Tuesday 17 November 2009

वाट फुटेल तिथें - १०

१२-१०-२०००

बैकमपाडीला मुंबईसारखीच हवा. पण प्रदूषण नसल्यामुळे पहाटे किंचित गारवा. आंघोळी आटपून साडेसहाच्या सुमारास खाली उतरलो आणि आश्चर्याचा गोड धक्का. त्याच मालकाचे तळमजल्यावरचे कार्यालयाच्या बाजूचें उपाहारगृह पूर्ण भरात चालू होते. मुंबईतले एखादे उडप्याचे हॉटेल असते तस्से. उपमा, शिरा, इडली, मेदू वडा, सांबार वगैरे सर्व पदार्थ उपलब्ध. ताजे आणि गरमागरम. अशा अन्नाचा अवमान करणे म्हणजे महापापच. सेवाहि त्वरित. न मागतां टेबलवर पाण्याचे पेले हजर होतात. भरलेले पेले त्वरित रिकाम्या पेल्यांची जागा घेतात. अगदी मुंबईप्रमाणे. हॉटेलचे राहाण्याचे बिलहि त्वरित उपलब्ध. नार्‍या बिल चुकवेपर्यंत तिघांचे खाणे आटोपले. नार्‍याचे खाणे आटपेपर्यंत गाडी पेट्रोल भरून, हवा तपासून तय्यार. सव्वासातच्या सुमाराला निघालो.

कर्नाटकात आल्यामुळे आता घरांची गर्दी विरली होती. राममा १७ च्या दुतर्फा मस्त झाडी. बैंदूर, भटकळ, होनावर इ. गावांच्या मधून महामार्ग जातो. पाण्याच्या बाटल्या इ. गरजेच्या वस्तू रस्त्यालगतच मिळतात. वस्ती कमी झाडे जास्त त्यामुळे बरे वाटते. होनावरच्या आसपास एके ठिकाणीं नदी समुद्राला मिळते. समुद्रावरून मस्त वारा वाहात असलेला. काही अंतरावर वार्‍यामुळे दिमाखात झावळ्या डोलवणारे माड गर्दीने उभे. त्या माडांच्या गर्दीतून नदीचें प्रशस्त पात्र डौलदार वळणावळणानें रुबाबात वाट काढून आलेले. थोडे मुंबईच्या दिशेने पुढे गेले की दोन्ही बाजूंना लडिवाळ लाटा खेळवणारे निळेभोर पाणी आणि मधून काळाभोर डांबरी रस्ता. वर आल्हाददायक तश्शाच निळ्याभोर सॅटीनचें चकचकीत आकाश. चकचकीत सोनेरी ऊबदार ऊन. एरवी गाडी थांबवायला कुरकुरणारा देवा चक्क गाडी थांबवून तो निसर्ग डोळ्यांत साठवायला खाली उतरला देखील. बाजूला एका टपरीवर शहाळी, चहा, शीत पेये, पाण्याच्या बाटल्या इ. होते. पंधरा मिनिटे थांबूनदेखील कुणाचाच पाय निघत नव्हता. रूपगर्विता धरतीचे विभ्रम मनात साठवतच निघालो.

मुर्डेश्वरला शंकरमूर्ती दिसलीच. पण डावी कडे न वळतां सरळ मुंबईच्या दिशेने मार्गक्रमणा चालू ठेवली. कारवार दिसल्यावर पुन्हा एकदा हर हायनेस प्रिन्सेस ऑफ नन्दनगद्दा वगैरे झालें. गोव्यात पोहोचलो तरी मडगाव, पणजी, इ. ठिकाणीं न थांबता सरळ म्हापसा गाठलें. वाईन शौकिनांनीं वाईनची खरेदी केली. वाईनच्या वाहातुकीला परवाना लागत नाहीं. जीटीडीसी मध्यें उतरलों. उदास पिवळा रंग, तोहि ठिकठिकाणी उडालेला वा पोपडे आलेला. पण भरपूर खोल्या उपलब्ध. त्यातल्या त्यात कमी वाईट, बाजूबाजूच्या खोल्या घेतल्या. उत्फुल्ल मनस्थितीमुळें त्या कळकट खोल्या पण राजमहालासारख्या वाटल्या. संध्याकाळी गप्पा मारताना यापुढे अश्शाच सफरी नेमाने करायच्या. महिन्यातून किमान एक सहल करायची. आणि वर्षातून एकदा किमान एक पूर्वी कधीहि न पाहिलेल्या नवीन ठिकाणी. वर्षाला, किमान वर्षाआड दीर्घ दौरा. ठरले. आम्ही नुसते ठरवले की ते करतो. कोणालाहि आणाभाका घ्याव्या लागत नाहीत. त्यामुळे नंतर खरेच अशा एक वर्षाआड सफरी झाल्या. आता प्रवासाचा शीणहि अजिबात जाणवत नव्हता. उत्फुल्ल मनस्थितीत काय जेवलो ते आठवत नाही. गुढगे टेकण्याचा समारंभ झाला. सोनेरी क्षण आठवीत गप्पा मारतांना कधी अकरा वाजले कळले पण नाही.

१३-१०-२०००
म्हापशाहून सक्काळी सातला निघालो. वाटेत कुठेतरी खाऊं असे ठरवले. थोड्या वेळाने जाड्याला भूक लागली. त्यामुळें इतर चौघे चेकाळले. एकमेकांकडे न पाहतांहि एकमेकांच्या मनांतले विचार चौघांना समजले. रडवा जाड्याला. होऊं देत भुकेनें कासावीस. बघता बघता हातखंब्यापर्यंत पोहोचलो. एकेठिकाणी मराठी पदार्थ मिळतील अशी पाटी होती. थांबलो. आता जाड्याच्या जिवात जीव आला. हॉटेलातला पोर्‍या बाहेर आला. पोहे संपले, शिरा संपला, फक्त इडली आणि मेदूवडा शिल्लक. ताजा आहे पण गरम नाही. सांबार नाही, चटणी नाही. आमच्या आशेची पार चटणी. जाड्या निराश. इतर चौघांना उकळ्या फुटत होत्या. अरे चल जरा पुढे गेले की सामिष अन्न मिळेल. मग कुठेतरी काहीतरी थंड पदार्थ पोटात ढकलले. आणि निघालो. संध्याकाळी पुण्याला गजालीत उट्टे फेडूं असें आश्वासन जाड्याला दिले.

संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोहोचलो. गेल्या गेल्या सौ. मास्तरीणबाईंनी पुढ्यात वजनकाटा ठेवून मास्तरांचे व आपल्या बंधूंचे वजन केले. त्या दोघांचे व जाड्याचे वजन जेमतेम किलोभराने वाढले होते. सगळ्यांची अगत्यानें चौकशी केली. प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहात चालला होता. एका प्रश्नाला एका वेळी दोघेतिघे उत्तरे देत होते. मास्तरांच्या घरी आंघोळ उरकली. अर्थात धार्मिक परवानगी घेऊन. आणि खरेच गजाली मध्ये गेलो. तिथे चिन्याचा मावसभाऊहि भेटायला येणार होता. त्याचीच शिफारस होती गजालीची. आणि खरेच अतिशय ताजे मासे होते. बांगडे, सुरमई, रावस, अतिशय उत्कृष्ट होते. शिवाय त्याने येतांना जमैकन रम आणली होती. एवढ्या सुंदर सहलीची तितकीच चविष्ट सांगता झाली. दुसरे दिवशीं देवाच्या गाडीत बसून दुपारपर्यंत घरी.

अथातो प्रथम दक्षिणयात्रा संपन्न.

No comments: