Sunday, 29 June 2008

वाट फुटेल तिथे - ३

मडिकेरी : दोन सेनापतींचे सुंदर गांव

३ ऑक्टोबर २०००.
सुरेख हवेमुळे पोटातील कावळे जागे झाले. त्यामुळे जेवण पूर्ण स्किप न करता पोटात हलके पदार्थ स्किप करुन सोडावेत असे ठरवले. वाटेत एक छोटेसे गांव लागले. खाण्याची टपरी कुठे दिसते काय हे पाहू लागलो. चौकशी करु लागलो. हिंदी इंग्रजी कुणाला कळेना. जेवण्याची खूण करुन इडली डोसा हे शब्द उच्चारु लागलो. एक चौकात पार्किंगला चांगली जागा दिसली. जवळील दुकानदाराला गाडीवर लक्ष ठेवायला विनंति केली. अर्थात खुणेने. उतरुन आरोग्य भवनाचा शोध घेतला. अखेर एक किशोरवयीन मुलाने एका छोट्याशा गल्लीत नेले. एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीत एक छोटेसे शंकर विलास छाप हॉटेल दाखवले. बसलो. साठीच्या आसपास दिसणारी एक महिला आतून बाहेर आली. तिनें कन्नडमध्ये काहीतरी विचारले. माझ्या डोक्यात कांहीच शिरले नाही. मीं हिंदीत बोललो. तिथे अंधारच. मी कोकणीतून विचारले 'खावच्याक कित मॅळतले' म्हणून. (गोव्यातील कोकणीत खावपाक म्हणतात) पुन्हा अंधारच. माझ्या कोकणी भाषेच्या अज्ञानाची व कोकणी बोलण्याच्या क्षमतेच्या यथेच्छ चिंध्या. हा (मी) गाढव आहे की नाही? जाड्याने विचारले. तिला बोध झाला नाही परंतु तिची करमणूक झाली. जाड्या म्हणतो ते बरोबर की नाही असे त्या देवाने तिला विचारले. अर्थातच अर्थ न कळता त्या धोरणी महिलेने ताबडतोब मान हलवून होय म्हटले. भरपूर हशा पिकला. पण असे घडले हे माझ्यासारखा सूज्ञ अजूनहि कबूल करीत नाही. मग इडली डोसा शब्द उच्चारले. तिने होय म्हटले. युरेका युरेका. जवळ जवळ अर्धा तास वाट पहावी लागली. चांगला ब्रेक मिळाल्यामुळे कृष्णराज व शल्यराज खूष होते. आतून मसाल्याचे वास येऊ लागले. आत कावळ्यांना नाकाची कुमक मिळाली. रगड्यावर चटणी वाटल्याचा आवाज आला. शेवटी चुर्रचुर्र आवाज येऊ लागला व क्लायमॅक्स़ जवळ आल्याची जाणीव झाली. अखेर ते सेट डोसा नावाचे गरमागरम पूर्णब्रह्म समोर आले. असा सुरेख सेट डोसा आजतागायत आम्ही खाल्ला नाही. चटणी सांबार हवे तेवढे. ती चव ते जंगलातील गावातले सुरेख हवेतील भारलेले वातावरण (माहोल) आमच्या सर्वांच्या मनांवर कायमचे कोरले आहे. उर्दू वाचन त्याहून सुरेख. सव्वाएक तासाने तृप्त होऊन त्या अन्नपूर्णेला दुवा देऊन निघालो.

सुब्रमण्यम चा फाटा गेला. चहाचे मळे दिसायला लागले. तोपर्यंत ते मी फ़क्त भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील चित्रांत व फ़ोटोतच आणि अर्थातच हिंदी सिनेमात पाहिले होते. माझी उडी माथेरान, महाबळेश्वर, मालवण, गोवा, अहमदाबाद, कारवार, शिरसी व अजिंठा याच्यापुढे गेली नव्हती. पाचच्या सुमारास डोंगराच्या कुशीतील स्वप्नातील दृश्यासारखे मनोरम दिसणारे गाव दिसू लागले व सर्वजण हरखून गेलो. आधीच हिल स्टेशन. त्यातून डिस्ट्रिक्ट फ्लेस. त्यामुळे उर्दू वाचन फ़ार होते. डबल ऑक्युपन्सीला १२०० पासून २५०० पर्यंत . त्या मानाने सुविधा नाहीत. आम्ही कोठून आलो याची चौकशी आधी करीत. आम्ही मुंबईचे पाहून चढे दर सांगत. गाडीचा नंबर काही लपत नाही. एकदोन ठीक होती पण पार्किंग चांगले नव्हते. कर्नाटक टुरिझम अर्थात के टी डी सी मध्ये गेलो. छापील दर. रुम्स यथातथाच होत्या. पण पार्किंगची जागा प्रशस्त आणि सुरेख. मागील बाजूने दरीला लागून असलेले अत्यंत रमणीय ठिकाण. भरपूर रिकाम्या रूम्स. साहाजिकच निवडीला जास्त पर्याय उपलब्ध. एक आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला. के टी डी सी चे मॅनेजरसाहेब छान मराठी बोलत होते. कालपर्यंत पाऊस अक्षरशः वेड्यासाखा कोसळत होता. सतत चार महिने मुसळधार पावसाने वेड लागायची पाळी आली होती. तुमच्यासारखी खुल्या दिलाने बोलणारी माणसे पाहून फ़ार आनंद झाला असे म्हणाले. त्यांनी दोन दिवस खरेच खाजगी कंपन्यांनी लाजावे आशी उत्तम सौजन्यपूर्ण सेवा पुरवली. अर्थातच याचे थोडेसे श्रेय जाड्याकडे व माझ्याकडे जाते. जाड्या हा एक चांगला मार्केटिंग मॅनेजर व मी चांगला पी आर ओ (जरी प्रशासकीय खात्याचा असलो तरी) आहे. साहजिकच आमच्या जिभेवर मधाची कोठारे आहेत. कृपया मधमाशांना आमचा पत्ता देऊ नका. पंचाईत होईल. आमच्या तीन वर्षानंतरच्या पुढील दोन सहलीत याचा चांगला अनुभव आला. जेवण आमच्याच कॅंटीनमध्ये करा. येथील जेवण उत्तम असते. असे जेवण येथे दुसरीकडे मिळणार नाही. येथील स्थानिक लोक बाहेर जेवायला म्हणून निघाले की येथेच येतात. मॅसा नी सांगितले. आम्ही त्यांच्या कर्तव्यतत्परतेची ताबडतोब वाखाणणी केली व तसेच करण्याचे ठरवले. मराठी बोलणार्‍या व्यक्तीने त्यातून सरकारी - एवढे सौजन्य व अगत्य दाखवावे हे आश्चर्यच.

या रम्य ठिकाणी दोन रात्र राहायचे असे अगोदरच ठरले होते. मास्तर व देवा यांचे हे प्लानिंग अफ़लातून असते. डोळे झाकून मम म्हणावे. ऐसपैस प्रशस्त खोल्या. मागील दरीच्या बाजूस बाल्कन्या. सुरेख. रुम्स आतून एम टी डी सी च्या रुम्सप्रमाणे कळकट. त्यामुळे शोभा अजून कमी होण्याचा प्रश्न नव्हता. ताबडतोब दोर्‍या लावल्या व कपडे धुण्याचे जाहीर केले. दोघेजण कपडे धुवून आंघोळी आटपेपर्यंत तिघांनी मस्त झोप काढली. कपडे धुवून आंघोळी करुन ताजेतवाने होऊन पायी फ़िरायला बाहेर पडलो. मॅसा नी येथील जेवण सर्वोत्कृष्ट आहे म्हणून सांगितले होते. त्यामुळे जेवण्यास येथेच यायचे होते. मडिकेरी ही कुर्ग जिल्ह्याची राजधानी आहे. या जिल्ह्याने भारताला दोन सेनापती दिलेले आहेत. ज. करिअप्पा आणि ज. बेवूर देवाने जाहीर केले.

मॅसा च्या ओळखीने दुसर्‍या दिवशी आजूबाजूची चांगली ठिकाणे पाहण्यासाठी खाजगी गाडी ठरवली. आमच्या चक्रधारींना तेवढाच एक दिवसाचा ब्रेक. मॅसा नी केटीडीसी चे माहितीपत्रक दिले होतेच. कोणकोणती ठिकाणे पाहावीत हे नंतर ठरवू. पदयात्रेला निघालो.

आपले विश्रामधाम (इंद्रजाल कॉमिक्समधील उर्फ़ वेताळाच्या कॉमिक्समधील वाम्बा विश्रामधाम आठवले का?) मडिकेरी शहराच्या सर्वांत उंचावरच्या ठिकाणी आहे. आवारातून बाहेर पडतांनाच चांगलाच उतार आहे. बाजूलाच उजवीकडे फ़र्लांगभर अंतरावर किंग्स पॉईंट की सुलतान पॉईंट की जनरल पॉईंट आहे. आता बरोबर आठवत नाही. पण तो राजा, जनरल की सुलतान येथे येऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत असे. त्यामुळे हे नाव पडले. काहीहि असो. अशा रम्य ठिकाणी येऊन बसणार हा मनुष्य नक्कीच रसिक होता म्हणायचा. इथून लगेच रस्ता डावीकडे वळतो. जरासे पुढे उतारावरील कोपर्‍यावर एक सिनेमा थिएटर आहे. रस्त्याने चालतांना आजुबाजूंनी सजून फ़िरायला जाणार्‍या कुटुंबांचे आनंदी व उत्साही घोळके दिसत होते. कांही लोक खरेच केटीडीसीच्याच कॆंटीनच्या दिशेने सहकुटुंब (बहुधा जेवायला) जात होते. किंग्स पार्कनंतर केटीडीसीखेरीज दुसरे काही नाही. डेड एंड. त्यामुळे ते तेथेच जात होते. असो. सिनेमाथिएटरच्या दरवाजांत थोडी गर्दी दिसली. साउंड सिस्टीमवरील मंद कर्नाटक शास्त्रीय संगीताने वातावरण धुंद केले होते. आत शास्त्रीय संगीताच्या मैफ़िलीचे वातावरण दिसत होते. अशी पर्वणी पाहून मी मोहरून गेलो. वर जाऊन चौकशी केली. स्वागतासाठी कही सद्गृहस्थ दरवाजाबाहेरच उभे होते. यांनी अगत्याने माहिती दिली. तो एका शास्त्रीय नृत्यसंस्थेचा सोहळा होता. दरवर्षी येथे शास्त्रीय नृत्याच्या स्पर्धा नवरात्राच्या पहिल्या दिवशी सुरु होतात व दसर्‍याच्या दिवशी निकाल व ब़क्षीस समारंभ होतो. प्रवेश विनामूल्य असतो. त्यांनी आग्रहाचे निमंत्र्ण दिले. आता अशी गोष्ट सांगतो की दाक्षिणात्यांच्या कलाप्रेमाला त्रिवार प्रणाम कराल. माझी हॅट ऑफ़. थिएटरमालक स्पर्धेसाठी थिएटर विनामूल्य देतात. मी रस्त्यावर परत आलो. सगळे दूर पुढे गेले होते. मी अति उत्साहात न सांगता गायब झाल्यामुळे मला शोधत होते. त्यांना सांगितले. सर्वांनी याचे कौतुक केले. परंतु अर्धापाऊण तास फ़िरून मग येण्याचे ठरले. नाक्यानाक्यावर थिएटर्स होती व सगळीकडे तसाच नृत्यस्पर्धेचा सोहळा होता. नाक्यानाक्यावर थिएटर्स होती व सगळीकडे तसाच नृत्यस्पर्धेचा सोहळा होता. प्रवेश विनामूल्य. तेव्हापासून माझी हॅट कायम ऑफ़ आहे. मुंबईत भर उन्हाळ्यात सुद्धा वातानुकूलन यंत्राचे विजेचे बिल कमी यावे म्हणून पैशाला हपापलेले थिएटरमालक सिनेमा चालू असतांना वातनुकूलन यंत्र मधेच बंद करतात. रसिक उकडून मेले काय किंवा बाहेर गेले काय! तिकिटाचे पैसे मिळाल्यावर त्यांना सोयरसुतक नसते. मी किमान पाचसहा वेळा वेगवेगळ्या थिएटरमधून सिनेमा सोडून गेलो आहे. अपवाद द़क्षिण (पुन्हा दक्षिणच बरे का) मुंबईतील इंग्रजी चित्रपट दाखविणार्‍या थिएटर्सचा. गेल्या वीसएक वर्षानंतर मी थिएटरमध्ये सिनेमा पाहिला तो होम अलोन. एक्सेलसिअरमध्ये. मुलाला दाखविण्यासाठी. सुदैवाने तेव्हा मात्र तसे काही झाले नाही. ते द़क्षिण मुम्बईत आहे. असो. हवा अप्रतिम होती सुमारे १५ ते १८ अंश सें. सापेक्ष आर्द्रता २५ तो ३५ च्या दरम्यान. ही सगळी अनुमाने. उपकरण आपली त्वचा. पण हवा उत्तम म्हणजे कशी हे कळावे म्हणून सांगितले. सगळीकडे घरोघरी, दुकानोदुकानी फ़ुलांची व दिव्यांची तोरणे लावलेली. दाक्षिणात्य शास्त्रीय संगीताचे मंजुळ ध्वनि, नवे पोषाख परिधान करुन येणारे जाणारे लोक, हलकेच उतरणारे धुके, भूलोकीचा स्वर्गच हा. स्वप्न याहून काय वेगळे असते?.

थोडे फ़िरल्यावर भुकेची जाणीव झाली व मागे फ़िरलो. मासे नसल्यामुळे शाकाहारीच जेवण करण्याचे ठरले. थंडी वाढून तापमान बहुधा पंधराखाली घसरले असावे. चविष्ट जेवण, प्रसन्न मनस्थिति व छान हवा त्यामुळे दुप्पट जेवलो. येथील डायनिंग हॉल प्रचंड आहे. त्यामुळे गर्दी जाणवली नाही. विश्रामधाम तसे रिकामेच होते. बाहेरील स्थानिक लोकच जास्त होते. मॅसा खरेच बोलले होते. शेटजींनी ऋचिपालट म्हणून एक डिश चिकनची मागवली. ती फारच चविष्ट असल्याचा अभिप्राय जाड्याने दिला. मास्तरांनी परीक्षण करुन हा अहवाल सत्य असल्याची साक्ष दिली. मी व देवा तसे शाकाहारप्रेमी. आम्ही आमच्या पदार्थाना चांगला न्याय दिला. कितीहि चांगले जेवण असो. नार्‍या नाक मुरडतोच. तो देखील (जेवणात नसलेले) मूग गिळून होता. हेच मोठे प्रशस्तिपत्र होय. उर्दूवाचन माफ़क व योग्य होते. पैसा वसूल. मॅसांचे आपुलकीच्या सल्ल्याबद्दल आभार मानले. कडक थंडी व धुक्याचा आस्वाद घेण्यासाठी पुन्हा फ़िरायला बाहेर पडलो. मास्तर व देवा यांच्या श्रमांना आलेले फ़ळ फ़ारच रसाळ होते. आज सात वर्षानंतर सुद्धा या आठवणीनी मला हे टंकतांना पुनरानुभव येत आहे व रोमांच उभे राहताहेत. पीसीओवरुन घरी फ़ोन केले. तेव्हा मोबाईल कॉलचे दर फ़ार होते. बहुधा रात्री ४ रू. व पीक अवर्समध्ये १६ रू. मिनिट. रेंज पण ठराविक ठिकाणींच मिळत असे. फ़ोनवर बायकोशी बोलतांना विवाहितांनी (जाड्याच्या म्हणण्याप्रमाणे) नेहमीच्या सवयीमुळे गुढगे टेकल्यामुळे या सोहळ्याचे जाड्याने गुढगे टेकणे असे नामकरण केले. हा वाक्प्रचार आम्ही अद्याप वापरतो. अकराच्या सुमाराला एका स्वप्नातून दुस-या स्वप्नात जाण्यासाठी सज्ज झालो.

४ ऑक्टोबर २०००.
नेहमीप्रमाणे पाचला उठलो. मस्त थंडी होती. बहुधा दहाबारा अंशांच्या आसपास असावी. व्यायाम वगैरे आटोपून सहासव्वासहाला बाहेर पडलो. शेटजी नुकतेच उठत होते. दाढी केल्यावर फ़ारच ताजेतवाने वाटले. शेटजीचे आटपेपर्यंत रस्त्यावरून एक पायी छोटीसी रपेट करून आलो. आंघोळ संध्याकाळी करायचे ठरले. ठरल्याप्रमाणे आम्ही पावणेसातला तयार झालो. पाचच मिनिटात आमची गाडी आली. ऍम्बॅसॅडर होती. शेटजी व मी दोघे बारीक लोक पुढे बसलो. मास्तर, जाड्या व देवा मागे. मास्तरांना व देवाला क्वचितच मागे बसायला मिळते. बरोबर सातला ठरल्याप्रमाणे निघालो. दोनतीन ठिकाणे पाहून झर्‍यावर गेलो. वेलचीची, कॉफ़ीची, कोकोची मिरीची आणि जायफ़ळाची झाडे पाहिली. छोटासा धबधबा होता. त्याचे पाणी प्यालो. त्यासमोरच एक छोटासा पूल होता. फ़ोटो काढायला फ़ार सोयीचा होता. फ़ोटो काढले. या ठिकाणची एक गंमत नार्‍याने जाड्याच्या घेतलेल्या फ़िरकीमुळे आमच्या वर्तुळात फ़ारच गाजले. अजूनहि गाजते आहो. इथे एक शीतपेयांची टपरी आहे. एक महिलेने चालविलेली. एक मध्यमवयीन महिला व तिची तरूण मुलगी. आम्ही जिथे झर्‍याचें पाणी प्यालो तिथे जाड्या देखील पाणी प्याला. पण त्याने या टपरीवर बिसलेरीची बाटली घेतली. खरे म्हणजे ती नंतर गाडीत पिण्यासाठी घेतली. पण नार्‍याने आरोप केला की ती टपरीवरच्या तरुणीकडे पाहूनच घेतली. या बाटलीचे चौदा रुपये अजून नार्‍याने जाड्याला दिलेले नाहीत. कारण काय? तर म्हणे मोटिव्ह इज नॉट फेअर. अजूनहि आम्ही जाड्याला या विषयावरून छळतो. निसर्गधाम या अभयारण्याकडे निघालो.

नदीच्या प्रवाहातील एक प्रचंड बेटावर हे आहे. गाडी प्रवेशाजवळ सोडावी लागते. झुलत्या पुलावरुन प्रवेश करावा लागतो. साधारणपणे साडेनऊ दहा वाजले असावेत. गाडीचा नंबर कंडक्टर कम मुनीमजी ऊर्फ़ शेटजीनी लिहून घेतला होताच. आमच्या ड्रायव्हरच्या ओळखीचा गाईड घेतला. तिथे नवरात्राचा स्थानिक उत्सव चालू असल्यामुळे व सीझन अद्याप सुरु न झाल्यामुळे यात्रेकरु जवळ जवळ नव्हते. समुद्रसपाटीपासून फ़ारसे उंच नसल्यामुळे किंचित उकडत होते. गर्द वनराईमुळे तसे आल्हाददायकच वाटत होते व वाढत्या उन्हाचा कडाका जाणवला नाही. आंबा, चिंच, साग, इ. माहितीचे तसेच मीं पूर्वीं न पहिलेले प्रचंड व विविध वृक्ष, मध्येच बांबूची बने, विविध वेली व झुडुपे,विविध प़क्षी होते. प़क्षी जरी सहज दिसत नसले तरी त्यांचे कूजन सतत चालू होते. काळ्या तोंडाची बलदंड माकडे, एखादे मुंगूस, मुंग्यादि कीटक आणि आम्ही वगळता प्राणी फ़ारसे दिसले नाहींत. मध्येंच नदीचे उपप्रवाह होते. ते ओलांडण्यासाठी साकवांची योजना केली होती. विविध रंगांची पोहोणारी व उडणारी बदके व चारपाच प्रकारचे बगळे पाहिले. मल्हाराचा अंमल अद्याप न संपल्यामुळे नदीचे पाणी लाल होते. म्हणून मासे व जलसृष्टी साकवावरून दिसू शकली नाही. ठिकठिकाणी झाडांवर वेगवेगळ्या प्रकारची मचाणे बांधली होती. त्यावर चढून फ़ोटो काढण्याचे पवित्र कार्य उत्स्फ़ूर्तपणे पार पाडलेच. मचाणांवर चढणे तसे सोपे नाही. तंदुरुस्त असल्यावर मात्र कांही वाटत नाहीं. परंतु जास्त उंचावरील मचाणावरुन दिसणारे दृश्य मात्र विहंगम (पॅनोरमिक) दिसते. किती सुंदर याची कल्पना खालून येणार नाही. काही मचाणाचे दोरखंडाच्या शिड्या फ़ारच जुन्या व कोरम झाल्या होत्या. त्यावर फ़क्त मी, शेटजी व देवाच जाऊ शकलो. कमी वजनाचे किती हे फ़ायदे! हो ठिकाण सुंदर व रम्य होते. साडेबाराच्या सुमाराला जड पावलांनी तेथून निघालो. गाईडमुळे बाहेर पडण्याचे ठिकाण शोधायला लागले नाही. ते बहुधा प्रवेशापासून एकदीड फ़र्लांगावर असावे - त्याच रस्त्याला लागून होते. गाडी ड्रायव्हरने बरोबर योग्य ठिकाणी उभी केली होती. गाईड व ड्रायव्हर दोघांनी आमचा तासभर तरी वाचवला होता. आता विरुद्ध बाजूला जावयाचे होते.

विश्रामधाम वाटेवरच होते. पोटभर सुग्रास जेवण जमलेच तर १५ - २० मिनिटंची वामकुक्षी व दुसर्‍या बाजूची स्थळे पहाणे. प्लान जरी एकमेकांच्या मतांनुसार लोकशाही पद्धतीने का होईना परंतु फ़ारच कौशल्याने तयार केला होता. सारथ्यांचा यात सिंहाचा खरे म्हणजे १०० टक्के वाट होता. कारण सारथ्थ्याच्या सोईनुसार स्थानिक नकाशा पाहून आखला होता. मूळ कल्पना त्यांचीच होती. आमचे सोडाच जाड्यासारख्या दिशाभ्रमिष्टाचेहि मत घेण्याचा मोठेपणा त्यांनी दाखविला. आम्ही फ़क्त ती योजना न बुडविण्याचे पुण्य(कृत्य) केले होते. क्रिकेटमधील फ़लंदाज जोडीदारावर जसा विश्वास ठेऊन धाव घेतो तसे. या विश्वासाचे त्यांनी सोने केले. पुढील सर्व दीर्घ पल्ल्याच्या सहलीत तोच साचा कायम ठेवला. ते तिघे देखील हॉटेलच्या बाबतीत मी व जाड्या या जोडीवर असाच विश्वास ठेवीत आले.

पुन्हा घाटमाथ्यावर आल्यामुळे ऊन जाणवत नव्ह्ते. तपमान पंचवीसच्या आसपास असावे. विधा वर आल्यावर पटापट थंड पाण्याने आंघोळी केल्या. अर्थातच चोवीस तासांत दुसर्‍यांदा आंघोळ केल्यामुळे हिंदु धर्म बुडेल काय असे आम्ही मास्तरांना म्हणजे विचारले. मास्तरांनी हरकत नसल्याचा निर्वाळा दिला. एका सच्छील ब्राह्मणाचीच आज्ञा ती. त्यामुळे अजून काही आम्ही धर्मभ्रष्ट झालो नाहीं. आपला धर्म अजून शाबूत आहे बरे का. जेवलो. खरोख्रच १५ मिनिटांची वामकुक्षी घेतली. त्या हवेत या छोट्या विश्रांतीचा केवढा परिणाम जाणवला. पुन्हा तंदुरुस्त होवून उत्साहाने ओसंडून गेलो. जणु कांही सोळा सतरा वर्षाचेच होतो. मन तरूण हवे हेच खरे. अडीचच्या दरम्यान निघालो. एकदोन पॉईंट्स पाहून ऍजेंड्यावरील ठळक ठिकाण असलेल्या धरणावर गेलो. कडक ऊन. तरीहि तपमान फ़क्त सुमारे तीसएक अंश असावे. नदीवरून गार वार येत होता. देवातील घिसाडी म्हणजे अभियंता जागा झाला. कर्म-धर्म-संयोगाने त्याला धरणावरील एक अभियंता भेटला. पाणी कसे सोडतात, टर्बाईन्स कशी फ़िरतात, जनित्रे कशी फ़िरतात याचा त्याने तासभर अभ्यास केला. त्याची टवाळी करायला आम्हाला आणखी वाव मिळाला. संध्याकाळपर्यंत परतलो. पुन्हा एकदा मास्तरांच्या परवानगीने आंघोळ केली. परंतु गरम पाण्याची. गर्व से कहो हम ... असो. विधा वर गरम पाणी फ़क्त सकाळी मिळते. पण मॅसा नी खास सोय केली.

लवकर जेवून पुन्हा नऊसाडेनऊला ते धुक्यातील स्वप्नमय वातावरण अनुभवण्यास बाहेर पडलो. तशीच हवा, तशीच धुक्याची दुलई, थिएटरबाहेरचे तेच वातावरण, तेच संगीत. काळ तिथेच थबकला तर काय बहार होईल? आणि तेच गुढगे टेकणे. मी व जाड्याने घरी फ़ोन केले व रस्त्यावर मास्तरीण काय म्हणत असेल, शेटजीणबाई व सौ देवा काय बोलत असतील व आपल्या मित्रांना कसे फ़ैलावर घेत असतील व आपल्या मित्रांना असे वारंवार गुढगे टेकल्यामुळे कशी लौकरच गुढगेदुखी होईल अशा आचरट कल्पना करीत खिदळत उभे होतो. विधावर परतलो.

येथून केरळात तेल्लीचेरीला कोठून जायचे त्याचे मॅसाकडून मार्गदर्शन घेतले. त्यांनी आजची सफ़र कशी झाली याची आस्थेने चौकशी केली. व पुढील मार्गदर्शन मोठ्या उत्साहने केले आणि पुढील प्रवासाला शुभेछा दिल्या. दुसर्‍या दिवशी सकाळीच बिल तयार ठेवायला सांगितले. दोरी सोडवली. पॅकिंग केले. दुसर्‍या दिवशी मॅसांनी खरोखरच साडेसहाला बिल दिले. चहाची पण व्यवस्था केली. कोण कोठले मॅसा - एक सरकारी अधिकारी. कोठे त्यांची तत्पर व हसतमुख सेवा, मैत्रीपूर्ण, सौहार्दाचे नम्र वागणे आणि कोठे रत्नागिरीची खाजगी सेवेतील आळशी ढिलाई.

क्रमशः

पूर्वप्रसिद्धी:http://www.misalpav.com/node/910

वाट फुटेल तिथे - २

रत्नागिरी आणि मुर्डेश्वर
२ ऑक्टोबर २०००.
सकाळी पाचला उठून पावणेसहा सहाला फिरायला बाहेर पडलो. नार्‍या हॉटेलातच थांबला. नार्‍याला उशिरा उठायला आवडते. त्यामुळे मी व जाड्या दाढी व्यायाम व आंघोळ आटोपेपर्यंत त्याला झोपायला मिळते. जाड्याला जास्त वेळ व्यायाम करावा लागतो. मला कमी. त्यामुळे त्याचा व्यायाम होईपर्यंत माझी दाढी व आंघोळ होते. अशा तर्‍हेने एक बाथरूम आम्हा तिघांना पुरते. अद्याप हॉटेलचे सर्व कर्मचारी झोपले होते. मराठी माणसाच्या या हॉटेलात साडेसहाला न्याहारी वा चहा सोडाच बिल मिळाले तरी खूप. मुंबईसारखीच घामट पण शुद्ध हवा. कुंद वातावरण. पण माझ्या उत्साहावर या गोष्टी पाणी ओतू शकत नाहीत. माझा रथ सदैव चार अंगुळे वरच. बोलण्यात आचराटपणा भरपूर. आचरटचार्य अशी पदवीच आहे माझ्याकडे. जाड्याच्या जिभेवर सदैव सरस्वतीचे नृत्य. साहजिकच सगळ्यांनाच चेव येतो. न्याहारीसाठी चांगले आरोग्य भुवन कोठे आहेत हे पाहून ठेवले. आज न्याहारी व दुपारचे जेवण याऐवजी ब्रंच घेऊन कालचा बॅकलॉग भरून काढू असे ठरवीत होतो. अपेक्षेप्रमाणे न्याहारी मिळाली नाहीच. बिलच साडेसातला मिळाले. नार्‍या आला. न्याहारीला बाहेरच्या आरोग्य भुवनांत बोलावून घेतले होते. ओम मोबाईल नम: (तेव्हा नवीनच आणि कॉल फार महाग होते) रत्नागिरी म्हणजे बटाटेवडे उत्तम असायला आपली हरकत नसते. परंतु आरोग्य भुवनवाल्याची हरकत होती. सगळेच पदार्थ सपक व बेचव होते. असो. उदरभरण झाले हेहि नसे थोडके. खाण्याच्या कोणत्याहि पदार्थाला नाव ठेवले की जाड्याला राग येतो. साले तुम्ही आयते खायला सोकावले आहात म्हणतो व फ़ैलावर घेतो. तो या संधीची वाटच पाहत होता. पण. पण आम्ही देखील अखेर त्याचेच मित्र. आमच्या चेहर्‍यावर त्याला तसे वाचता येत होते. त्यामुळेच आम्ही खोटेखोटे छानछान म्हणून खात होतो. स्वाभाविकच त्याची फार कुचंबणा झाली व आम्हा इतर चौघांना फारच मज्जा आली. खातांना चौघे एकमेकांकडे पाहून बराच वेळ गालातल्या गालात हसत होतो. फार म्हणजे फारच करमणूक झाली. साराच आचरटपणा. दुसरे काय! तोदेखील करावा म्हणून तर बाहेर पडलो.

निघालो नऊसाडेनऊला. पेट्रोल भरले. हवा तपासून घेतली व मार्गस्थ झालो. अर्ध्या तासात रा म मा १७ आला. दोन अडीच तासांनी ड्रायव्हरची पदावनती व किलींडरची पदोन्नती होत होती. रत्नागिरीच्या पुढे रा म मा १७ च्या दुतर्फा छान झाडे आहेत. घाट आला की वातानुकूलन बंद करावे लागे. कारण त्या इंजिनाच्या नाजूक जीवाला ते पेलत नसे. पण आपल्या मुंबईच्या मानाने हवा तशी बरी होती व घाटात हवा जरा थंडच असते. घामही फारसा आला नाही. घाट आला की सगळे गप्प होऊन निसर्ग सौंदर्य पाहाण्यात मग्न होत. याचा आणखी एक फायदा म्हणजे घाटात जेव्हा जास्त एकाग्रतेची गरज असते तेव्हा ड्रायव्हरचे लक्ष विचलित होत नाही. गोवा आले व गेले. कारवार जवळ येऊ लागले तसे जाड्याला ऊत आला. आमच्या सौ चे माहेर नन्दनगद्दा. कारवारपासून पाचएक किलोमीटर. ते कोठे आहे ते कारवारच्या पुलाअलिकडून त्याला दाखवले. लगेच त्याने आमच्या सौ ला "हर हायनेस प्रिन्सेस ऑफ नन्दनगद्दा" हा किताब जाहीर केला. साधारण तीन ते चारच्या दरम्यान तेथून जात होतो. दीडदोन तासांनी मुर्डेश्वरला पोहोचलो. रा म मा १७ ने दक्षिणेकडे जातांना मुर्डेश्वर स्टेशनकडून मुर्डेश्वरला जाण्यासाठी फाटा आहे. उजवीकडे क्षितिजावर शंकराची एक प्रचंड मूर्ती दिसू लागते.
खालील प्रकाशचित्र पाहा. नक्कीच वाईट आहे पण कल्पनायेईल


नंतर ती समोर दिसूं लागते. तेथे आर एन शेट्टी हे फार बडे प्रस्थ आहे हे जाणवत होते. रस्त्याने पाहावे तिथे आर एन शेट्टी. दोघेहि चालक फार थकले होते. कावळे सगळ्यांच्याच पोटात कोकलत होते. हॉटेले फ़ार महाग. पावसाची बुरबुरहि चालू झाली होती. हॉटेल शोधतांना किमान पाचसहा हॉटेले नापसंत करून आम्ही तिघांच्याहि वाट पाहाण्याच्या शक्तीचा अंत पाहिला. दर व सोयी यांचे गणित काही जुळता जुळेन. शेवटी आर एन शेट्टी ट्रस्टचे हॉस्टेल मिळले. त्याचे स्थान (लोकेशन) फारच रमणीय आहे. मागील बाजूने समुद्रात घुसले आहे. तीन बाजूंना समुद्र दिसतो. अलौकिक देखावा. ऑफसीझन असल्यामुळे जवळजवळ निम्मे दर होते. तेव्हा २००० साली नेहमीचा डबल ऑक्युपन्सीचा दर रू. ८५०.०० व ऑफ सीझन म्हणून रू. ४७५.०० होते. थोडक्यात म्हणजे उर्दूवाचन चांगले होते. हे आर एन शेट्टी बहुधा पुण्याचे असायला हरकत नाही. हॉटेलच्या कार्यालयाबाहेरच दरवाजाच्या डाव्या बाजूला लांबलचक भली मोठी पाटी होती. मद्यपान करू नये तसेच अंमली पदार्थ आणू नयेत. आढळल्यास बाहेर घालविले जाईल व भरलेले पैसे मिळणार नाहीत. एका रुमवर जास्तीत जास्त तिघांना राहता येईल. पाण्याचे ग्लास एका रूमवर दोनच मिळतील इ. इ. पण गंमत काय पाहा. या सगळ्या अटी होत्या. तारीख दोन ऑक्टोबर. गांधीजयंती म्हणजे दारूबंदीचा दिवस. तरीहि आजूबाजूच्या एकदोन खोल्यातून मद्यपींचा आरडओरडा ऐकू येत होता. गांधीजींनी त्यांना क्षमा केली असेलच. आंघोळी आटोपून उदरभरणास सज्ज झालो. हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये फक्त शाकाहारी. नार्‍या व जाड्या मासे खायला सोकावलेले. म्हणून बाहेर गेलो. एका कळकट हॉटेलाबाहेर मसाल्याचा छान वास येत होता म्हणून तेथेच जेवलो. जेवण सुरेखच होते. गावठी अंडी होती म्हणून मी डाळभात भाजीबरोबर आम्लेट देखील खाल्ले. ते पण छान होते. कालचे उट्टे भरुन निघाले.

३ ऑक्टोबर २०००.
नेहमीप्रमाणे पावणेसहा सहाला चौघे फिरायला बाहेर पडलो. बीचवरच गेलो. एवढा सुरेख लांबलचक बीच. पण आपल्या भारतीय लोकांना त्याचे सोयरसुतक नाही. सार्वजनिक ठिकाणीं जास्तीत जास्त घाण न केल्यास दंड असावा आणि सार्वजनिक ठिकाणी घाण कचरा टाकल्यास वा थुंकल्यास पारितोषिके असावीत व प्रातर्विधी करणारांस सर्वांत मोठे पारितोषिक असावे अशी परिस्थिती होती. म्हणून न्याहारी करण्यासाठी परत फिरलो. नार्‍याला बोलावून घेतले. कर्नाटकात सेट डोसा म्हणून एक पदार्थ मिळतो. हल्ली सगळे लोक भरपूर पर्यटन करतात. त्यामुळे बहुतेकांना ठाऊक असेल. तरी पण न खाल्लेल्या लोकांसाठी सांगतो. घावनापेक्षा जाड व उत्तप्पापेक्षां किंवा आंबोळीपेक्षा पातळ असे तीन डोसे चटणी व सांबार. हा सेट डोसा फक्त कर्नाटकातच मिळतो. इडल्या, मेदूवडे, सर्वच पदार्थ चविष्ट होते. सांबार मात्र तूरडाळीचे नसून छोट्या चवळीचे आणि धणेयुक्त मसाल्याचे थोड्या वेगळ्या पण छान चवीचे होते. उपमादेखील छान होता. पाचजण असल्यामूळे प्रत्येकजण वेगळा पदार्थ मागवून चव पाहून आपला पुढील पदार्थ ठरवीत असे. फिल्टर कॉफ़ी दक्षिणेत अपेक्षेपेक्षा चांगली मिळते. न्याहारी करुन परतलो. सूर्यदर्शन झाले. स्वच्छ निळे आकाश, कोवळी सोनेरी उन्हे पसरलेली. अतिशय आल्हाह्दायक व उत्साहवर्धक वातावरण होते. आणि अहो आश्चर्यम! आमच्या वसतिस्थानासमोरच ती दुरुन दिसणारी प्रचंड मूर्ति तर होतीच. शिवाय गीतोपदेशाच्या रथाचा सिमेंटकॉंक्रीटमधील देखावा आणि आणखी कांहीं सुंदर देखावे होते.खालील प्रकाशचित्रे पाहा.




या परिसरात बरीच मंदिरे आहेत. काळ्या दगडातील प्राचीन आणि अंधारी. आंत येणारा जो कांही थोडाफार वा तुटपुंजा प्रकाश असेल तो काळ्या दगडामुळे जरादेखील परावर्तित होत नाही. मी ’काळ्या’ दगडाला नावे टेवली म्हणून सगळ्यांनी खंत व्यक्त केली. स्वत:च्या वर्णाचे थोडे तरी कौतुक असावे की राव. एवढे सुरेख स्थापत्य निर्माण करणे खायचे काम नाही. येथेच असे नाही पण सगळीकडील पुरातन बांधकामांत प्रकाशयोजनेचा पूर्ण अभाव आढळतो. गुहांतील बांधकामात आपण समजू शकतो की प्रकाश आंत आणण्यास फारसा वाव नसतो. पण बांधलेल्या मंदिरांचे काय? नैसर्गिक प्रकाश आत आलेला गाभारा मी अजून पाहिला नाही. या अंधारावर वास्तुशास्त्रज्ञच प्रकाश टाकूं शकतील. कदाचित टाकलेला देखील असेल आणि माझा तो विषय नसल्यामुळे हे माझे अज्ञान अद्याप दूर झाले नसेल. असो. मला तरी हे कोडे अद्याप उलगडलेले नाही.पन्नास पैशापेक्षां कमी किंमतीची नाणीं मुंबई-पुण्यांत पाहायला देखील नाहींत. भिकारी देखील घेत नाहीत. नार्‍या जातीने वैश्यवाणी असल्यामुळे त्याला आम्हीं शेटजी म्हणतो. अशी कांही नाणीं त्याने आणली होती. बहुतेक पन्नास पाऊणशे रुपये असावेत. त्यामुळे त्याच्या औदार्याला उधाण आले होते. त्याच्या संधिसाधू औदार्यावरुन त्याची भरपूर टिंगल केली. नंतर देखील फिरक्या घेण्यास अजून एक विषय मिळाला. धार्मिक असा तो आमच्यात एकटाच असल्यामुळे तो अल्पमतात होत. फारच मजा आली. इतर सर्व ठिकाणी नेहमी आम्हीच अल्पमतात असतो. फोटोबिटो कढून निघण्यास साडेदहा अकरा वाजले. येथून मडिकेरी फारसे दूर नाही. आमच्या नकाशात मंगलोरच्या पुढे बंगलोर रस्त्यावर बंटवालच्या पुढे लगेच उजवीकडे मडिकेरीचा फाटा दिसत होता. परंतु बंटवाल रस्त्यापासून थोडे दूर दिसत होते. मंगलोरचे रस्ते स्वच्छ व चांगले वाटले. बंगलोरची दिशा दाखवणारे बाण बहुतेक मोठ्या नाक्यावर होते. जेथे नव्हते तेथे विचारीत पुढे गेलो. अखेर मडिकेरीचा फाटा सापडला. हळू हळू झाडोरा वाढू लागला. पावसाळ्याची अखेर असल्यामुळे रस्ता मात्र खराब होता. वेग पंचवीसवर आला. हवेत गारवा यायला लागला. समोर डोंगर दिसू लागले. चढ वाढू लागला. वळणे येऊ लागली. रबराची झाडे मी यापूर्वी पाहिली नव्हती. ती दिसू लागली. आमच्या चित्तवृत्तींचा बहर वाढू लागला. चढावामुळे .. पायातील नव्हे .. सरासरी वेग आणखी कमी झाला. आजूबाजूला जमिनीच्या कुंपणांकित आयतांमध्ये विविध नावांच्या पाट्या दिसू लागल्या. चहाचे मळे कोणाला पाहायचेत . . देवा किलींडरने विचारले. लवकरच पाहायला तयार व्हा म्हणून मास्तरांनी घोषणा केली. आमच्या उत्साहाला आणखी धुमारे फ़ुटले. एक घाट संपून दुसरा येऊ लागला. रस्ता वाईटच. एक डोंगर संपून दुसरा दिसू लागे. आता सर्वजण मैलाचे दगड वाचू लागलो. चार कन्नड दगडानंतर पाचवा एक इंग्रजी दगड असे प्रमाण होते. वाईट व घाटाचा वळणावळणांचा रस्ता म्हणून दोघेहि चक्रधर फार थकले होते. दीडदोन वाजले असावेत. मी मनगटी घड्याळ वापरीत नाही याबद्दल क्षमस्व. याची शिक्षा म्हणून नार्‍याने माझ्यावर भरपूर दुगाण्या झाडल्या. त्याच्या देखील हाताला घड्याळ नव्हते याची मी त्याला जाणीव करून दिली. परंतु त्याचे नुकतेच पडून फ़ुटले म्हणून त्याला ते माफ असा त्याचा दावा होता. मी तर कधीच बांधत नाही. पण तुझा वेंधळेपणा कसा काय क्षम्य? या प्रश्नावर तो फार उखडला. त्यामुळे इतर तिघे माझ्याशी सहमत झाले. म्हणून त्याला खूप चिडवले. मज्जा आली.

पूर्वप्रसिद्धी:(Published earlier): http://www.misalpav.com/node/837


वाट फुटेल तिथे - १

वाट फुटेल तिथे १

ही कथा आहे एका प्रवासाची. प्रवास आहे दक्षिण भारताचा. ५००० कि.मी. पेक्षा जास्त. पण एका छोट्या मारुती ८०० मधून केलेला. हातात नकाशा घेऊन केलेला एक मनोरंजक, बिनधास्त प्रवास.

आम्ही म्हणजे मी आणि आमचे मित्र. यथावकाश एकेकाचा परिचय होईलच. एकाचे नाव जाड्या. हा या प्रवासात होता. खरे म्हणजे याच्यामुळेच आम्ही कॉलेज सोडून इतकी वर्षे झाली तरी अजून एकत्र येतो. जगी सर्वसुखी असा कोण आहे या ओळी याला पाहूनच सुचल्या याबद्दल आम्हाला तिळमात्रहि शंका नाही. अविवाहिततेचे अनंत फायदे पाहा. याला बायकामुले नसाल्यामुळे हा सदैव मोकळा. विनोदबुद्धि अफाट. हजरजबाबी तसाच. कोणाची फिरकी केव्हा कशी घेईल याचा कांही नेम नाही. याचे बरेच मोठे गुण आहेत. कितीहि वाईट पदार्थ भरपूर स्तुति तोंड जरादेखील वाकडे न करता कितीहि खाऊ शकतो. खाण्याबाबतीत बकासूर देखील लाजेल. त्यामुळे हा आमच्या प्रत्येकी एक असलेल्या बायकांत हा फार लोकप्रिय. फोनवर बोलायला सुरुवात केल्याबरोबर सौ. गुदगुल्या झाल्याप्रमाणे ह्सू लागल्यास खुशाल समजावे की याच महाशयांचा फोन आहे. आमच्यातील एकाचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा एकदा याचा फोन गेला. संक्रांतीचा दिवस होता. १९८२ च्या सुमाराची गोष्ट. "पुरणपोळ्या केल्या की नाहीत? खायला येतो." ती बावचळून म्हणाली "आता कुठे? होळीला करतात." हे महाशय म्हणाले "होळीच्या दिवशी तर किशोर म्हणाला की संक्रांतीला करतात." बिचारा किशोर होळीच्या दिवशी जाड्याच्या ऑफिसात पुरणपोळ्यांचा डबा घेऊन हजर. तर असे हे आमचे मित्ररत्न. पार्ट्या व पिकनिक्स याचे हवन याच पठ्ठ्याने अविरत चालू ठेवले. वर्षाला दोनपांच पिकनिक्स व पाचसहा पार्ट्या असे किमान प्रमाण याने कायम ठेवले. १९९७ पासून वर्षाला पाचसहा पिकनिक्स असतात. हल्ली फोनाफोनीमुळे व मेलामेलीमुळे तसेच चॅटमुळे पार्ट्या कमीच. दोघेतिघे जमतात व इतराशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून गप्पा होतात. छोट्या गाडीतून आम्ही दीडदोन आठवड्यांच्या तीन सहली केल्या या सहलींच्या आठवणी सहलीवरून कालच आलो असे आजूनहि वाटते एवढ्या ताज्या आहेत. लिप्टन चहाएवढ्या. त्यापैकी पहिल्या सहलीच्या या आठवणी.

मुले मोठी झाली तसे आम्ही कौटुंबिक जबाबदारीतून थोडेफार मोकळे झालो. आमचे पुत्ररत्न पण १० वीत गेले. क्लासमुळे तो अभ्यासात पण अधिक स्वयंपूर्ण झाला. (शेवटी माझ्याच वळणावर गेला) सौ चा वेळ त्याच्या उस्तवारीत जाऊ लागला. ती गृहस्वामिनी आहे. अर्थात नोकरी करीत नाही. मी जास्तच मोकळा झालो. इतरांची मुले १ वा २ वर्षे पुढेमागे. साहाजिकच आम्हाला दूरच्या प्रवासाची स्वप्ने पडू लागली. तसे आम्ही काही अगोदर ठरविले नवह्ते म्हणा. पण म्हणतात ना ऑल ग्रेट मेन थिंक अलाईक. आणि आम्ही स्वत:ला विद्वान (असलो तरी) समजत नाही. शेवडे व देवा म्हणजे देवगांवकर यांनी ठरविले की दूरच्या प्रवासाला मारुती ८०० घेऊन जायचे. आणखी कोण येवो अथवा न येवो. दोघेच तरी जाऊ. जाड्या हे आमचे मध्यवर्ती दळणवळण केंद्र आहे. जाड्या तिसरा बहुतेक येईल. आलाच तर कालू. म्हणजे अस्मादिक. तुम्हाला म्हणून सांगतो, हे सगळे माझ्या रंगावर जळतात. कुठे जायचे? प्रथम सर्वजण रजा टाकू. नकाशा घेऊन वाट फ़ुटेल तिथेल जाऊ. रजा सलामत तो स्थळे पचास. गणेशोत्सव चालू होता. आत एकेकाच्या रजेच्या तारखांची जुळ्वाजुळव. देवाची मारुती ८०० घेऊन पुण्याला जायचे. शेवडेच्या मारुती ८०० मध्ये बसायचे व निघायचे. वाट फ़ुटेल तिथे. अरे हो. सांगायचे राहून गेले. या दोघांचेहि ड्रायव्हिंग उत्कृष्ट. सुरक्षित आणि गाडीचे वजन, रस्ता पकडण्याची कुवत व रस्त्याची स्थिति या गोष्टींना अनुसरून योग्य त्या वेगात. नाहीतर स्वर्गातच जावे लागायचे. अर्थात आम्ही पुण्यवंत असल्यामुळे. आमचा चिन्या जोशी नावाचा एक मित्र आहे. याचा रंग माझ्यासारखा. म्हणून याला आम्ही किरवंत म्हणतो. हा देखील जगी सर्वसुखी अर्थात अविवाहित आहे. "फक्त मुलांच्या" शाळेत वाढल्यामुळे वाह्यात विचार येतात. विषयांतराबद्दल क्षमस्व. असो. तर द्वारकाधीश कृष्ण वा मद्रनरेश शल्याला लाजविणारे दोन थोर सारथी आम्हा भाग्यवंतांच्या समवेत होते आणि अजून आहेत. अखेर १ ऑक्टोबर २००० ही तारीख ठरली. नवरात्राचा पहिला दिवस. सरत्या पावसाची मजा कांही औरच. रजा टाकल्या. भरपूर अवकाश असल्यामुळे रजा मान्य न होण्याचा प्रश्न नव्हता. कुठे जायचे? दक्षिणेलाच जाऊ. मी शाकाहारी. शेवडे व देवा ब्राह्मण म्हणजे शाकाहारातच जन्म काढलेले. इडल्या डोसे मिळ्तील. खाण्याची आबाळ होणार नाही. मला नाहींतरी काळ्या वर्णाचे आकर्षण आहेच इति इतर. जाड्या जरी अट्टल मांसाहारी किंबहुना मांसाहाराच्या व्यसनांत अडकलेला असला तरी तो कांहीहि आणि कितीहि खाऊ शकतो. त्याने आयुष्यात एकदाच खाण्याचा पदार्थ टाकला आहे. बॅंकॉकच्या हॉटेलातील मगरीचे सूप. पण ते मगरीचे आहे हे ठाऊक असून त्याने ते मागविले. काय हे धारिष्ट्य? तर ठरले. चलो दक्षिण भारत. पुन्हा एकदा ऑल ग्रेट मेन ..... निघण्याआधी एक आठवडा तिघा मुंबईकरांची बैठक झाली. सोबत नाही म्हणत असणारा चौथा मुम्बईकर नार्‍या ऊर्फ नारकर असे. फोनाफोनी चालूच होती. शेवडेमास्तर (पुण्याचे असल्यामुळे) फोनवर होतेच. हा सद्गृहस्थ प्राचीन काळी मिलमध्ये वस्त्र अभिअयंता होता. तेथे याला मास्तर म्हणत. म्हणून हा मास्तर. रुट ठरला. पुणे कोयना मार्गे राष्ट्रीय महामार्ग १७ म्हणजे मुंबई गोवा रस्ता पकडायचा या रस्त्याने गोवा मुर्डेश्वर-मडिकेरी तेथून केरळात उतरायचे. रा म मा १७ ने तेल्लीचेरी-माहे-कोझीकोडे- एर्नाकुलम-अलेप्पी मार्गे कन्याकुमारी. रस्त्याचा नकाशा नकाशा घेऊन जायचे. रा म मा १७च कां? कारण या रस्त्याला रहदारी कमी असते म्हणून ड्रायव्हिंग सोपे जाते फक्त दिवसा चांगल्या उजेडातच सारथ्य करावयाचे. ऊगीच किरवंताला काम नको. सालेमकडून येणार्‍या सालेम कन्याकुमारी रा म मा ४७ ईडपल्ली येथे रा म मा १७ ला मिळतो. त्यामुळे रस्त्याच्या ईडपल्लीपुढील भागाला रा म मा ४७ म्हणतात. त्याने पुढे कन्याकुमारीला जाऊन मग मागे वळायचे असा बेत ठरला. येतांनाचा मार्ग येतांनाच ठरवू. फक्त फ्लेक्सिबल सामान घ्यावयाचे. कमीत कमी सामान ही सुखाच्या प्रवासाची गुरुकिल्ली आहेच. दोनचार हाफपॅंटी व दोनचार टी शर्ट, पुरेशी साताठ अंतर्वस्त्रे, दाढीचे सामान, माफक औषधे - ऍस्पिरीन, पॅरासीटमॉल, लोमोटील, जेल्युसील वगैरे गोळ्या, टोपी, छत्री, बटरी, कपडे वाळत घालण्यासाठी दोरी, दोरीसाठी इंग्रजी एस आकाराचे पोलादी हूक, चाकू, बस्स. सुदैवाने पन्नाशी ओलांडली तरी आमच्यापैकी कुणालाच अजून कोणत्याहि गोळ्यांची अद्याप लागण झालेली नाही. ही तर ७ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. असो. मारुती ८०० मधे पावसामुळे कॅरिअर नसतांना चारपाच बॅगांखेरीज आणखी काय राहणार? गंमत म्हणजे पाचवा नार्‍या बरेच आढेवेढे घेतल्यानंतर तयार झाला. तसे आम्ही त्याच्या मागे होतोच. एकंदरीत आमचा उत्साह व नकाशा घेऊन जाण्यातील थरार त्याला दूर ठेऊ शकला नाही. अर्थात ऑल ग्रेट मेन थिंक अलाईक. दर बैठकीला तो हजर असेच पण शेवटच्या क्षणापर्यंत त्याने होकार भरला नव्हता. मारुती ८०० मध्ये पाचवा म्हणजे अतीच. परंतु खूप जवळचा मित्र असल्यामुळे त्याची अडचण वा गर्दी जाणवणार नव्ह्ती फक्त त्याची बॅग मागील कांचेवर येणार होती. मुख्य म्हणजे आमच्या सारथ्यांना हे मान्य होते. नार्‍याचा एक गुण आहे. नार्‍या हिशेब चोख ठेवतो. प्रत्येकाकडून व्यवस्थित पैसे जमा करतो मोत्यासारख्या अक्षरांत हिशेब लिहितो झोपण्यापूर्वी प्रत्येकाला काही खर्च केला की काय हे विचारतो व असल्यास त्वरित पूलमधून देऊन टाकतो. थोडक्यात म्हणजे तो चांगला रोखपाल म्हणाजे कॅशिअर आहे. या वेळी त्याने पूलचे पैसे ठेवायला बस कंडक्टरसारखी बॅग आणली होती. लेजरच्या आकाराची उभी व नारिंगी रंगाची चामड्याची. ती तो या सहलीत प्रत्येक ठिकाणी आणत असे. सकाळी तो रूमवरून निघतांना ती जी खांद्याला लटकवायचा ती संध्याकाळी रूमवरच उतरवायचा.

पाचहि जण उत्कंठेने व उत्साहाने भारून गेलो होतो काय करू आणि काय नको असे झाले होते. फोनाफोनीला वेग आला होत. केव्हा एकदा १ तारीख उजाडते असे झाले होते. माझ्या कल्पनेचा वारु उधळायला नेहमीप्रमाणे दशदिशा मोकळ्या होत्याच. सगळे जग नेहमीपेक्षा सुंदर आणि भव्य वाटायला लागले होते. आम्ही सगळ्यांनी पुन्हा वयाच्या सोळाव्या वर्षांत पदार्पण केले.

१ ऑक्टोबर २०००
अखेर १ तारीख उजाडली. जाड्याची एक गंमत आहे. त्याला अजिबात दिशाज्ञान नाही. त्याच्या स्वत:च्या घरासमोर त्याला स्वत:भोवती गरगर फ़िरवून सोडले तरी त्याला स्वत:चे घर दाखवता येईल की नाही याबद्दल शंकाच आहे. तरी त्याला घेऊन योग्य ठिकाणी ऊभे राहण्याची जबाबदारी माझी. केवढा जबाबदार माणूस मी! कालू दा जबाब नही . तर याला घेऊन मी कलानगरच्या नाक्यावर उभा राहिलो. देवा बांगूर नगरवरून निघाला. त्याने सांताक्रूझ सबवेसमोर हायवेला नार्‍याला घेतले व आम्हाला कलानगरला घेतले आणि आम्ही पुण्याकडे कूच केले. आम्हा सर्वांचा एक साधा पण चांगला गुण म्हणजे वक्तशीरपणा. त्यामुळे ठरल्याप्रमाणे बरोबर सात ऐवजी पावणेसातला कलानगरवरून निघालो. वेळ न पाळणारांना आम्ही कटवले हो सूज्ञांच्या लक्षांत आले असेलच. रहदारीची गर्दी होण्यापूर्वी निघाल्यामुळे योग्य त्या वेगाने जाऊन पुण्याला मास्तरांच्या घराखाली ठरल्याप्रमाणे बरोबर साडेदहाला पोहोचलो. तेव्हा दृतगती मार्ग अर्धाच झाला होता. परंतु जयंतराव टिळकांना त्याबद्दल सलाम केला. भ्रमण्ध्वनीवरून फोनाफोनी चालू होतीच. जाड्याच्या रसनेवर सरस्वती नेहमीपेक्षा जरा जास्तच उत्साहाने नृत्य करीत होती. पुणे कधी आले कळले देखील नाही. आदल्या दिवशीच मास्तरांनी गाडी सर्व्हिस करून घेऊन पेट्रोल भरून हवापाणी आणि ऑईल ठीक करून तयार ठेवली होतीच. ताबडतोब या गाडीतून सामान त्या गाडीत टाकले व पाच मिनिटात निघालो. सौ. मास्तरांचे न्याहारीचे आमंत्रण साभार टाळले. कठोर निग्रह बरें. खरे म्हणजे आमचे जिभेवर नियंत्रण नाही म्हणून ती टिंगल करेल हीच भीती जास्त होती. पण पहिले म्हणजे आमच्या वेळापत्रकाचे बारा वाजले असते. आणि दुसरे म्हणजे खाणेपिणे टाळता येण्याएवढा निग्रह आमच्याकडे नसल्याबद्दल सौ मास्तर किंवा मास्तरीणबाईंनी आमची भरपूर टिंगल केली असती. देवाची पदावनति होऊन किलींडरच्या जागेवर आणि मी सर्वांत बारीक असल्यामुळे मागे डावीकडे जाड्या व उजवीकडे नार्‍या या दोघांच्या मध्ये अशी पदावनति झाली.

सातारा रस्त्यावरून उजवे वळण घेतले आणि रहदारी कमी झाली. दूर आल्यासारखे वाटायला लागले आम्ही आमच्या डोमेनमध्ये... अपेक्षित दुनियेत येऊन पोहोचलो असे वाटायला लागले. थोडेसे ढगाळलेलेच होते. रस्ता खराब असल्यामुळे सारथ्याची एकाग्रता भंग होऊ नये म्हणून वटवट कमी करून निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत होतो. वेग २० - २५ वर आला. घाई कुणाला होती. आमची घाई सकाळी निघेपर्यंत. नंतर प्रवासाचा आस्वाद घेणे. दीडदोन तासांनी सारथ्याला विश्रांति देण्यासाठी ब्रेक घ्यायचा. ड्रायव्हर व किलींडर यांची अदलाबदल करायची. ताजेतवाने व्हायचे. झालेच तर एखादा चहा व पुन्हा पुढे निघायचे. पहिलाच दिवस असल्यामुळे उत्साह ओसंडून वहात होता. हास्यविनोदाला उधाण आले होते. रा म मा १७ आल्यावरच जाड्याला परमेश्वराचा पहिला अवतार मिळण्याची शक्यता. पुढे किती दिवस त्याला सांबार खावे लागणार कोण जाणे. म्हणून तेव्हाच जेवण असे ठरले. अडीच वाजून गेले तरी रा म मा १७ दिसेना. जाड्या भुकेने कासावीस. अजून एक कोड ऑफ़ कॉन्डक्ट असा की गाडीत कहीहि खायचे नाही अन्यथा झुरळे मुंग्यादि कीटकांना आमंत्रण. ड्रायव्हर बदलतांना जाड्याकडील सर्व मारी बिस्किटांचा स्टॉक संपला. अर्थात आम्ही इतर चौघांनी देखील बिस्किटांचा अवमान केला नाही. त्याचे भुकेने कासावीस होणे पाहून आमची भरपूर करमणूक झाली व आम्हा इतर चौघांना भुकेची तीव्रता जाणवली नाही. परंतु रा म मा १७ आल्यावरच जेवायचे यावर तोहि ठाम होता. मासे मिळण्याचे आमिषहि त्याला होतेच. आम्ही देखील त्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवत होतो. आम्ही ४ मुंबईकरांनी न्याहरी देखील केली नव्हती. शेवटी शेवटी हॉटेल दिसले की तो थांबायचा आग्रह करी. नंतर आग्रहाचे रूपांतर हट्टात झाले. त्यामुळे फक्त टिंगलीचे प्रमाण वाढले. हे दोघे गाडी अशा ठिकणी थांबवीत की आजूबाजूला हॉटेल नसे. सौ शेवडे ही देवाची सख्खी बहीण. नेमक्या अशा टिंगलीच्या क्षणी तिचा फोन आला. सुकाणू देवाकडे होते. मास्तरचे बोलून झाल्यावर त्याने जाड्याकडे फोन दिला. आम्ही सकाळी उठल्यापासून काहीहि खाल्लेले नाही व तुझा रथचक्रधारी क्रूरकर्मा भाऊराया आम्हाला काहीहि खाऊं देत नाही अशी त्याने तक्रार केली. तेव्हा तिनेहि मग तुमच्या मैत्रीत काही दम नाही बघ असे बोलून त्याची फिरकी घेतली. केवळ वजन वाढून त्याची प्रकृति बिघडूं नये हा एकमेव उदात्त हेतु त्यामागे आहे अशी आम्ही फोनवरून ऐकू जाईल असे ओरडून साक्ष देण्याचे परम कर्तव्य बजावले. त्यामुळे तिचीहि करमणूक झाली. अर्थात नंतर देवाच्या घरच्यांची देखील झाली असणार.

कमी वेगामुळे रा म मा १७ येईपर्यंत साडेतीन वाजून गेले. आमचा अगोदर अंदाज होता की संध्याकाळी पाचसहापर्यंत कणकवलीला पोहोचू. परंतु उजेड फारच कमी होता. संध्याकाळचे सात वाजल्यासारखे वाटावे एवढा अंधार तीनसाडेतीनलाच होता. त्यातच फारच जोरदार पाऊस. वळणे आहेतच. रस्त्यातील खड्डे दिसत नाहीत. तशात पावसाचा जोर वाढला. वायपर चालू होते. वेग आणखी कमी. सगळ्यांचे लक्ष रस्त्याकडे लागलेले होते. ड्रायव्हर किलींडर समोर, मी मागे मध्यभागी. जाड्या डावी व नार्‍या उजवी बाजू अशी वाटणी झाली. चारसाडेचारला हातखंबा आले. परंतु थोडे आंत जाऊन रत्नागिरीला मुक्काम करावा असे ठरवले. हायवेला हॉटेलाचे दर चढे असणार व सेवा देखील चांगली नसणार. रत्नागिरीलाच मुक्काम केला. हॉटेल पसंत करणे माझ्याकडे व घासाघीस करणे जाड्याकडे आले. घासाघीस करायला बायको नसल्यामुळे तो स्वत:च उत्तम घासाघीस करतो जे विवाहितांना करावे लागत नाही. मासळीबाजारात कोळणी त्याला गंडवतात तो भाग वेगळा. एका डबल ऑक्युपन्सीमध्ये मास्तर व देवा म्हणजे ब्राह्मण आणि दुसरीत आम्ही तिघे म्हणजे ब्राह्मणेतर अशी जातीय विभागणी झाली. नार्‍या वगळता आम्हा चौघांचा देवाधर्मावर विश्वास नसल्यामुळे आणि संकटप्रसंगीदेखील आम्ही अविचल रहिल्यामुळे आम्ही सर्व धर्मांची यथेच्छ टिंगल करतो. जातपात देखील मानत नसल्यामुळे आम्ही खाजगीत एकमेकांची जातीय टवाळी करतो. अर्थात इतरांच्या भावना दुखावू नये म्हणून खाजगीत. रात्री आठनऊ पर्यंत पाऊस पडत होता. दुसर्‍या दिवशी लवकर उठून जाण्याची खुमखुमी असल्यामुळे जेऊन लगेच झोपलो मास्तर व मी रोज साडेनऊलाच झोपतो. जेवल्यावर आम्ही दोघे झोपलो. नार्‍याने दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसहाला बिल व न्याहरी मिळेल याची व्यवस्था केली. देवाने गाडीची पाहाणी केली. जाड्या वजन आटोक्यात ठेवण्यासाथी जेवण्यापूर्वी भरपूर व्यायाम करतो व जेवणानंतर भरपूर चालतो. पाऊस नंतर थांबल्यामुळे त्याच्या चालण्यात व्यत्यय आला नाही.
क्रमश:
पूर्वप्रसिद्धी(Published earlier): misalpav.com 11 Feb. 2008