रत्नागिरी आणि मुर्डेश्वर
२ ऑक्टोबर २०००.
सकाळी पाचला उठून पावणेसहा सहाला फिरायला बाहेर पडलो. नार्या हॉटेलातच थांबला. नार्याला उशिरा उठायला आवडते. त्यामुळे मी व जाड्या दाढी व्यायाम व आंघोळ आटोपेपर्यंत त्याला झोपायला मिळते. जाड्याला जास्त वेळ व्यायाम करावा लागतो. मला कमी. त्यामुळे त्याचा व्यायाम होईपर्यंत माझी दाढी व आंघोळ होते. अशा तर्हेने एक बाथरूम आम्हा तिघांना पुरते. अद्याप हॉटेलचे सर्व कर्मचारी झोपले होते. मराठी माणसाच्या या हॉटेलात साडेसहाला न्याहारी वा चहा सोडाच बिल मिळाले तरी खूप. मुंबईसारखीच घामट पण शुद्ध हवा. कुंद वातावरण. पण माझ्या उत्साहावर या गोष्टी पाणी ओतू शकत नाहीत. माझा रथ सदैव चार अंगुळे वरच. बोलण्यात आचराटपणा भरपूर. आचरटचार्य अशी पदवीच आहे माझ्याकडे. जाड्याच्या जिभेवर सदैव सरस्वतीचे नृत्य. साहजिकच सगळ्यांनाच चेव येतो. न्याहारीसाठी चांगले आरोग्य भुवन कोठे आहेत हे पाहून ठेवले. आज न्याहारी व दुपारचे जेवण याऐवजी ब्रंच घेऊन कालचा बॅकलॉग भरून काढू असे ठरवीत होतो. अपेक्षेप्रमाणे न्याहारी मिळाली नाहीच. बिलच साडेसातला मिळाले. नार्या आला. न्याहारीला बाहेरच्या आरोग्य भुवनांत बोलावून घेतले होते. ओम मोबाईल नम: (तेव्हा नवीनच आणि कॉल फार महाग होते) रत्नागिरी म्हणजे बटाटेवडे उत्तम असायला आपली हरकत नसते. परंतु आरोग्य भुवनवाल्याची हरकत होती. सगळेच पदार्थ सपक व बेचव होते. असो. उदरभरण झाले हेहि नसे थोडके. खाण्याच्या कोणत्याहि पदार्थाला नाव ठेवले की जाड्याला राग येतो. साले तुम्ही आयते खायला सोकावले आहात म्हणतो व फ़ैलावर घेतो. तो या संधीची वाटच पाहत होता. पण. पण आम्ही देखील अखेर त्याचेच मित्र. आमच्या चेहर्यावर त्याला तसे वाचता येत होते. त्यामुळेच आम्ही खोटेखोटे छानछान म्हणून खात होतो. स्वाभाविकच त्याची फार कुचंबणा झाली व आम्हा इतर चौघांना फारच मज्जा आली. खातांना चौघे एकमेकांकडे पाहून बराच वेळ गालातल्या गालात हसत होतो. फार म्हणजे फारच करमणूक झाली. साराच आचरटपणा. दुसरे काय! तोदेखील करावा म्हणून तर बाहेर पडलो.
निघालो नऊसाडेनऊला. पेट्रोल भरले. हवा तपासून घेतली व मार्गस्थ झालो. अर्ध्या तासात रा म मा १७ आला. दोन अडीच तासांनी ड्रायव्हरची पदावनती व किलींडरची पदोन्नती होत होती. रत्नागिरीच्या पुढे रा म मा १७ च्या दुतर्फा छान झाडे आहेत. घाट आला की वातानुकूलन बंद करावे लागे. कारण त्या इंजिनाच्या नाजूक जीवाला ते पेलत नसे. पण आपल्या मुंबईच्या मानाने हवा तशी बरी होती व घाटात हवा जरा थंडच असते. घामही फारसा आला नाही. घाट आला की सगळे गप्प होऊन निसर्ग सौंदर्य पाहाण्यात मग्न होत. याचा आणखी एक फायदा म्हणजे घाटात जेव्हा जास्त एकाग्रतेची गरज असते तेव्हा ड्रायव्हरचे लक्ष विचलित होत नाही. गोवा आले व गेले. कारवार जवळ येऊ लागले तसे जाड्याला ऊत आला. आमच्या सौ चे माहेर नन्दनगद्दा. कारवारपासून पाचएक किलोमीटर. ते कोठे आहे ते कारवारच्या पुलाअलिकडून त्याला दाखवले. लगेच त्याने आमच्या सौ ला "हर हायनेस प्रिन्सेस ऑफ नन्दनगद्दा" हा किताब जाहीर केला. साधारण तीन ते चारच्या दरम्यान तेथून जात होतो. दीडदोन तासांनी मुर्डेश्वरला पोहोचलो. रा म मा १७ ने दक्षिणेकडे जातांना मुर्डेश्वर स्टेशनकडून मुर्डेश्वरला जाण्यासाठी फाटा आहे. उजवीकडे क्षितिजावर शंकराची एक प्रचंड मूर्ती दिसू लागते.
खालील प्रकाशचित्र पाहा. नक्कीच वाईट आहे पण कल्पनायेईल
नंतर ती समोर दिसूं लागते. तेथे आर एन शेट्टी हे फार बडे प्रस्थ आहे हे जाणवत होते. रस्त्याने पाहावे तिथे आर एन शेट्टी. दोघेहि चालक फार थकले होते. कावळे सगळ्यांच्याच पोटात कोकलत होते. हॉटेले फ़ार महाग. पावसाची बुरबुरहि चालू झाली होती. हॉटेल शोधतांना किमान पाचसहा हॉटेले नापसंत करून आम्ही तिघांच्याहि वाट पाहाण्याच्या शक्तीचा अंत पाहिला. दर व सोयी यांचे गणित काही जुळता जुळेन. शेवटी आर एन शेट्टी ट्रस्टचे हॉस्टेल मिळले. त्याचे स्थान (लोकेशन) फारच रमणीय आहे. मागील बाजूने समुद्रात घुसले आहे. तीन बाजूंना समुद्र दिसतो. अलौकिक देखावा. ऑफसीझन असल्यामुळे जवळजवळ निम्मे दर होते. तेव्हा २००० साली नेहमीचा डबल ऑक्युपन्सीचा दर रू. ८५०.०० व ऑफ सीझन म्हणून रू. ४७५.०० होते. थोडक्यात म्हणजे उर्दूवाचन चांगले होते. हे आर एन शेट्टी बहुधा पुण्याचे असायला हरकत नाही. हॉटेलच्या कार्यालयाबाहेरच दरवाजाच्या डाव्या बाजूला लांबलचक भली मोठी पाटी होती. मद्यपान करू नये तसेच अंमली पदार्थ आणू नयेत. आढळल्यास बाहेर घालविले जाईल व भरलेले पैसे मिळणार नाहीत. एका रुमवर जास्तीत जास्त तिघांना राहता येईल. पाण्याचे ग्लास एका रूमवर दोनच मिळतील इ. इ. पण गंमत काय पाहा. या सगळ्या अटी होत्या. तारीख दोन ऑक्टोबर. गांधीजयंती म्हणजे दारूबंदीचा दिवस. तरीहि आजूबाजूच्या एकदोन खोल्यातून मद्यपींचा आरडओरडा ऐकू येत होता. गांधीजींनी त्यांना क्षमा केली असेलच. आंघोळी आटोपून उदरभरणास सज्ज झालो. हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये फक्त शाकाहारी. नार्या व जाड्या मासे खायला सोकावलेले. म्हणून बाहेर गेलो. एका कळकट हॉटेलाबाहेर मसाल्याचा छान वास येत होता म्हणून तेथेच जेवलो. जेवण सुरेखच होते. गावठी अंडी होती म्हणून मी डाळभात भाजीबरोबर आम्लेट देखील खाल्ले. ते पण छान होते. कालचे उट्टे भरुन निघाले.
३ ऑक्टोबर २०००.
नेहमीप्रमाणे पावणेसहा सहाला चौघे फिरायला बाहेर पडलो. बीचवरच गेलो. एवढा सुरेख लांबलचक बीच. पण आपल्या भारतीय लोकांना त्याचे सोयरसुतक नाही. सार्वजनिक ठिकाणीं जास्तीत जास्त घाण न केल्यास दंड असावा आणि सार्वजनिक ठिकाणी घाण कचरा टाकल्यास वा थुंकल्यास पारितोषिके असावीत व प्रातर्विधी करणारांस सर्वांत मोठे पारितोषिक असावे अशी परिस्थिती होती. म्हणून न्याहारी करण्यासाठी परत फिरलो. नार्याला बोलावून घेतले. कर्नाटकात सेट डोसा म्हणून एक पदार्थ मिळतो. हल्ली सगळे लोक भरपूर पर्यटन करतात. त्यामुळे बहुतेकांना ठाऊक असेल. तरी पण न खाल्लेल्या लोकांसाठी सांगतो. घावनापेक्षा जाड व उत्तप्पापेक्षां किंवा आंबोळीपेक्षा पातळ असे तीन डोसे चटणी व सांबार. हा सेट डोसा फक्त कर्नाटकातच मिळतो. इडल्या, मेदूवडे, सर्वच पदार्थ चविष्ट होते. सांबार मात्र तूरडाळीचे नसून छोट्या चवळीचे आणि धणेयुक्त मसाल्याचे थोड्या वेगळ्या पण छान चवीचे होते. उपमादेखील छान होता. पाचजण असल्यामूळे प्रत्येकजण वेगळा पदार्थ मागवून चव पाहून आपला पुढील पदार्थ ठरवीत असे. फिल्टर कॉफ़ी दक्षिणेत अपेक्षेपेक्षा चांगली मिळते. न्याहारी करुन परतलो. सूर्यदर्शन झाले. स्वच्छ निळे आकाश, कोवळी सोनेरी उन्हे पसरलेली. अतिशय आल्हाह्दायक व उत्साहवर्धक वातावरण होते. आणि अहो आश्चर्यम! आमच्या वसतिस्थानासमोरच ती दुरुन दिसणारी प्रचंड मूर्ति तर होतीच. शिवाय गीतोपदेशाच्या रथाचा सिमेंटकॉंक्रीटमधील देखावा आणि आणखी कांहीं सुंदर देखावे होते.खालील प्रकाशचित्रे पाहा.
नेहमीप्रमाणे पावणेसहा सहाला चौघे फिरायला बाहेर पडलो. बीचवरच गेलो. एवढा सुरेख लांबलचक बीच. पण आपल्या भारतीय लोकांना त्याचे सोयरसुतक नाही. सार्वजनिक ठिकाणीं जास्तीत जास्त घाण न केल्यास दंड असावा आणि सार्वजनिक ठिकाणी घाण कचरा टाकल्यास वा थुंकल्यास पारितोषिके असावीत व प्रातर्विधी करणारांस सर्वांत मोठे पारितोषिक असावे अशी परिस्थिती होती. म्हणून न्याहारी करण्यासाठी परत फिरलो. नार्याला बोलावून घेतले. कर्नाटकात सेट डोसा म्हणून एक पदार्थ मिळतो. हल्ली सगळे लोक भरपूर पर्यटन करतात. त्यामुळे बहुतेकांना ठाऊक असेल. तरी पण न खाल्लेल्या लोकांसाठी सांगतो. घावनापेक्षा जाड व उत्तप्पापेक्षां किंवा आंबोळीपेक्षा पातळ असे तीन डोसे चटणी व सांबार. हा सेट डोसा फक्त कर्नाटकातच मिळतो. इडल्या, मेदूवडे, सर्वच पदार्थ चविष्ट होते. सांबार मात्र तूरडाळीचे नसून छोट्या चवळीचे आणि धणेयुक्त मसाल्याचे थोड्या वेगळ्या पण छान चवीचे होते. उपमादेखील छान होता. पाचजण असल्यामूळे प्रत्येकजण वेगळा पदार्थ मागवून चव पाहून आपला पुढील पदार्थ ठरवीत असे. फिल्टर कॉफ़ी दक्षिणेत अपेक्षेपेक्षा चांगली मिळते. न्याहारी करुन परतलो. सूर्यदर्शन झाले. स्वच्छ निळे आकाश, कोवळी सोनेरी उन्हे पसरलेली. अतिशय आल्हाह्दायक व उत्साहवर्धक वातावरण होते. आणि अहो आश्चर्यम! आमच्या वसतिस्थानासमोरच ती दुरुन दिसणारी प्रचंड मूर्ति तर होतीच. शिवाय गीतोपदेशाच्या रथाचा सिमेंटकॉंक्रीटमधील देखावा आणि आणखी कांहीं सुंदर देखावे होते.खालील प्रकाशचित्रे पाहा.
या परिसरात बरीच मंदिरे आहेत. काळ्या दगडातील प्राचीन आणि अंधारी. आंत येणारा जो कांही थोडाफार वा तुटपुंजा प्रकाश असेल तो काळ्या दगडामुळे जरादेखील परावर्तित होत नाही. मी ’काळ्या’ दगडाला नावे टेवली म्हणून सगळ्यांनी खंत व्यक्त केली. स्वत:च्या वर्णाचे थोडे तरी कौतुक असावे की राव. एवढे सुरेख स्थापत्य निर्माण करणे खायचे काम नाही. येथेच असे नाही पण सगळीकडील पुरातन बांधकामांत प्रकाशयोजनेचा पूर्ण अभाव आढळतो. गुहांतील बांधकामात आपण समजू शकतो की प्रकाश आंत आणण्यास फारसा वाव नसतो. पण बांधलेल्या मंदिरांचे काय? नैसर्गिक प्रकाश आत आलेला गाभारा मी अजून पाहिला नाही. या अंधारावर वास्तुशास्त्रज्ञच प्रकाश टाकूं शकतील. कदाचित टाकलेला देखील असेल आणि माझा तो विषय नसल्यामुळे हे माझे अज्ञान अद्याप दूर झाले नसेल. असो. मला तरी हे कोडे अद्याप उलगडलेले नाही.पन्नास पैशापेक्षां कमी किंमतीची नाणीं मुंबई-पुण्यांत पाहायला देखील नाहींत. भिकारी देखील घेत नाहीत. नार्या जातीने वैश्यवाणी असल्यामुळे त्याला आम्हीं शेटजी म्हणतो. अशी कांही नाणीं त्याने आणली होती. बहुतेक पन्नास पाऊणशे रुपये असावेत. त्यामुळे त्याच्या औदार्याला उधाण आले होते. त्याच्या संधिसाधू औदार्यावरुन त्याची भरपूर टिंगल केली. नंतर देखील फिरक्या घेण्यास अजून एक विषय मिळाला. धार्मिक असा तो आमच्यात एकटाच असल्यामुळे तो अल्पमतात होत. फारच मजा आली. इतर सर्व ठिकाणी नेहमी आम्हीच अल्पमतात असतो. फोटोबिटो कढून निघण्यास साडेदहा अकरा वाजले. येथून मडिकेरी फारसे दूर नाही. आमच्या नकाशात मंगलोरच्या पुढे बंगलोर रस्त्यावर बंटवालच्या पुढे लगेच उजवीकडे मडिकेरीचा फाटा दिसत होता. परंतु बंटवाल रस्त्यापासून थोडे दूर दिसत होते. मंगलोरचे रस्ते स्वच्छ व चांगले वाटले. बंगलोरची दिशा दाखवणारे बाण बहुतेक मोठ्या नाक्यावर होते. जेथे नव्हते तेथे विचारीत पुढे गेलो. अखेर मडिकेरीचा फाटा सापडला. हळू हळू झाडोरा वाढू लागला. पावसाळ्याची अखेर असल्यामुळे रस्ता मात्र खराब होता. वेग पंचवीसवर आला. हवेत गारवा यायला लागला. समोर डोंगर दिसू लागले. चढ वाढू लागला. वळणे येऊ लागली. रबराची झाडे मी यापूर्वी पाहिली नव्हती. ती दिसू लागली. आमच्या चित्तवृत्तींचा बहर वाढू लागला. चढावामुळे .. पायातील नव्हे .. सरासरी वेग आणखी कमी झाला. आजूबाजूला जमिनीच्या कुंपणांकित आयतांमध्ये विविध नावांच्या पाट्या दिसू लागल्या. चहाचे मळे कोणाला पाहायचेत . . देवा किलींडरने विचारले. लवकरच पाहायला तयार व्हा म्हणून मास्तरांनी घोषणा केली. आमच्या उत्साहाला आणखी धुमारे फ़ुटले. एक घाट संपून दुसरा येऊ लागला. रस्ता वाईटच. एक डोंगर संपून दुसरा दिसू लागे. आता सर्वजण मैलाचे दगड वाचू लागलो. चार कन्नड दगडानंतर पाचवा एक इंग्रजी दगड असे प्रमाण होते. वाईट व घाटाचा वळणावळणांचा रस्ता म्हणून दोघेहि चक्रधर फार थकले होते. दीडदोन वाजले असावेत. मी मनगटी घड्याळ वापरीत नाही याबद्दल क्षमस्व. याची शिक्षा म्हणून नार्याने माझ्यावर भरपूर दुगाण्या झाडल्या. त्याच्या देखील हाताला घड्याळ नव्हते याची मी त्याला जाणीव करून दिली. परंतु त्याचे नुकतेच पडून फ़ुटले म्हणून त्याला ते माफ असा त्याचा दावा होता. मी तर कधीच बांधत नाही. पण तुझा वेंधळेपणा कसा काय क्षम्य? या प्रश्नावर तो फार उखडला. त्यामुळे इतर तिघे माझ्याशी सहमत झाले. म्हणून त्याला खूप चिडवले. मज्जा आली.
पूर्वप्रसिद्धी:(Published earlier): http://www.misalpav.com/node/837
No comments:
Post a Comment