला ते काय म्हणून विचारले. ते येथील नेहमीचे सांबार आहे. भौत हॉट्ट होता है. आप बंबई के. इत्तना हॉट्ट कैसे खायेंगे? इसलिये आपके लिये ये स्पेशल अल्लग बन्नाया. कपाळावर हात मारायचा बाकी होता. आणखी एका इडली सांबाराची पण त्या नेहमीच्या तिखट, ऑर्डर दिली. फक्त मीठ कमी होते. ते मागविले. बाकी सुरेख होते. मग आणखी मागविली. मीठहि मागवले. आता संध्याकाळपर्यंत तग धरायला हरकत नव्हती. दोघे पेट्रोल भरायला, हवा चेक करायला गेले. तोपर्यंत आम्ही तिघांनी बिल भरून चेक आऊट केले.

अरे नुसते बटाटे घेतले असते तर या हवेत अर्ध्या तासात उकडून मिळाले असते. कोणतरी एक म्हणाला.काढ की तुझ्या डोक्यातले. नको सडलेले असतील. तिसरा. एका वेस्टर्न इंग्रजी सिनेमात (जॉन वेन की काय आठवत नाही) अशा कडक उन्हात दोन माणसे, चरबरीत दाढी वाढलेली त्यांची, एक दुसर्‍याशी पैज लावतो. अंडे फोडून दगडी दगडी फरशीच्या पदपथावर फोडून टाकतो आणि ते शिजते. तो पैज जिंकतो. ते मला आठवले.

जाड्या पैज, अंडे टाकले तर शिजेल. मी. मला सनी साईड डाऊन पाहिजे आहे. आणि ते उलटेपर्यंत तुझ्या कौशल्याने त्याचे स्क्रॅंबल झालेले असेल. त्या हलकट नीच आणि पाजी इसमाने रसभंग केला.
त्यापेक्षा तूच रस्यावर का बसत नाहीस? रोस्टेड पोर्क खायला मिळेल. मी सूड उगवला.
हा शेटजी बघ काही काम करत नाही. अरे अंडी घाल रस्त्यावर निदान काहीतरी चांगले खायला मिळेल. मी.
सध्या खुडुक आहे. शेटजी.

मग कोंबडीच खाऊ. रस्त्यावर भाजेल का रे? नुकताच आलेला मास्तर.
चवदार अन्नाला देखील नाक सॉरी चोच मुरडणारी आहे. कशी चांगली लागेल? जाड्या.
गरम हवेचा त्रास कमी करण्यासाठी असे आचरट संवाद चालू होते.

आता सगळेच आठवत नाहींत.रात्री राहायला चांगले हॉटेल एवढ्या स्वस्तात मिळाले मिळाले ही काय छोटी गोष्ट होती? चलो मुन्नार.

मुन्नार बहाबळेश्वरपेक्षा जास्त उंचावर आहे या कल्पनेने भारून गेलो. तेथे दोन रात्र राहायचे आणि पोटभर खायचे असे ठरले. साडेनऊच्या सुमारास निघालो. सरळ रस्ता असल्यामुळे प्रथम वातानुकूलन सुरू केले. उकाडा थोडा सुसह्य झाला.

उकाड्याची एक गंमत आहे. दिवस उगीचच लांबलचक आणि कंटाळवाणे वाटतात. वेळ घालवण्यासाठी लेफ्ट पो, राईट्ट पो, नेऽऽर पो (नेर = समोर) अशा सूचना सारथ्याला प्रत्येकजण देत होता. केवळ एकमेकांच्या बरोबर होतो आणि आचरट गप्पा चालू होत्या म्हणून सुसह्य झाले. साथीला (रोगाच्या नव्हे) तोंडी लावायला विचित्र केरळी उच्चार होतेच. तोंडी लावायला चांगले असले की पोट भरते. अधूनमधून संगीत होतेच. लता-आशा, बाबूजी, किशोर, रफी खळेसाहेब, नौशाद, मदनजी, रोशन, आर. डी. इ. चे आभार मानले. कोचीनच्या जवळ मुन्नारला जाणारा फाटा फुटतो. वातानुकूलन बंद केले. आता रस्ता विचारायला पाहिजे होता. म्हणून काचा खाली. मुन्नार कोठे कोणालाच ठाऊक नाही. एका केमिस्टच्या दुकानात विचारले. त्यांना अगम्य भाषेची सवय असते आणि इंग्रजीहि येते.

’ओ, यू मीन मुन्णार. हा ’न्णा’ मनोरंजक होता. धड ’न’ नाही व धड ’ण’ पण नाही. मग आम्ही तसा उच्चार करून विचारले तर प्रत्येकाला बरोबर कळले. संस्कृत भाषा की जय. आपलेच उच्चार बरोबर. पण न आणि ण च्या मध्ये एखादे व्यंजन असते तर बरे झाले असते. स्थानिक लोकांचा त्याच प्रदेशातील गावाच्या नावाचा उच्चार कसा चुकीचा असेल? आग लागो त्या फिरंग्यांच्या बोबड्या उच्चारांना. पण त्यांनी आधुनिक विज्ञान आणले म्हणून त्यांना माफ केले. आहे की नाही मी न्यायचतुर रामशास्त्री? अजून एक विषयांतर करून गंमत. माझे मावसे. त्यांना सर्व नाना म्हणत. एक अशिक्षित महिला त्यांना नाणा म्हणते. न म्हटले तर उच्चारता येतो. म्हटले तर नाही. आहे उत्तर?

दुपारपर्यंत मुन्णारचा घाट आला. पाच एक कि. मी. गेल्यावर समोरून एक गाडी आली. म्हणजे तशा येतच होत्या पण ही विशेष होती. दिल्लीचा नंबर होता. भर दुपारी हेडलाईट लावलेले. कॅरिअरवर पिवळे फॉगलाईट पण चालू होते. वा. दिल्लीची पद्धत दिसते. टळटळीत उन्हात फॉगलाईट. दिल्लीकरांची मनसोक्त टिंगल केली. पाचहि जणांचे एकमत. साले मुंबईवर अन्याय करतात काय? मज्जा आली.

जराशाने आणखी एकदोन गाड्या गेल्या. केरळातील नंबर. हेडलाईट चालू. आता मात्र आमची तोंडे पाहाण्यासारखी झाली. पण पाचहि जण मूर्ख होतो म्हणून बरे. तेरीभी चूप, मेरीभी चूपच. एकच असता तर त्याची खैर नव्हती. आणखी पाच एक कि. मी. गेलो. आणि काय. हवेने टोपी फिरवली होती. आणि आमची उडवली. पण वेगळ्या तर्‍हेने. ’गारवा’ मध्ये ऋतू ’कूस’ बदलतो तशी. (’गारवा’ नंतर आली. तेव्हा नव्हती) घनदाट ढग उतरलेले आणि पाऊस. दहापंधरा फुटावरचे पण दिसत नव्हते. आम्ही आता डोंगराच्या विरूद्ध बाजूस आलो होतो. दिल्लीवाल्याने उगीच नाही फॉगलाईट लावले होते. आम्ही ध्यानींमनीं नसतांना अचानक स्वप्नसृष्टीत प्रवेश केला होता. मुन्नारचे पहिलेच दर्शन जोरदार झाले होते. सकाळच्या उकाड्यानंतर त्याचे मोल काय आहे ते सांगून कळणार नाही. वाटले, आताच जून महिना लागलाय आणि पहिल्या पावसातून कॉलेजच्या पहिल्या दिवशी लेक्चरला चाललो आहे असे वाटायला लागले. रुपारेलच्या सुंदर कॅंपसमधील ते रंगीबेरंगी दिवस डोळ्यांसमोर आले.

नंतर ढग वरती गेले पण पाऊस मुसळधार झाला. वेग १५-२० कि.मी. वर आला. रस्ता अगदी खराब. समोरील वाहने अंगावर येताहेत असे वाटत होते. पण एक होते. येथील ड्रायव्हिंग तेल्लीचेरीसारखे ’खास’ नव्हते. तरी आमच्या सारथ्यांच्या कौशल्याला सलाम. मी आयुष्यात असे सारथ्य करू शकणार नाही. रौद्र निसर्गाच्या सान्निध्यातील सुंदर हवेतील कठीण प्रवासाचा थरार काही वेगळाच असतो. याचसाठी केला होता अट्टाहास. पण हे कौशल्य नसेल तर हा रोमांचकारी थरार क्षणांत मातीमोल होण्याची शक्यता असते.

असो. अखेर दीड एक तासांच्या खडतर प्रवासानंतर मुन्णार आले. सुदैवाने पाऊस कमी झाला होता. हॉटेलशोधन सुरू. मुन्णारचा कोपरा कोपरा धुंडाळला सगळी हॉटेले भरली होती. जगातील सगळे लोक मुन्णारलाच आले होते की काय? एक ’हॉटेल एस एन’ म्हणून आहे. बर्‍यापैकी स्वागत कक्ष. तेथील मॅनेजर कम मालक गृहस्थ छान हिंदी बोलत होते. साठीच्या आतबाहेरील असावेत. पूरा हॉटेल फुल्ल है. दो दिन जगह नही मिलेगी. त्यांनी आमची गाडी रस्त्याने जातांना पाहिली होती.
आपका नंबर बंबईका है?
जी हॉं. मी.
मैं बम्बई मे रहता था. अब्ब रिटायर हुआ. आई ऍम सिक्स्टी फाइव्ह नाऽव. वयाच्या मानाने खरेच तरूण दिसत होते. कितने लोग है? फॅमिली है की सब्ब जेंटस?
सब जेंट्स. पांच.
तो एक काम कर सकता हूं. आप बाकी होटल मे देखो. अगर किधर जग्गा नही मिलती है, तो मै आपको एक रूम दे सकता हूं. एकदम सिंपल है. एकही टॉईलेट है. इंडियन टोईलेट. पेंटिंग बाकी है. लेकिन क्लीन है. अगर आपको पसंत हो, तो.
म्हटले रूम तर पाहू. चाळीतील खोली असावी तशी एकच लांबलचक कळकट अंधारी खोली होती. दरवाजाच्या समोरच्या टोकाला एकच बाथरूम कम इंडियन टॉयलेट होते. उजव्या हाताला पांच कॉट्स रांगेने मांडल्या होत्या. गाद्या अभ्रे मात्र शुभ्र व स्वच्छ होते. बाकी हॉटेले हिंडलो होतोच. पावसाचा जोर पण वाढला होता. परत फिरून पुन्हा खाली उकाड्यात जाण्यापेक्षा हे काय वाईट होते? जाड्याला घासाघीस करायला त्याच्यावर सोडले. सोळाशे सांगितलेल्या रूमचे त्याने ती फार उदास व काळोखी आहे म्हणून किंमत कमी करून पाहिजे करत त्यांना पीळ पीळ पिळून हजार रुपयात पटवली. शेटजींच्या चेहऱ्यावरील हास्य रुंदावले.मस्त थंडगार हवा. आंघोळ करण्याआधी संध्याकाळपर्यंत पावसातच भिजत फिरण्याचे ठरले. शेटजी व मी छत्री घेऊन. शेटजींकडे कंडक्टरची धोपटी होती व माझ्याकडे विकत आणावयाचे सामान येणार होते. जोरदार पाऊस होता. वारा बेताचाच होता म्हणून नशीब. तरी खांदे व रिकामे डोके एवढाच ऐवज पूर्ण भिजला नाही. अर्ध्या पॅंटचे महत्त्व अशा वेळी कळते. पावसामुळे सृष्टिसौंदर्याचा आस्वाद घेता येत नव्हता. चारपाच फुटावरीलहि काऽऽही दिसत नव्हते. थोडेसे फिरून परतलो. आता माहेला अशा आणीबाणीच्या प्रसंगासाठी घेऊन ठेवलेली बकार्डी खुणावायला लागली. शेटजींनी एका दुकानात सुरेख दिसतात म्हणून वेफर्स घेतले होते. टॅपिओकाचे वेफर्स. चमकदार असे, दुधाच्या फेसाप्रमाणे पांढर्‍या शुभ्र रंगाचे. एवढे सुंदर दिसणारे वेफर्स आम्ही कोणीहि तोपर्यंत पाहिले नव्हते. पण धोरणीपणा दाखवून आम्ही तसे बोलून दाखविले नाही. निदान चार ग्रेट मेन थॉट अलाईक. थंडीत भिजून हुडहुडी भरल्यावर. त्या कळकट खोलीत बकार्डीला न्याय मिळणार नाही तसेच रूमवर खाद्यपदार्थ आणल्यास घाण होणारच. जसे गाडीत खाऊ नये तसेच रूमवरहि खाऊ नये. म्हणून त्या हिंदी बोलणार्‍या सद्गृहस्थांना जरा ’चांगली’ ’सोय’ करण्यास सांगितले. तेथे त्यांनी एका मोठ्या रूमचे तात्पुरते डायनिंग रूममध्ये परिवर्तन केलेले होतेच. सुरेख सोय केली. कॉर्किंग चार्जेसहि लावले नाहीत. पण एक अविस्मरणीय स्टोरी मिळाली. ते सुरेख आकर्षक दिसणारे वेफर्स. हाय रे दुर्दैवा. चामड्यासारखे चिवट होते. एकच खाईपर्यंत जबडा मोडून जाईल. चामडे, च्युईंग गम आणि बहुधा पोलादाने बनविलेले असावेत. नार्‍याच्या बैलालाऽऽ ............. आम्हाला आता जास्त चवदार खाद्य मिळाले. कायमचे. अजूनहि आम्ही त्याला आंऊ आंऊ करून तोंड वाकडे करून चिडवून दाखवतो व मुन्णारचे वेफर्स एवढेच उच्चारतो. अथातो मुन्नारस्या वेफरकथा. जाड्याची पाण्याची बाटली आणि ते वेफर्स या दोन गोष्टी त्यांना मरेपर्यंत पुरतील. केरळी लोकांना चवीचे एवढे वावडे कां कळत नाही. रात्री पाऊस वाढला. जेवणानंतर फिरण्याची काहीच सोय राहिली नाही. उद्या काय करायचे. दोन रात्री राहण्याचा बेत होता. जर उद्या मुन्णार पाहता आले तर राहू. नाहीतर प्लान बदलू. वाट फुटेल तिथे जायचे आहे. मग त्या उकाड्यातून छोट्या गाडीत पाच जण? चार असतो तर गोष्ट वेगळी. कन्याकुमारी कॅन्सल. कोडाईला जाऊ. दोन रात्री राहू. कारण रस्ता घाटाचा. आणि वाईटच असणार. गाडी चालवतांना फार त्रास होणार. तेथून टेकडी (लिहितात ’थेक्कडी’ असे. केरळ्यांच्या बैलालाऽऽ ...) जरूर पडली तर एखादी रात्र राहू. तेथून कोट्टायम. कोट्टायमपासून बॅकवॉटर्स फक्त १४ कि.मी. आहे. मास्तरांनी माहिती पुरविली. नकाशातहि तसेच दिसत होते. दिवसभर बॅकवॉटर्सला फिरू. संध्याकाळी पुन्हा कोट्टायम. नंतर मुंबईकडे प्रवास सुरू करू. वाटेत एर्नाकुलम. म्हणजे कोचीन. तेथे चायनीज फिशिंग नेट्स पाहू. असेल तर आणखी एखादे ठिकाण. मग परतीचा प्रवास मजल दरमजल करीत पुणे. व देवाची गाडी घेऊन परत मुंबई. ठरले. आम्ही मद्याच्या आहारी जात नाही. इतरांना उपद्रव करीत नाही. स्वत: आनंद लुटतो व थोडे जास्त खिदळतो. बकार्डीला न्याय देता देता हे प्लानिंग केले. असो. नंतर गुढगे टेकण्याचा समारंभ.झोपलो.

०६ऑक्टोबर २०००.
सकाळी साडेपाच सहालाच किचनमधून किणकिणाट ऐकू आला. अहाहा. त्या क्षणी जगात यापेक्षा चांगले संगीत असूच शकत नाही. चहा घेतला. आकाश ढगाळच होते. पण नम्तर मात्र थोड्याच वेळात लख्ख ऊन पडले. उत्साहवर्धक हवा. त्या छान वातावरणातून पाय निघेना. देवाने हॅंडिकॅम काढला. वेड्यासारखा कॅम घेऊन फिरत होता. एका बाजूला ’सरवान’ हॉटेल होते. (सरवान आणि आर्य ही तमिळनाडूमधील सुप्रसिद्ध चेन हॉटेल्स आहेत. हे दोन्ही केरळी नसल्यामुळे दोन्हीतील पदार्थ चवदार व विशिष्ट चांगल्या सातत्यपूर्ण दर्जाचे असतात.) तत्परतेने पोटभर खाऊन घेतले. ’सरवान’मध्ये तीन वेगवेगळ्या चटण्या असतात. हिरव्या मिरचीची कोथिंबीर घातलेली तिखट चटणी, चिंचेची चटणी व आपल्याकडे न मिळणारी टोमॅटोची चटणी. हव्या तेवढ्या. नाहीतरी इडलीला स्वत:ची अशी खास वेगळी जी चव असते ती चटण्यासांबारानेच जास्त खुलते. लवकरात लौकर निघून पर्यायी प्लान अंमलात आणायचे ठरले.

पण या हॉटेल एस एन ने आम्हाला एक रात्र चांगले छप्पर तर दिले. एस एन च्या मालक कम मॅनेजरशेठना चांगल्या सेवेसाठी धन्यवाद दिले त्यांनी नेक्स्ट टाईम इधर हमारे हॉटेलमेही जरूर आना म्हणून धन्यवाद दिले. २००४ साली आम्ही पुन्हा त्याच हॉटेलात उतरलो. आणि त्यांनी आम्हाला बरोबर ओळखले. असो. कोडाईकडे कूच केले.

संपूर्ण रस्ता डोंगरातील घाटाचा व वळणावळणांचा. आम्ही मागील प्रवासी मजेत होतो. पण रस्त्याने सारथ्यांची चांगलीच कसोटी पाहिली. एक घाट संपनो न संपतो तोंच दुसरा सुरु. असे वाटायला लागले की या रस्त्याला शेवटच नाही. आयुष्याच्या अंतापर्यंत असेच घाटातून वळणे घेत जावे लागणार. एकाबाजूला उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. घनदाट वनराई. संपूर्ण निर्मनुष्य. हा टापू तेव्हा भरात असलेल्या वीरप्पनचा होता.

तीन साडेतीन तासांनी एकदाचे एका पठारावर आलो. २५ ३० कि. मी. गेल्यावर एके ठिकाणी रस्त्याच्या समोरच्या कडेला एक टपरी दिसली. चहा घेऊन ताजेतवाने व्हावे म्हणून थांबलो. आता अरण्य संपले होते. पण झाडोरा बर्‍यापैकी होता. असे वाटले की दक्षिण कोंकणातच आहोंत. उतरल्यावर जाणवले की हवा गरम होती. चहा घ्यावा की न घ्यावा या विचारात चारहि जण पडलो. जाड्या सकाळी एकदाच चहा घेतो. मी टपरीवर गेलो. टपरी ही एक झोपडीच होती. आतूनबाहेरून शेणाने सारवलेल्या भिंती. वर झावळ्यांचे व पेंढ्याचे छप्पर. रस्त्याकडे खिडकी होती. डाव्या बाजूने दरवाजा होता. रस्त्याच्या विरूद्ध बाजूला आणखी एक खिडकी होती. तेथे फक्त जेवण मिळत होते. काय काय आहे ते पाहिले. साधा भात, पोंगलभात, सांबार, दोन भाज्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताकाची कढी होती. स्वच्छ चकचकीत स्टीलच्या बादलीत ठेवलेली. एकदम पातळशी कढी, भरपूर कोथिंबीर तरंगत असलेली. फोडणीचा खमंग दरवळ. पदार्थ केळीच्या पानावर वाढले जात होते. टेबले अस्सल ग्रामीण. न रंधवलेल्या ओबडधोबड फळ्या खिळ्याने ठोकून बनविलेली. समोरच्या खिडकी पलीकडे ग्रामीण डस्ट बिन कम वॉश बेसिन होते. लोक त्यांत हातहि धूत होते व खाऊन झाल्यावर स्वत:च केळीचे पान त्यातच नेऊन टाकत होते. फोडणीचा दरवळ मला दूर ठेवू शकला नाही. पण आता तमिळ भाषेशी गांठ होती. मी बोलण्याचा शहाणपणा केला नाही. तेथील विक्रेत्याला स्टीलचा ग्लास दाखवला व ’एक’ या अर्थी तर्जनी एक क्षण उभी धरली आणि लगेच कढीची बादली दाखवली. त्याने लगेच एक ग्लास भरून कढी दिली. करपल्लवी झिंदाबाद. कढीच्या चवीने निराशा केली नाही. थंडगार कढी त्या रणरणत्या उन्हात सुरेखच होती. मला कांहीतरी चांगले सरबत गवसल्याचे बाकीच्यांनी ताडले व सगळे उतरून रस्ता ओलांडून आले. त्यांना वाटले सरबताचा स्टॉल आहे. पण जेवण पाहून त्यांना गंमत वाटली. सगळेजण दोनतीन ग्लास कढी प्यायले. जाड्याने तेवढ्यात प्रवासाला निघाल्यानंतर प्रथमच पाहिलेला पोंगलभात खाऊन पाहिला. आम्ही पण एकेक घास घेऊन चव पाहिली. खरोखरच उत्कृष्ट चव होती.

चवीच्या बाबतीत तमिळनाडु केरळच्या विरूद्ध टोकाला आहे. कोणत्याहि टपरीत जा व इडली, (मेदू)वडा, डोसा वगैरे छान व गरमागरम असते. सांबार व दोनतीन चटण्या भरपूर व हव्या तेवढ्या आणि चविष्ट असतात. ताजेतवाने होऊन निघालो. लगेच पुढला घाट लागला. तीनचारच्या सुमारास कोडाईला पोहोचलो. सुरेखच हवा. किंचित उतरत्या दुपारी पोहोचूनहि घामाचा टिपूसहि नव्हता. २०-२२ च्या आसपास तपमान असावे. हॉटेलात जागा नव्हत्या. जेथे होत्या ती पसंत आली नाहींत. वर फार महाग होती. सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्यामुळे गाईड, हॉटेलांचे एजंट वगैरे त्वरित आपल्या भोवती गोळा होतात. एका एजंटला आम्हाला हॉटेल कसे स्वस्त आणि मस्त तसेच सुरक्षित पार्किंग असलेले पाहिजे ते इंग्रजीतून समजावले. पार शहराच्या टोकाशी असलेले एक हॉटेल त्याने दाखविले. ठीक होते. जरा दूर म्हणजे हिलस्टेशनात असतो त्या मध्यवर्ती बाजारापासून दोनटीन कि. मी. दूर होते. चला. तेवढेच चालणे होईल. पण एकच प्रश्न होता. बाजूलाच मशीद होती. मशिदीला कर्णे होते. हॉटेल डोंगर‍उतारावर होते. आम्ही बेसमेंटमधील खोल्या घेतल्या. खिडक्या दरीत उघडत होत्या. याचे नाव हॉटेल मधुचंद्र असायला हरकत नव्हती. छताला भलेमोठे आरसे होते. पण दर फारच माफक होते. जाड्याने ते रु. ३५०.०० पर्यंत उतरवले. त्याला पदक द्यायला हरकत नाही. चेक इन करतांना आम्ही मराठीतून पण गुप्तभाषेत वाह्यात गोष्टी करत होतो. आणि ते मॅनेजरसाहेब म्हणाले, "अहो साहेब मला मराठी कळते. मी तमिळ मुस्लिम आहे खरा पण मी नांदेडला दहाबारा वर्षे होतो." नंतर दोन दिवस ते आमच्याशी स्वच्छ मराठीतच बोलत होते. आजकाल पर्यटकात मराठी लोक जास्त असतात. म्हणून पर्यटनव्यवसायात इंग्रजी हिंदीखालोखाल मराठी येणाऱ्यांना प्राधान्य मिळते. काय बरे वाटले की नाही ऐकून? यांनी पण चांगली सेवा दिली.

मग सामान उतरवून फ्रेश होऊन फिरायला बाहेर पडलो. येथे रस्त्यावर ठिकठिकाणी उकडलेले शेंगदाणे मिळतात. नुसते उकडलेले, मसालामिश्रित किंवा मसाला व बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घतलेले उकडलेले शेंगदाणे. तसेच निलगिरी तेलाच्या बाटल्या, हाती बनविलेली चॉकलेटे, कॉफी बिया तसेच साऊथ इंडिअन, चिकॉरी मिश्रित वगैरे विविध प्रकारची कॉफी पूड, मी एक आठवण म्हणून निलगिरीची बाटली घेतली. ती अजूनपर्यंत होती. आमचा मुलगा सर्दी झाल्यावर ते रुमालालावून वास घेत असे. ते संपल्यानंतर मात्र त्याने दुसरे आणले नाही. कच्चे व पिकलेले तोतापुरी आंबे होते. कच्चे आंबे कापून मीठमसाला लावून रस्त्यावर मिळतात. ते पाहून शाळेतील दिवसांची आठवण झाली. हे बारा महिने मिळतात म्हणे. दुसरे दिवशी फ़िरायला गाडी व गाईड ठरवला. या वेळी मारूती व्हॅन मिळाली.
क्रमश:

वाट फुटेल तिथे - ४

PRAVAASSUDHIRSANGE
Thursday, May 8, 2008

वाट फुटेल तिथे ४
दिव्य केरळी उच्चार आणि ती रहदारी
४ ऑक्टोबर २०००.मडिकेरीच्या रम्य आठवणी घेऊन निघालो. मॅसांचे आभार मानले. त्यांनी सकाळी वेळेवर बिल दिले. तेल्लीचेरीला जाणार रस्ता कोठून जातो त्याचे अगत्याने मार्गदर्शन केले. सारथ्यांनी व्यवस्थित समजून घेतले. त्यांचे आम्ही सर्वांनी पुन्हा आभार मानले. खरेच मन उमदे असेल तर आपले व्यक्तिमत्त्व कोणत्याहि कामांत उतरते व त्या पदावर आपला ठसा उमटतो. मॅसा मुळे त्या सरकारी पदाची शोभा वाढली हे निस्संशय. सातसाडेसातला निघालो.

आता आम्ही वेगळ्या दिशेने जात होतो. रस्त्याला लागून डेरेदार वृक्ष. त्यापलीकडे दुतर्फा चहाचे मळे. आल्हाददायक दृश्य. मी लहान मुलासारखा सीटवर गुढगे टेकून मागे तोंड करुन निसर्ग डोळ्यात साठवत होतो. बाजूच्या दोघापेक्षा मी नशीबवान होतो. मला संपूर्ण दृश्य दिसत होते.मास्तरांनी विशिष्ट पद्धतीने साडी नेसलेल्या स्त्रिया दाखविल्या. चहाच्या मळ्यावरील कामकरी स्त्रिया. ‘कूर्ग जिल्ह्यातील चहाच्या मळ्यातील काम करणारी स्त्री’ अशा मथळ्याचे चित्र शाळेत असतांना भूगोलाच्या पुस्तकात होते ते मास्तराला त्वरित आठवले आम्हा इतरांना नंतर आठवले, फेटेधारी नसतांना देखील. परंतु त्याला त्वरित आठवले.


घाट चढतांना अप्रतिम सेट डोसा मिळाला. उतरतांना कां मिळू नये! वाटेत एक टुमदार गांव लागले. आठवड्याचा बाजार भरला होता. सुरेख हवेमुळे पोटातील कावळ्यांना कंठ फुटला. क्षुधा शांति भवन शोधूं लागलो. एके ठिकाणी पार्किंग मिळाले. हॉटेल काही दिसेना. करपल्लवीचा आधार घेतला. एकाने हॉटेल दाखविले. बेत काही खास नव्हता. काय खाल्ले आता आठवत नाही. निघालो. घाट उतरणे पुढे सुरु.

गाडीच्या चाकांची रस्त्याशी तीव्र उतारावर जी झटापट चालू होती त्या गडबडीत माझी बॅग माझ्या मानेवर यायला लागली. माझ्या मानेवर एक जूं आले असून ते अगदी योग्य आहे, किंबहुना ते येण्यास फार उशीर झाला आहे, नव्हे ते जन्मत:च असायला हवे होते यावर इतर चौघांचे एकमत झले. अर्थात ऑल ग्रेट मेन थिंक अलाईक.

मी पुन्हा मागे तोंड करून गुढगे सीटवर ठेवून माझी बॅग त्याखालील बॅगवर दोरीने बांधायला लागलो. गाडीच्या मागच्या काचेतून नजर टाकली. विश्वास बसेना एवढे सुंदर दृश्य. घनदाट अरण्य म्हणजे काय? फक्त ब्रिज इन रिव्हर क्वाय सारख्या सिनेमात पाहिले होते. परंतु प्रत्यक्ष दर्शन मात्र कल्पनातीत सुन्दर. मी शब्दप्रभू नाही याचे दु:ख होते. ते वर्णन करण्यासाठी कवीलाच तेथे उतरावे लागेल. ते अरण्याचे दृश्य मनावर कोरलेले आहे.
केरळ्च्या सीमेत प्रवेश केल्यावर एक फरक जाणवला. सीमेवरच्या गावातील बाजारालगतच रस्ता जातो. माणसांची प्रचंड गर्दी. आणि गावाला लागून गावे. निर्मनुष्य प्रदेशच नाही. पुढील ठिकाण होते मुन्नार. त्या रस्त्यावर आमच्या नकाशात केरळ्मधील थल्लीसेरी हे गाव दिसत होते. इंग्रजी स्पेलिंगप्रमाणे. डावीकडे पुढे देवा व मागे जाड्या होते. साहाजिकच रस्ता विचारण्याची जबाबदारी त्या दोघांची. थल्लीसेरी कोठे आहे कोणालाच माहिती दिसेना. तुमचे मुखचंद्र पाहून लोकांना पत्ता सांगावासा वाटत नाही किंवा ते तो विसरत तरी असावेत. आमची मल्लिनाथी. पण टिंगल आणि आचरट विनोद हा पर्याय नव्हे. वेग २० - २५ वर आला. "अरे तेच तेल्लीचेरी असणार." मास्तरांना साक्षात्कार झाला. आणि कपडे घालून युरेका. त्वरित प्रतिसाद मिळाला. (टंकतांना चुकून प्रीतिसाद टाईप केले होते. नवीन शब्द मिळाला. शिंप्याची चूक हीच फॅशन होय, या थाटात.)

पावसाची रिपरिप चालू झाली. इथे मान्सून अद्याप कार्यरत होता. हवा मुंबईपेक्षा गरम. आता आगेकूच सुरु झाली. केरळमधील कुशल सारथी चांगलेच हात दाखवू लागले. मोठ्ठ्या बसेस (अनेकवचन बशी करावे का?) आपल्या गाडीच्या मागे चिकटून जोराजोरात पांचजन्य करून बाजूला होण्यास सांगतात (साईड मागतात). डावीकडे जाऊन रस्ता दिला की अति जवळून अति वेगात पुढे जातात. सहाइंचाचे अंतर जरी ठेवले तरी शिक्षा असावी. रॅश हा शब्द लाजेल असे ड्रायव्हिंग. आणि जरा पुढे जाऊन एकदोन किलोमीटरवर थांबतात. कारण त्यांचा थांबा असतो. पुन्हा आपण पुढे जायचे. सुटलो म्हणून श्वास घ्यावा तो पुन्हा मागून पांचजन्य. अशा लडिवाळ रहदारीतून अखेर तेल्लीचेरी आले. तेल्लीचेरी शहरातील रहदारी कशी? तर मुंबईत दुपारी दवाबाजारात असते तशी. चिंचोळ्या गल्ल्या आणि मोठ्या वाहनांची बेशिस्त अशी प्रचंड गर्दी. नियम पाळल्यास मृत्युदंड असावा. ही केरळ स्पेशल रहदारी बरे का. मुंबई पुण्यात राहून याची कल्पना येणार नाही. तेल्लीचेरीला लागूनच ‘माहे’ हा केंद्रशासित प्रदेश (युनिअन टेरिटरी) आहे. तेल्लीचेरी कोठे संपते व माहे कोठे सुरू होते हे दुकानावरूनच कळते. तसा वाटेत एक छोट्या गावातील जकातनाक्यासारखा जकात नाका आहे. पण त्याने आम्हाला थांबविले नाही. एका शहराचेच दोन भाग. दुसरे काय! "युनिअन टेरिटरी ऑफ़ माहे ऍंड पॉण्डिचेरी" माहे कुठे पॉण्डिचेरी कुठे. सरकारी विनोद. आणखी काय! गंमत म्हणजे पॉण्डिचेरीचे स्पेलिंग तेल्लीचेरी सारखे नाही. समाजवादाचा अभाव बरे. एवढा पंक्तिप्रपंच बरा नव्हे. कोण म्हणतो केरळमध्ये साम्यवाद्यांचा जोर आहे? आणखी एक गंमत. मुंबईच्या दवा बाजारात जेवढी औषधाची दुकाने नसतील त्यापेक्षा जास्त येथे दारूची आहेत. थोडक्यात म्हणजे मद्यप्रेमीचे तीर्थक्षेत्र. खरे म्हणजे एका सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय धर्मपीठाचेच नाव जिभेवर आलेले आहो. कोणते ते चतुर आणि चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच. कुतूहल म्हणून उतरून दर पाहिले. ७५० मि ली रम रू १२८, ७५० मि ली बकार्डी रू ४५० रेव्हिएरा वाईन रू ६५० त्या वेळी यांचा मुंबईतील किंमती अनुक्रमे रू. २००, ८५० व १२०० होत्या. हे राज्य सगळीकडून केरळने वेढले आहे. पश्चिमेला समुद्रकिनारा असावा. मग वेगळ्या राज्याचे प्रयोजन काय. सरकारच जाणे. मद्यप्रेमींची चांगलीच सोय. केरळमधून ५० कि मी पर्यंत पासूनचे लोक येतात मद्यप्राशनाचा आनंद लुटतात व घरी (किंवा गटारात) जातात. जवळजवळ सर्व दुकानात पिण्यासाठी कक्ष देखील केलेले आहेत. श्रेष्ठ तळीरामांना राज्य सरकार तर्फ़े पुरस्कार दिले जातात की काय ठाऊक नाही. असल्यास माझा सलाम. नसल्यास कठोर निषेध. अथातो मद्यजिज्ञासा.या जिज्ञासेत अर्धा तास खर्च केला. निघालो.

नकाशातल्या मार्गावरील पुढील ठिकाण होतेकालिकत. ’वॉस्को द गामा १४९८ साली कालिकत येथे आला’ हे वाक्य आपण सर्वांनी शाळेत असतांना इतिहासात वाचले असेलच. या ठिकाणाबाबत एक गंमत आहे. मी जेथे काम करतो (दुर्दैवाने पोटासाठी करावे लागते) तेथील डिस्पॅच खाते एकदा एकाच्या गैरहजेरीत मी सांभाळले होते. परचेस ऑर्डर पाहून माल कालिकतला पाठविला. बिलांच्या मूळ प्रती बॅंकेत पाठवायच्या वेळी त्यांच्या कार्यालयाचा व कारखान्याचा पत्ता वाचतो तर काय, कोझीकोडे. मी टरकलो. माझे थोबाड पाहून सुमति नामक स्टेनो पण टरकली. वॉट्ट हॅप्पण्ड? तिने विचारले. मी म्हटले ऑर्डर ऑफ़ रामेश्वर, गुड्स सेंट टू सोमेश्वर. कंप्लीट डिसऑर्डर ऑफ़ पर्चेस ऑर्डर. कालिकत का माल कोझीकोडे भेजा. ती बया हसायला लागली. ती केरळीच होती. बोथ्थ आर दी सेम. टू नेम्स ऑफ्फ वन्न प्लेस. माझा जीव कालिकतच्या भांड्यात. असो.

एका मैलाच्या दगडावर चक्क हिंदी पाटी दिसली. ’कोषिकोडे ---- किमी’ अशी. मिसळपाव डॉट कॉमचे सभासद आणि लेखक वाचक श्री. अनिकेत यांनी कोळिकोडे असे या शहराचे तिसरे नाव कळविले आहे. धन्य ते केरळी उच्चार. हे लोक जर आमच्या शाळेत शिकले असते तर झेब्र्यासारखे दिसले असते. शिक्षकांच्या छड्या खाऊन. पुढील विचित्र नावे मात्र इंग्रजी दगडावर बरोबर लिहिली होती. पोन्नान्नी, गुरुवायूर, इरिंजळकुड्डा. तरी चवक्कल कांही ठिकाणी चव्वक्कड केले होते. पण फारशी गफलत नव्हती.

मुन्नारला संध्याकाळपर्यंत पोचणे शक्य नव्हते. अंतर फार. वाटेत कोठेतरी मुक्काम करावाच लागणार. तर जरासा वळसा घेऊन कालडी का पाहू नये. आद्य शंकराचार्यांचे जन्मस्थान. आम्ही जरी धार्मिक नसलो तरी एका लोकोत्तर पुरुषाच्या जन्मस्थानी जायला काय हरकत आहे? हजार अकराशे वर्षापूर्वी दळणवळणाची साधने काय होती असावीत? घोडा, बैलगाडी आणि घोडागाडी. आणि अर्थात गांधीविनोबांची अकरा नंबरची बस. या महापुरुषाने त्या काळी जवळजवळ संपूर्ण हिंदुस्थानचा दौरा करून वादविवादात इतर धर्मांच्या तत्कालीन पंडितांना खासकरून बौद्ध धर्मीय; जिंकून हिंदु धर्माचे पुनरुज्जीवन केले. अफाट विद्वत्ता आणि जीवनाचे एवढे प्रचंड ध्येय समोर ठेऊन ते चिकाटीने पूर्ण करणे हे अलौकिकच होय. अशा विद्वान आणि थोर व्यक्तीला वंदन करून आमचा स्वाभिमान काय कोसळणार की बुडणार होता? कालडीवरून जायचे एकमताने ठरले.

धार्मिक असलेले शेटजी खूष झाले. गुरूवायूर मात्र टाळले. तेथील मंदिर फार सुंदर आहे असे आम्हाला वाटेत कोणीतरी पत्ता सांगणाऱ्याने सांगितले. त्रिचूर (वा त्रिशूर) मार्गे कालडी. येथे थांबलो.सुबक प्रवेशद्वार. आत कॅमेरा नेता येत नाही. तो प्रवेशाशी जमा करावा लागतो. पावती न घेता. प्रकाशचित्रे येथून निघतांना प्रवेशापाशी काढली. हे केंद्र आतून पाहतांना मला वरळीच्या नेहरू सेंटरची आठवण झाली. गोल इमारत. बाहेरील भिंतीला लागून आतील बाजूने जिना. दोनतीन फ़ूट लांबीच्या पायर्‍या. दर पांचसहा पायर्‍यानंतर मजले किंवा कोनाडे केले आहेत. आद्य शंकराचार्यांच्या जीवनातील प्रसंगावरील व दंतकथांवरील देखावे आहेत. त्याबद्दल मी कांही लिहीत नाहीं. ते तेथेच जाऊन पाहावे.

संध्याकाळपर्यंत कोचीनपर्यंत पोहोचू असे वाटले होते. पण वाटेतच संध्याकाळ होऊ लागली. पावणेसहाच्यासुमारास इडप्पल नावाच्या छोट्या शहरसदृश गावात आलो. इडप्पल गावामधूनच रा.म.मा. १७ जातो. चांगले सोडाच, बरेसे देखील हॉटेल दिसेना. अखेर एका शॉपिंग सेंटरमध्ये हॉटेल बॉम्बे ची पाटी दिसली. जाऊन पाहिले. तीन खोल्यांचा बर्‍यापैकी सूईट होता. प्रशस्त लिव्हिंग रूम, प्रशस्त बेडरूम व अलीशान वेटिंग. भाडे रु. ३५०.०० फक्त. आश्चर्य वाटले. टॉवेल, साबण कांही नाही. गरम पाण्याची सोय नाही. हवा तर मुंबईपेक्षा जास्त उकाड्याची. चला, टेकायला स्वच्छ आणि चांगली जागा तर मिळाली. ती देखील स्वस्तात. आंघोळी करून फेरफटका मारायला बाहेर पडलो. हे जे हॉटेल होते ते हॉटेल नव्हतेच. ते एक सभागृह वजा लग्नाचा हॉल होता. हॉल अगदी थेट पुण्यामुंबईच्या सिनेमा हॉलसारखा. लग्न गृह असल्यामुळे हॉलला लागून दोन सुईट होते. एक वरपक्षासाठी व दुसरा वधूपक्षासाठी. जेव्हा लग्न नसे तेव्हा हे सुईट ते  ’बॉंबे हॉटेल’ होत असत. छोटे गांव म्हणून स्वस्त. काय कल्पकता आहे. मुख्य म्हणजे गाड्या ठेवायला प्रशस्त तळघर होते. सुरक्षा असलेले.

मग फिरतांना जेऊनच हॉटेलात परतण्याचे ठरले. येथे पाहण्यासारखे काहीच नव्हते. जेवण्यासाठी हॉटेल शोधून ठेवत होतोच. ख्रिस्ती बंधूंची काही हॉटेले होती. दर मुंबईपेक्षा किंचित कमी. म्हणजे तसे महागच. चिकन मटन मसाला रू. ७५.०० प्लेट च्या आसपास. बीफ़ रू. २५.०० फक्त. ईडली, डोसा कोठेच नव्हते. मल्याळमखेरीज दुसरी भाषा कोणाला येत नाही. दुकानांच्या पाट्यावर सगळ्या जिलेबी काढलेली. क्वचित एखादी फ़िरंगी पाटी. शेवटी एका हॉटेलातील वेटरने इडली, डोसा, चपाती, रोटी कोठे मिळेल ते मल्याळीमध्ये खाणा खुणा करून सांगितले. खाणाखूणा मात्र कळल्या. समोरच्या पदपथावर थोडे पुढे ते हॉटेल आहे असे त्याने खाणाखुणा करून सांगितले. एक गोल गरगरीत पण अतिशय आनंदी चेहर्‍याचा मालक गल्ल्यावर बसला होता. फक्त गुडुगुडू. काय बोलतो कळेना. आम्ही बोलतो ते त्याला गुडुगुडु. त्याने एकाला हाक मारली. एक वेटर आला. त्याला मोडतोड हिंदी बोलता येत होते. शाकाहारी जेवायचे म्हटल्यावर आत एक वातानुकूलित कक्ष होता तेथे नेले. थंड चिवट चपाती आणि सपक अळणी भाजी मिळाली. खोबरेलात बनवलेली भाजी. कसेबसे ढकलले. इडली डोसे फक्त सकाळी. इतर लोक थंड उकडा भात व थंड रस्सा खातांना दिसले. पण त्याचे रंगरूप पाहून ते न खाण्याचे ठरविले. पदार्थ चवदार नाही तर निदान गरम तरी बरा लागतो हेहि या थोर लोकांना ठाऊक नसावे. चवीचे तर वावडेच असावे. प्यायला उकळते गरम पाणी. चहाच्या काढ्याच्या रंगाचे. त्यात कसलीशी पाने असतात. ते मात्र पिऊन पाहिले. बहुधा सर्वात चवदार पदार्थ हाच असावा. हे बहुधा त्या हवामानाला उपकारक असावे. गरम असून याने तहान भागते हे खरेच. थंड फराळ (थंडा नव्हे) व गरम पाणी हा संगम अनोखाच. दुसरे दिवशी सकाळी गरमागरम इडली व डोसा मिळणार. साडेआठला हॉटेल उघडल्यावर. चला, हेहि नसे थोडके. आता रात्री अर्धपोटी असल्यामुळे सकाळी येथेच न्याहारी करून निघण्याचे ठरले.

खास काही घडले नाही, सामान्य गोष्टीच आम्हाला वेगळ्या अनुभवामुळे व उत्तेजित प्रसन्न मनस्थितीमुळे खास वाटल्या.
क्रमश:
पूर्वप्रसिद्धी(Published earlier): misalpav।com 09 Mar। 2008